बांगर व खादर : गंगा-सिंधूच्या मैदानातील गाळांचे कालानुक्रमे दोन विभाग पाडण्यात येतात. त्यांपैकी जुन्या निक्षेपांना (राशींना) बांगर व नव्या निक्षेपांना खादर असे म्हणतात. बांगर ही संज्ञा विशेषकरून उत्तर प्रदेश व बंगालमधील गाळासाठी वापरली जात असली, तरी या गाळाने उत्तर भारताचा बराच भाग व्यापला आहे. बांगर मृत्तिकामय असून त्याचा रंग बऱ्याचदा पिवळसर होतो. खादरपेक्षा बांगराचा रंग अधिक गडद असतो. अशुद्ध कॅल्शियम कार्बोनेटापासून बनलेले गाठींच्या व थरांच्या रूपांतील बरेच ⇨ कंकर बांगरामध्ये सामान्यतः असते. गेंडा, पाणघोडा, हत्ती (एलिफस अँटिक्वस), घोडा (ईक्वस नमॅडिकस), खवल्या मांजर (मॅनिस जायगँटिआ), बैल इत्यादींच्या निर्वश झालेल्या जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) बांगरमध्ये आढळतात. त्यांच्यावरून बांगर गाळाचे वय मध्य ते उत्तर प्लाइस्टोसीन (सु. ४ लाख ते ११ हजार वर्षापूर्वीचे) असल्याचे स्पष्ट होते. प्रागैतिहासकालीन मानवाची दगडी हत्यारे यांची समकालीन होत. बांगर सामान्यतः बुटक्या टेकड्या, लहान पठारे व उंचवटे या स्वरूपांत आढळतो. आजच्या नद्यांच्या पात्रांपेक्षा व खादर असलेल्या भागांपेक्षा बांगर उंचावर आढळतो. शिवाय तो सध्याच्या नद्यांच्या पूररेषांच्या पलीकडे असल्याने पुराच्या वेळीही नद्यांचे पाणी त्यावर येत नाही. नद्यांच्या दिशेत वा पात्रात बदल झाल्याने त्याची झीज होते. तर नद्या वेडीवाकडे वळणे घेत असल्याने त्याचे पृष्ठ सपाट होते. सामान्यतः बांगराचे पृष्ठ सपाट असते. मात्र नद्यांच्या पात्रानजीकच्या बांगरातून नद्यांचे पाणी अधिक खोलपर्यंत जमीन खोदून गेले असल्यामुळे त्यात घळी पडलेल्या आढळतात.
खादराचे निक्षेप जवळजवळ सर्वत्र नद्यांच्या सध्याच्या पात्रांमध्ये आढळतात. ह्यांच्या मृत्तिकांमध्ये कंकराचे प्रमाण अल्प असते. सध्या हयात असणाऱ्या हत्ती, घोडे, बैल, हरणे, म्हशी, सुसरी, मासे यांसारख्या प्राण्यांचे अवशेष त्यांच्यात आढळतात. खादराचे निक्षेप प्रागैतिहासकालीन त्रिभुजी वा अन्य प्रकारच्या निक्षेपात सहज रीतीने मिसळून गेलेले आढळतात.
ठाकूर, अ. ना.