बॅस सामुद्रधुनी : आग्नेय ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याचा समुद्रकिनारा व टास्मानिया यांदरम्यान असलेली, हिंदी महासागर आणि टास्मन समुद्र (पॅसिफिक महासागर) यांना जोडणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीची पूर्व-पश्चिम लांबी सु. ३२२ किमी. व रुंदी १२९ ते २४१ किमी. असून सरासरी खोली ७० मी. आहे. जॉर्ज बॅस व मॅथ्यू फ्लिंडर्स या ब्रिटिश समन्वेषकांनी या सामुद्रधुनीचा शोध लावला. या सामुद्रधुनीत किंग बेट, हंटर बेटे आणि फर्नो बेटे आहेत. मासेमारीसाठी तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनासाठी ही सामुद्रधुनी प्रसिद्ध आहे.

खांडवे, म. अ.