बँडिकूट : या सस्तन प्राण्याचा समावेश रोडेंशिया गणाच्या म्युरिडी कुलात (मूषक कुलात) करतात. बँडिकूटा बेंगालेंसिस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. बँडिकूट हे नाव तेलुगु भाषेतील ‘पंडित-कोकु’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन इंग्रजी भाषेत गेले आहे. बँडिकूटचा प्रसार विशेषतः द्वीपकल्पीय भारतात, हिमालय ते केप कोमोरीन येथे दमट गाळवट पट्ट्यात झालेला आहे. याखेरीज श्रीलंका, ब्रह्मदेश, द. चीन, नेपाळ, थायलंड, इंडोचायना, उत्तर मलाया, सुमात्रा, जावा येथे हा आढळतो. डचांनी हा तैवानमध्ये नेला. डोके व शरीराची लांबी १५–२३ सेंमी.,शेपटीची लांबी १३–१८ सेंमी. व वजन ६८५–१,१३२ ग्रॅ. असते. अंगावरील केस मऊ, बरेच दाट ते विरळ व भरड असून संरक्षक केसांच्या लांबीत खूपच फरक असतो. पाठीकडील रंग फिकट करडसर ते तपकिरी रंगाच्या विविध छटांचा किंवा बहुधा काळा असतो. खालची बाजू मळकट पांढरी असते. त्याचे डोके व कान गोलसर असतात आणि तोंड आखूड व रुंद असते. त्याला डिवचले असता अंगावरील केस ताठ उभे करतो व गुरगुरतो. शेपटीवर तुरळक केस असतात. पुढच्या पायांच्या नख्या मोठ्या असतात. सुळे दात पिवळ्या किंवा नारिंगी रंगाचे असतात. स्तनांची संख्या १२–१८ असते.

आ.बँडिकूट सामान्यतः शेतांत, बागांत व कुरणांत राहतात. तसेच ते पडीत जमिनी, पानझडी व सदापर्णी वनांतही राहतात. त्याच्या बिळाबाहेरील मातीच्या ढिगाऱ्यावरून त्याचे अस्तित्व सहज लक्षात येते. प्रत्येक बिळात एकच प्राणी राहतो व त्यामध्ये धान्य साठविण्यासाठी एक किंवा अधिक कोठ्या असतात. त्या कोठ्यांत धान्य, कंदमुळे, फळे व कवची फळे साठवून ठेवलेली असतात. तो रात्रीच्या सुरक्षित वेळीच बिळातून बाहेर पडतो. तो उत्तम पोहू शकतो असे म्हणतात.

बँडिकूटा इंडिका ही जाती मनुष्याच्या सान्निध्यात सहभोजी [⟶ सहभोजिता] म्हणून रहाते. या जातीच्या मादीला एका वेळेस १०–१२ पिले होतात. श्रीलंकेत तिची वीण बहुधा वर्षभर होते.

बँडिकूट धान्याच्या पिकांचे तसेच कंदमुळांच्या पिकांचे फारच नुकसान करतो रबरांच्या मळ्यांतही ह्याचा फार उपद्रव होतो. एतद्देशीय लोक बँडिकूट मारून खातात व नियमितपणे त्यांची बिळे उकरून कोठ्यांत साठविलेले धान्य मिळवितात.

P - 208

शिशुधानस्तनी (पिलाची वाढ पूर्ण होण्यासाठी मादीच्या उदरावर पिशवी असलेल्या सस्तन प्राण्यांच्या) गणातील काही प्राण्यांसही बँडिकूट असे म्हणतात. हे बँडिकूट पेरॅमेलिडी या कुलातील आहेत. पेरॅमेलिस, आयसोडॉन आणि कीरोपस हे या कुलातील प्रमुख वंश होत. पेरॅमेलिस गनाय या जातीचा बँडिकूट टास्मानियात आढळतो. याच्या शरीरावर काळे पट्टे असतात. हा अत्यंत चपळ आहे. कधी कधी यास पाळीव जनावर म्हणूनही घरात ठेवतात आणि तो थोड्या काळातच घरातल्यासारखा वावरू लागतो. हा प्राणी निशाचर आहे. याला बरेच कृतंक (कुरतडण्यास उपयुक्त)

दात असतात तसेच सुळे व दाढाही असतात. याचे मुस्कट टोकदार असते व हा सर्वभक्षक आहे. कृमी व कीटक हे याचे आवडते भक्ष्य असून याला कंदमुळेही आवडतात. यामुळे शेतकरी यांना मारतात. ते दिवसा आपल्या बिळात विश्रांती घेतात व अंधार पडल्यावर भक्ष्याच्या शोधार्थ जातात. यांची धावण्याची पद्धत कांगारूसारखी उड्या मारत जाण्याची व जलद आहे.त्यामुळे सूर्योदयापूर्वी त्यांना बरेच अंतर तोडून दूर जाता येते. कांगारूसारखे यांचे मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा लांब असतात.

पेरॅमेलिस नॅसूटा या जातीचे बँडिकूट पूर्व ऑस्ट्रेलियात आढळतात. यांचा आकार लहान सशाएवढा असून कीटकांच्या अळ्या हे यांचे अन्न होय. याशिवाय ते कधीकधी उंदीरही खातात. यांना पुष्कळ कृंतक दात असतात. यांच्या मागील पायांची दुसरी व तिसरी बोटे एकमेकांस चिकटलेली असतात.

पहा : उंदीर, घूस, धानीमूषक.

इनामदार, ना. भा.; जमदाडे, ज. वि.