मॉर्डेनाइट: (टायलोलाइट). झिओलाइट गटातील खनिज. स्फटिक समचतुर्भुजी व ⇨ ह्यूलँडाइटासारखे[→ स्फटिकविज्ञान]. सामान्यतः याचे शवपेटीच्या आकाराच्या किंवा सुईसारख्या लहान स्फटिकांचे पुंजके अथवा अर्धगोलाकार आणि मूत्रपिंडाकार संधिते (केंद्रकाभोवती थरावर थर साचून बनलेले पिंड) आढळतात. संधितांच्या आतील संरचना तंतुमय व अरीय (त्रिज्यीय) असते हे कापसाच्या बोंडाप्रमाणे दिसते. ⇨ पाटन : (010) चांगले. ठिसूळ. कठिनता ३–४. वि. गु. २·१२–२·१५. चमक काचेसारखी. रंगहीन, पांढरे, पिवळसर, तांबडे, तपकिरी वा गुलाबी रंगाचे. पारदर्शक. रा. सं. (Na2, K2, Ca) Al2Si10O24·7H2O.

सामान्यपणे अग्निज खडकांतील पोकळ्यांत किंवा शिरांमध्ये याचे स्फटिक आढळतात. सागरी गाळात (उदा., उरल पर्वत) व जेथे पाण्याच्या क्रियेने ज्वालामुखी काचेचे विकाचीकरण (स्फटिकी द्रव्यात रूपांतर) झाले आहे अशा भित्तींमध्येही (उदा., आरान, ब्युटशायर) हे आढळते. मॉर्डेन, वायोमिंग (अमेरिका), इटली, फेअरो बेटे इ. ठिकाणी हे आढळते. नोव्हास्कोशामधील मॉर्डेन जिल्ह्यात प्रथम आढळल्याने त्यावरून एच्. हौ यांनी या खनिजाला ‘मॉर्डेनाइट’ हे नाव दिले (१८६४).

पहा : झिओलाइट गट.

ठाकूर, अ. ना.