माँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा : (१८ जानेवारी १६८९–१० फेब्रुवारी १७५५). प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ. बॉर्दोजवळच्या ला ब्रेद येथे जन्म. तेथील खानदानी घराण्यातील हा वडील मुलगा. वडिलांचे नाव झाक द सगाँदा व आईचे मारिया फ्रांस्वा द पेस्नेल. माँतेस्क्यूचे शालेय शिक्षण पॅरिसजवळील जुय्यी येथे झाले. पुढे बॉर्दो येथेच त्याने कायद्याची पदवी मिळविली. काही काळ त्याने तेथेच वकिली व्यवसाय केला. १७०८ नंतर पुढील पाच वर्षे पॅरिसमध्ये राहून त्याने कायदा व वकिली व्यवसाय यांचा अभ्यास केला. १७१५ मध्ये जेनी द लर्ती या धनाढ्य घराण्यातील मुलींशी विवाह .बॉंर्दो येथील स्थायिक न्यायालयात सदस्य म्हणून (१७१४) व पुढे अध्यक्ष म्हणून (१७१६ ते २८) त्याने काम केले. १७१६ मध्ये त्याला चुलत्याची सरदारकी वारसाहक्काने मिळाली. फ्रेंच अकादमीवर १७२८ मध्ये त्याची नियुक्ती झाली. ब्रिटिश रॉयल सोसायटीचे सदस्यत्वही त्याला लाभले. द पर्शियन लेटर्स (इं. शी. १७२३), कन्सिडरेशन्स ऑन द कॉझेस ऑफ द ग्रँजर ऑफ रोम अँड इट्स डिक्लाइन (इं. शी. १७३४) व द स्पिरिट ऑफ द लॉज (इं. शी. १७४८) ही त्याची काही महत्त्वाची ग्रंथसंपदा होय.
लॅत्र पॅसीन (इं. शी. द पर्शियन लेटर्स) हा एक अभिजात फ्रेंच ग्रंथ. माँतेस्क्यून टोपणनावाने तो प्रसिद्ध केला असला, तरी हे गुपित लगेचच उघड झाले. हा ग्रंथ म्हणजे पत्ररूपाने केलेले प्रवासवर्णन आहे. त्यात तीन काल्पनिक इराणी प्रवाशांचे यूरोपमधील विशेषतः फ्रान्समधील, अनुभवांचे वर्णन आहे.
या प्रवासाचा कालखंड म्हणजे चौदाव्या लूईच्या मृत्यूच्या (१७१५) पूर्वोत्तार पाच पाच वर्षे असा दहा वर्षांचा आहे. या ग्रंथात फ्रेंच आणि इराणी या दोन्ही समाजातील तत्कालीन श्रद्धा, सामाजिक आचारविचार व संस्था यांच्यावरील अत्यंत मर्मभेदक व उपरोधिक भाष्य आहे. यूरोपमधील व विशेषतः फ्रान्समधील समाज, धर्म, नीती, तत्त्वज्ञान यांसारख्या सर्वच सांस्कृतिक घटकांवरील अत्यंत अपूर्व अशी उपरोध-उपहासपूर्ण मीमांसा त्यात आहे. व्यक्ती आणि समाजाचे दास्य व स्वातंत्र्य यांसंबंधी माँतेस्क्यूची मूलगामी नवीन दृष्टी त्यातून दिसते. न्याय्यता, सद्गुण-संपन्नता, सहकार्य आणि सहिष्णुता यांवर अधिष्ठित अशा समाजाचा मानदंड माँतेस्क्यूने त्यातून सूचित केला आहे. त्यामागे माँतेस्क्यूचा पॅरिसमधील पाच वर्षाचा अनुभव उभा आहे, हे दिसून येते.
माँतेस्क्यूने १७२८ नंतर यूरोपभर केलेल्या प्रवासांनंतर रोमन साम्राज्याच्या उदयास्ताची मीमांसा करणारा ग्रंथ लिहिला. रोमनांचे क्षात्रगुण आणि त्यांच्या संस्थांची लवचिकता ही रोमन वैभवाची बलस्थाने होती. या गुणांच्या लोपामुळे या साम्राज्याचा ऱ्हास झाला, असे माँतेस्क्यूने सुचविले आहे. आधुनिक शास्त्रशुद्ध दृष्टीने लिहिलेला इतिहासग्रंथ म्हणून नव्हे. पण इहवादी मूल्यांच्या आधारे केलेले इतिहासाचे अध्ययन, यादृष्टीने माँतेस्क्यूचा हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
द्लेस्प्री दे ल्वा (इं. शी. ‘द स्पिरिट ऑफ द लॉज’) हा माँतेस्क्यूचा गाजलेला ग्रंथ. कायदा किंवा विधी हा समाजाची भौतिक परिस्थिती आणि त्यांच्या गरजा व पंरपरा यांच्यातील परस्परसंबंधाचा निदर्शक असतो आणि त्याची प्राथमिक अभिव्यक्ती शासनसंस्थेच्या रूपाने होते. जगातील विविध देशांत विविध प्रकारे विकसित होणारा कायदा आणि रूढी यांच्या मुळाशी असलेल्या या घटकांचे विवेचन माँतेस्क्यूने या ग्रंथात केले आहे. त्यातून आधुनिक राज्यशास्त्राच्या पायाभूत घटकांचे स्वरूप लक्षात येते. मध्ययुगीन फ्रान्सचा इतिहासही या ग्रंथात आलेला आहे. तसेच राजेशाही, गणराज्य किंवा प्रजासत्ताक आणि हुकूमशाही या शासनसंस्थाच्या प्रकारांची मीमांसाही त्यात आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि कायद्याची अनुल्लंघनीयता यांचे रक्षण करण्यासाठी स्वायत्त न्यायसंस्थांची गरज आहे व त्यामुळे निरंकुश राजेशाहीच्या जुलमी प्रवृत्तीवर अंकुश राखता येईल. असे माँतेस्क्यूने दाखविले आहे . त्याच्या या विचारसरणीच्या प्रभावामुळेच फ्रेंच राज्यक्रांतिपूर्व काळातील संविधानवादी चळवळीला चालना मिळाली. या ग्रंथावर टीकाही पुष्कळ झाली आणि माँतेस्क्यूने आपल्या नेहमीच्या वक्रोत्तिपूर्ण शैलीने त्या टिकेचा परामर्श घेतला.
एसँ स्युर ल् गू (इं. शी. एसे ऑन टेस्ट) हे त्याचे शेवटचे पण अपूर्ण लेखन फ्रेंच विश्वकोशात अंतर्भूत करण्यात आले. शिव आणि सौंदर्य या संकल्पनांबद्दल त्यात विवेचन केलेल आहे.
यूरोपीय ज्ञानोदय (एन्लाइटन्मेंट) युगातील (अठरावे शतक) रूसो, व्हॉल्तेअर यांच्याबरोबरच एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून माँतेस्क्यू ओळखला जातो. त्याच्या सर्वच विचारसरणीमागे फ्रान्समधील चौदाव्या लूईच्या कारकीर्दीची चिकित्सक पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश शासनसंस्था आणि उदारमतवाद यांचाही प्रभाव तिच्यावर आहे. माँतेस्क्यूच्या एकूण विचारप्रणालीचे वळण त्याच्या प्रारंभीच्या काही निबंधातूनही लक्षात येते. बॉर्दो अकादमीचा प्रमुख असताना त्याने वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. १७०९ मधील एका निबंधात त्याने रोमन विधिज्ञ, लेखन व मुत्सद्दी सिसेरो याची स्तुती केली आहे. तर दुसऱ्या एका निबंधात पेगन्सबद्दलचे (मूर्तिपूजक) ख्रिस्ती मत बरोबर नसल्याचे सुचविले आहे. आणखी एका निबंधात (१७१६) ख्रिस्ती धर्मावर गर्भित टीका असून रोमनांनी केलेल्या धर्माच्या राजकीय उपयोगसंबंधी विश्लेषण आहे. माँतेस्क्यूची महत्त्वाची टिपणे संगृहित-संपादित करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Baun. J. A. Montesquieu and Social Theory, Oxford, 1979.
2. Cabeen, David, C. Montesquieu, New York, 1947.
3. Cassier, Ernst, The Philosophys of the Enlightenment, Oxford, 1951.
4. Flether, F. T. H. Montesquieu and English Politics, Philadelphia, 1980.
5. Lay, Robert J. Trans The Persion Letter, New York, 1961.
6. Nugent, Themas, Trans. The Spirit of the Laws, New York, 1949.
7. Plamenatraz, Jhon P. Man and Society: Political and Social Theory, 2 Vols. London, 1963. 8. Runciman, W. G. Social Science and Political Theory, Cambridge, 1963.
जाधव ,रा. ग.
“