माँट्रिऑल : कॅनडातील व त्याच्या क्वीबेक प्रातांतील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १२,१४,३५२ महानगरीय १८,६२,३००–१९८३ अंदाज. हे क्वीबेकच्या नैर्ऋत्येस २४० किमी. सेंट लॉरेन्स नदीवर वसले आहे. हे शहर होशलॅग द्वीपसमूहातील त्रिकोणाकृती माँट्रिऑल बेटावर (लांबी ५१ किमी. व रूंदी १६किमी.) वसले असून बेटाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४७१ चौ.किमी). माँट्रिऑल शहराने १७६ चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. महानगरीय क्षेत्र- ग्रेटर माँट्रिऑल – २,६७३ चौ.किमी. आहे. त्यात संबंध माँट्रिऑल बेट, लगतची जीसस आयलंड व अन्य लहान बेटे आणि त्यांभोवतीच्या क्वीबेक मुख्यभूमीचा काही भाग इत्यादींचा समावेश होतो. हे महत्त्वाचे नदी बंदर असून जगामधील सर्वांत मोठे धान्य व्यापार बंदर म्हणूनही ते ओळखण्यात येते. पॅरिसनंतरचे सबंध जगातील फ्रेंच भाषिकांचे सर्वांत मोठे शहर म्हणूही माँट्रिऑलची ख्याती आहे.
झाक कार्त्ये (१४९१–१५५७) या फ्रेंच समन्वेषकाने १५३५ मध्ये इंडियनांचे होशलॅगनामक खेडे असलेल्या या ठिकाणाला भेट दिली. पर्वताच्या माथ्यावर पोहचल्यावर त्याने त्या पर्वताला ‘माँट रीआल’ (माउंट रॉयल) असे नाव दिले. पॉल द शॉम्दे मेझॉनव्ह (१६१२–७६) हा फ्रेंच गव्हर्नर (कार. १६४२–६४) व वसाहत प्रशासक फान्समधून रोमन कॅथलिक मिशनऱ्यांचा एक जथा घेऊन १६४२ मध्ये येथे आला व त्याने उभारलेल्या वसाहतीस ‘व्हिले मेरी’ (मेरिज सिटी) असे नाव दिले सतराव्या शतकारंभापासून वसाहतीचे नाव पर्वताशी निगडीत होऊन वसाहतीचे माँट्रिऑल हे नाव कायम झाले. मेझॉनव्हला माँट्रिऑलचा जनक समजण्यात येते.
वसाहतीचे रूपांतर लवकरच फर व्यापरकेंद्रात झाले. १७६० मध्ये इंग्रजांच्या हाती माँट्रिऑल विनाप्रतिकार पडले. १७७५–७६ यांदरम्यान अमेरिकन क्रांतिसैन्यात जनरल मंगमरीच्या नेतृत्वाखाली माँट्रिऑलचा कबजा घेतला. १८४४–४९ यांदरम्यान ते कॅनडाच्या राजधानीचे ठिकाण होते. १८७० मध्ये येथून इंग्रज फौजा काढून घेण्यात आल्या. एकोणिसाव्या शतकात माँट्रिऑलचा वेगाने विकास झाला. तो मुख्यतः दळणवळणाच्या सुविधांमुळे! रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, सागरी वाहतूक, हवाई वाहतूक, तारायंत्रे इत्यादींची वाढ होऊन हे शहर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले गेले.
‘ओल्ड माँट्रिऑल’ (जुने माँट्रिऑल) मध्ये जुन्या ऐतिहासिक वास्तूंशेजारीच आधुनिक उंच इमारती तसेच आकर्षक रेस्टॉरंट आढळतात. नोत्र-दाम-द-बोन सकुर हे सर्वांत जुने रोमन कॅथलिक चर्च (१७७१) तर सर्वांत जुनी वास्तू सी सूल्पीस सेमिनरी (१६८५) उल्लेखनीय आहेत. ‘प्लेस दी आर्म्स’ (परेड ग्राउंड) ह्या चौकात १६६४ मध्ये व्हिले मेरीचे संस्थापक व इरक्वोई इंडियन यांच्यातील पहिला संघर्ष घडला. याच चौकात माँट्रिऑलचा संस्थापक मेझॉनव्ह याचे स्मारक आहे. पश्चिमेकडूल व्यावसायिक भागात (डाउनटाउन माँट्रिऑल) काही उत्तुंग इमारती, प्रचंड उलाढालींची विभागीय भांडारे व उत्कृष्ट हॉटेले आहेत. तेथील ‘डॉर्चेस्टर बूलेव्हार’ या मार्गावर गगनचुंबी इमारती असून रॉयल बँक ऑफ कॅनडा ही देशातील एक उत्कृष्ट क्रूसाकृती इमारत (१८७ मी. उंच) आहे. सेंट कॅथरीन मार्ग व शेरब्रुक मार्ग, त्यांवरील विभागीय भांडारे, रेस्टॉरंट व चित्रपटगृहे तसेच पुरातन वस्तूंची दुकाने, कलावीथी व हॉटेले यांमुळे ही पर्यटक आकर्षणे ठरली आहेत. माँट्रिऑलमध्ये सु. ११,००० हॉटेले व मोटेले तसेच ५,००० रेस्टॉरंट आहेत.
शहरात ६५% लोक फ्रेंचवंशीय, १२% ब्रिटिशवंशीय, तर उर्वरित लोकसंख्येत चिनी, जर्मन, ग्रीक, इटालियन, पोलिश, युक्रेनियन इ. वांशिक गटांचा समावेश होतो. फ्रेंच नारिकांच्या मानाने ब्रिटिशवंशीयांचे राहणीमान उच्च आढळते. माँट्रिऑलच्या समस्यांचे स्वरूप जरा विचित्र आहे. माँट्रिऑलमध्ये फ्रेंचभाषिक कॅनडियन या बहुसंख्यांक लोकांना (६६%) सर्वाधिक त्रास सोसावा लागतो. या कारणांमुळे शहरात अनेकदा दंगली उसळून हिंसक प्रकारही घडून येतात.
माँट्रिऑलमध्ये ४५,००० हून अधिक एक वा दोन कुटूंबे राहू शकतील अशी सदने (गृहे) व तीन लाखांवर दालने आहेत. संबंध जगामध्ये वैशिष्ट्येपूर्ण दालनाच्या बांधकामाबद्दल माँट्रिऑल प्रसिद्ध आहे. या प्रकारच्या दालनांच्या कामास ‘हॅबिटॅट’ असे नाव आहे. त्यातील दालने काँक्रीटच्या पेट्यांच्या राशीप्रमाणे दिसतात. एका दालनाचे छप्पर हे दुसऱ्या दालनाची गच्ची ठरते.
शहरात इंग्रजी व फ्रेंच भाषांत अध्यापन करणाऱ्या रोमन कॅथलिक (४०० विद्यालये) व प्रॉटेस्टंट शाळा (१००) असून ‘माँट्रिऑल विद्यापीठ’ व ‘मागिल विद्यापीठ’ अशी दोन विद्यापीठ आहेत. माँट्रीऑल विद्यापीठात फ्रेंच भाषामाध्यम असून मागिल विद्यापीठ जुने आहे (स्था. १८२१).
ग्रेट लेक्स व अटलांटिक या दोहोंमधील जलवाहतुकीचे प्रमुख थांब्याचे ठिकाण म्हणून माँट्रिऑलला मोठे महत्त्व लाभले आहे. माँट्रिऑल बंदर प्रतिवर्षी सु. ४,००० महासागरगामी, किनारी व अंतर्गत जलमार्गगामी जहाजांना आपली सेवा उपलब्ध करते व सु. १७० लक्ष मे. टन मालाची हाताळणी करते. प्रतिवर्षी या बंदरातून सु. १,००० ते १,६०० लक्ष बुशेल धान्य जहाजांमधून पाठविले जाते. कॅनडाच्या सर्वांत मोठ्या रेल्वे कंपन्यांचे (‘कॅनडियन पॅसिफिक’ व ‘कॅनडियन नॅशनल रेल्वेज’) केंद्र म्हणून माँट्रीऑलची ख्याती आहे. १९६८ पासून टरबाइन – प्रेरित प्रवासी आगगाडी माँट्रिऑल ते टोराँटो यांदरम्यान चालू आहे. शहराच्या अनुक्रमे नैर्ऋत्येस व वायव्येस ‘डॉरव्हाल’ व ‘मिराबेल’ हे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ‘एअर कॅनडा’ या देशातील सर्वांत मोठ्या हवाईवाहतूक कंपनीचे मुख्यालय माँट्रिऑलमध्येच आहे. दहांवर मोठे राजमार्ग माँट्रिऑलमधून जातात. ट्रान्स-कॅनडा राजमार्ग शहराच्या व्यावसायिक भागास ३० मी. भुयारी मार्गाने ओलांडतो. १९६६ मध्ये कार्यान्वित झालेली ‘मेट्रो’ ही माँट्रिऑलची भुयारी रेल्वे दर तासाला सु. ६०,००० प्रवाशांना वाहतूक सेवा उलपब्ध करते. रबरी टायर वापरणारी प. गोलार्धातील ही पहिलीच भुयारी रेल्वे होय.
महानगरीय माँट्रिऑलमधील सु. ७००० निर्मितीउद्योगांपासून प्रतिवर्षी सु. १,३०० कोटी डॉ. किंमतीचे उत्पादन होते. महत्त्वाच्या उद्योगांमध्ये खनिज तेल शुद्धीकरण (देशातील ३३% खनिज तेल उत्पादन), अन्नप्रक्रिया उद्योग (डबाबंद अन्न, बीर, सारख), कापड व वस्त्रे, तंबाखू व तज्जन्य पदार्थ, वाहतूक उपकरणे व साधने, विद्युत् यंत्रे व फर वस्तू यांचा समावेश होतो.
माँट्रिऑलमधील कंपन्या कॅनडाच्या एकूण निर्यात आयात व्यापारापैकी अनुक्रमे १०% व २०% हिस्सा तसेच अंतर्गत घाऊक आणि किरकोळ व्यापाराचा १५% हिस्सा हाताळतात. डाउनटाउन माँट्रिऑलमधील ’प्लेस बॉनर्व्हेचर’ ही जगातील सर्वांत मोठ्या व्यापारी कंपन्यापैकी एक आहे. देशातील ४०% वर वित्तीय कंपन्या ग्रेटर माँट्रिऑलमध्ये एकवटलेल्या आहेत. देशातील पहिली बँक ‘बँक ऑफ माँट्रिऑल’मध्ये (स्था. १८१७), ४९ मजली उंचीची ‘रॉयल बँक ऑफ कॅनडा’ यांची मुख्य कार्यालये माँट्रिऑलमध्येच आहेत.
माँट्रिऑलमधून तीन फ्रेंच व एक इंग्रजी अशी चार दैनिके प्रसिद्ध होतात. सहा फ्रेंच, तर पाच इंग्रजी नभोवाणी केंद्रे तसेच इंग्रजी व फ्रेंच प्रत्येकी दोन दूरचित्रवाणी केंद्रे शहरात आहेत.
उत्तर अमेरिकेतील आघाडीचे सांस्कृतिक केंद्रे म्हणून माँट्रिऑलची ख्याती आहे. येथील नृत्य, संगीत यांविषयीच्या संस्था (‘माँट्रिऑल सिंफनी ऑर्केस्ट्रा’, ‘इंटरनॅशनल थिएटर’ हे रंगमंदिर), ग्रंथालये (माँट्रीऑल सिटी लायब्ररी- ६·५० लक्ष फ्रेंच, ३·५० लक्ष इंग्रजी, १०,००० इतर भाषांतील ग्रंथ फ्रेझर हिक्सन लायब्ररी, क्वीबेक नॅशनल लायब्ररी) संग्रहालये (‘माँट्रिऑल म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स’ स्था. १८६०, ‘म्यूझीयम ऑफ कंटेंपररी आर्ट’, ‘शॅटो दे रॅमझी’ हे ऐतिहासिक संग्रहालय, पेंग्विन, प्रशिक्षित डॉल्फिन व जगातील निवडक मत्स्यप्रकार असलेले ‘माँट्रिऑल मत्स्यालय’, डाऊ खगोलालय), सुंदर चर्चवास्तू (३०० हून अधिक चर्चवास्तू ‘सेंट पॅट्रिक्स’ हे गॉथिक चर्च, ‘नोत्रदाम पॅरिश चर्च’), सुनियोजित उद्याने (माउंट रॉयल पार्क, ला फाँतेन, मॅझोनव्ह). ‘मॅन अँड हिज वर्ल्ड’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन यांकरिता माँट्रीऑल प्रसिद्ध आहे. १९६७ मध्ये येथे ‘एक्स्पो ६७’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले. बेसबॉल, फुटबॉल व हॉकी हे येथील आवडते क्रीडाप्रकार होत. प्रतिवर्षी सु. ४५ लक्ष पर्यटक माँट्रिऑलला भेट देतात. देशात प्रथमच माँट्रिऑल येथे १९७६ मध्ये ऑलिंपिक सामने भरविण्यात आले. ऑलिंपिक सामन्यांच्या इतिहासात येथील सामन्यांना सर्वाधिक (सु. १४० कोटी डॉ.) खर्च आला.
गद्रे, वि. रा.
“