माँटपील्यर : अमेरिकेतील व्हर्माँट राज्याची राजधानी तसेच प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ८,२४१ (१९८०). हे बर्लिंग्टनच्या आग्नेयीस सु. ६० किमी., ग्रीन पर्वतातील प्रमुख खिंडीच्या मार्गावर, अप्पर विनुस्की नदीकाठी वसलेले आहे.
कर्नल जेकब डेव्हिस याने १७८९ मध्ये येथे वसाहत केली व फ्रान्समधील माँपेल्ये शहरावरून यास हे नाव दिले. १८०५ मध्ये हे व्हर्माँट राज्याची राजधानी बनले. राज्यातील बहुतेक सर्व विमाकंपन्यांची प्रधान कार्यालये येथे आहेत. याशिवाय दुग्धव्यवसाय, लाकूडकाम, प्लॅस्टिक, कापड हे उद्योगही विकास पावले आहेत. तसेच ग्रॅनाइटच्या खाणीच्या सानिध्यामुळे त्याच्या विविध वस्तू आणि पुतळे तयार करण्याचा व्यवसाय येथे चालतो. येथे व्हर्माँट महाविद्यालय व व्हर्माँट इतिहास परिषद आहे. येथील स्टेट हाऊस, वॉशिंग्टन काउंटी कोर्ट हाउस, युनायटेड चर्च ऑफ ख्राइस्ट, व्हिक्टोरियन गॉथिक ख्राइस्ट एपिस्कोपल चर्च, हबर्ड उद्यान, नगरभवन, वुड आर्ट गॅलरी, ड्यूई हाऊस इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. राज्यातील सर्वोच्च मॅन्सफील्ड शिखर जवळच आहे. माँटपील्यरचा परिसर निसर्गरम्य आहे. हिवाळ्यातील सहलीचे केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे.
गाडे, ना. स.