माल्ही, गोविंद : (५ ऑगस्ट १९२१–) आधुनिक सिंधी कादंबरीकार, कथाकार, एकांकिकालेखक आणिनिबंधकार. जन्म सिंध प्रांतातील (पाकिस्तान) थारूशाह येथे. शिक्षण एल्‌एल्‌.बी.१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावालागला. फाळणीनंतर १९४७ मध्ये ते भारतात मुंबईस येऊन स्थायिक झाले. सिंधीसाहित मंडळाचे (१९४९–५४) तसेच अखिल भारत सिंधी बोली साहित्य सभेचे ते १९६३पासून कार्यवाह आणि राज्य सिंधी साहित्य अकादेमीचे ते सदस्य आहेत.त्यांच्याप्यार जी प्यासह्या कांदबरीस १९७३ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार प्राप्त झाला तसेच १९५४ मध्ये सर्वोत्कृष्ट सिंधी कादंबरीकारम्हणून सिंधी साहित्यसंमेलनाचा पुरस्कारही मिळाला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात देशात जे एक सांस्कृतिक प्रबोधन घडून आले, त्याने गोविंद माल्ही यांचा पिंड घडवला गेला. ह्या महायुद्धोत्तर काळात कला आणि साहित्यावर प्रागतिक विचारांचा विशेषतः समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. सिंधी साहित्यातही त्याचे पडसाद उमटले. गोविंद माल्ही ह्या वैचारिक चळवळीच्या आघाडीवर होते.

फाळणीनंतर मुंबईच्या सिंधी साहित्यिक वर्तुळात माल्ही, किरात व उत्तम यांना त्रिमूर्ति म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी सिंधी साहित्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत सर्व तरुण लेखकांना त्यांनी एकत्र केली. एका लहानशा खोलीत ते दर शनिवारी भेटत, एकमेकांच्या लिखाणाची चर्चा करत, राष्ट्रापुढील प्रश्नाची व विशेषतः सिंधी जनतेच्या प्रश्नांची चर्चा करत. ह्या मंडळाने सिंधी साहित्यात मोलाची भर घातली आहे. माल्ही-किरात-उत्तम ही त्रिमूती फाळणीनंतरच्या सिंधी साहित्यातील प्रबोधनाचा झेंडा उंच राखणारी लेखकत्रयी म्हणून ओळखली जाते. तरुण लेखकांना त्यांनी साहित्यातील प्रगतिशील प्रवृत्तीच्या दिशेने तर नेलेच, पण सिंधी भाषा, लिपी व संस्कृती यांच्या रक्षण-संवर्धनासाठी झगडणाऱ्यांचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले.

आजच्या तरुण लेखकांत माल्ही हे आघाडीचे लेखक आहेत. त्यांनी विपुल लेखन केले आहे. २३ कादंबऱ्या, सु. ४० लघुकथा, ३५ एकांकिका, कित्येक निबंध आणि हिंदी, बंगाली, उर्दूतील अनेक पुस्तकांची सिंधीत भाषांतरे त्यांनी केली आहेत.त्यांच्या कादंबऱ्याची हिंदी, गुजराती व मलयाळम्‌मध्ये भाषांतरे झाली आहेत. अभिजात तसेच मध्ययुगीन साहित्य व साहित्यिक यांचे प्रगतिशील सामाजिक दृष्टीकोनातून त्यांनी मूल्यमापन केले आहे. त्यामुळे सिंधी साहित्यांचे ते आज एक मान्यवर समीक्षक मानले जातात.

सुरुवातीस मार्क्सवादाकडे त्यांचा कल असल्यामुळे त्यांचे सुरुवातीचे साहित्य हे प्रचारकी वाटते परंतु नंतर त्यांच्यावरील मार्क्सवादाचा पगडा कमी झाला आहे. मार्क्सवाद आणि वेदान्त यांचा गाभा आपण आता आत्मसात केला आहे. असे ते म्हणतात. नंतर त्यांनी ‘कलाकार मंडळा’ची स्थापना केली आहे. ह्या कलाकार मंडळा सोबत ते गावोगाव फिरतात व सिंधी श्रोत्यांपुढे संगीताचे कार्यक्रम करतात. या त्यांच्या कार्यक्रमांना हजारो सिंधी भाषी जनता उपस्थित असते. कार्यक्रमांत सिंधी संस्कृतीची जोपासना व संवर्धन करण्यावर त्यांचा भर असतो.

सिंधी लेखकांवर दोन प्रकारची जबाबदारी येऊन पडली आहे. त्याला लेखक म्हणून काम करावे लागते तसेच सिंधी समाजाचा रक्षणकर्ता म्हणूनही काम करावे लागते. विशिष्ट परिस्थितीमुळे आज जो नवा समाज निर्माण होतो आहे त्या समाजात नव्या पिढीतील लेखकांनी आणि विशेषेकरून ‘त्रिमूर्ती’ने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आपला सिंधी समाज जिवंत राहावा म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. साहित्यसंमेलने, चर्चासत्रे, लेखकांच्या भेटी, मासिके-नियतकालके व यांसारख्या इतर अनेक मार्गांनी त्यांनी हे उद्दिष्ट साध्य केले आहे.

माल्हींना मानवाच्या संपूर्ण इतिहासाची चांगली जाण आहे. ते स्वतः क्रांतिकारक नाहीत, तर शांततावादी आहेत. टॉलस्टॉय, चेकॉव्ह, शेक्सपिअर, टागोर व रॉमँ  रॉलां यासारख्या महान मानवतावादी लेखकांपासून त्यांना स्फूर्ती मिळाली आहे. राजिंदरसिंग बेदी, कृष्ण चंदर, यशपाल, अब्बास यांसारख्या भारतीय प्रगतिशील लेखरांचा प्रभावही त्यांच्यावर पडला आहे. या थोर लेखकांच्या अनेक कथा व कादंबऱ्याचा त्यांनी सिंधीत अनुवादही केला आहे.

गोबिंद माल्ही हे फाळणीनंतरच्या भारतातील एक थोर सिंधी कथा-कादंबरीकार मानले जातात. रेगीस्तानी फूल (१९४४) ह्या त्यांनी संपादित केलेल्या कथासंकलनात त्यांच्या कथांशिवाय इतर प्रगतीशील कथाकारांच्याही कथा संकलित आहेत. हरी हकदार ही त्यांची गाजलेली कथा असून ती त्यांनी १९४५ मध्ये लिहिली. त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती अशा : पखिअरा वलर खाँ विछुदिया (१९५३), देशी सेन खजान (२ री आवृ. १९५९), शरम बूति (१९५६), प्यार जी प्यास (१९७२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या होत. नीलम (५ उर्दू कथांचा अनु. १९४३.) कसूर वारू केरू (उर्दूचा अनु. १९४६), आंसू (१९५२), जीवन-साथी (१९५२), जिंदगीअ जे राह ते (१९५२), मन जो मीतु (१९५३), धरती माता (बंगालीचा अनु. १९५३), माउ (गॉर्कीच्या मदरचा अनु, १९५३), ताज महज (उर्दूचा अनु.) इ. त्यांच्या स्वतंत्र व अनुवादित कृती होत.

हिरानंदाणी, पोपटी रा. (इं.) शिरोडकर, द. स. (म.)