सदारंगाणी, हरूमल ईशरदास : (२२ ऑक्टोबर १९१३- ). सिंधी कवी व फार्सी भाषेतील विद्वान. ‘ खादिम ’ या टोपणनावानेही ते परिचित आहेत. जन्म शहदापूर, सिंध (पाकिस्तान) येथे. मुंबई विदयापीठातून ते फार्सी भाषा घेऊन एम्.ए. झाले (१९३९) व नंतर ‘ डी. जी. नॅशनल कॉलेज ’, हैदराबाद (सिंध) येथे अधिव्याख्याता म्हणून अध्यापन करू लागले. द पर्शियन पोएट्रस ऑफ सिंध ह्या गंथरूपात प्रसिद्ध झालेल्या प्रबंधाबद्दल त्यांना मुंबई विदयापीठाची पीएच्.डी. (१९४६) मिळाली. त्यांची ‘ डी. जे. सिंध कॉलेज ’ (कराची) येथे फार्सीचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली (१९४८). त्यांना संशोधन-शिष्यवृत्ती देऊन इराणमधील तेहरान विदयापीठातर्फे आमंत्रित करण्यात आले तेथे त्यांनी १९५४- ५६ दरम्यान अ शॉर्ट हिस्टरी ऑफ पर्शियन पोएट्नी इन इराण, इंडिया अँड सिंध हा प्रबंध फार्सीमध्ये सादर करून डी.लिट्. (१९५६) मिळविली. भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘ दिल्ली कॉलेज ’मध्ये (दिल्ली) सिंधीचा अधि-व्याख्याता म्हणून अध्यापन केले (१९४८- ५४). त्यानंतर आकाशवाणी केंद्रात फार्सी विभागाचे पर्यवेक्षक म्हणून त्यांनी निवृत्तीपर्यंत काम केले (१९५७ – ७४).

सदारंगाणी यांच्यावर सुरूवातीच्या काळात लेखराज अझीझ (१८९७- १९७१) या अगगण्य सिंधी कवीचा प्रभाव होता. त्यांची गंथसंपदा प्रामुख्याने सिंधी भाषेत असून त्यांच्या कविता मुंबई विदयापीठाच्या तत्कालीन मॅट्रिकच्या अभ्यासकमात अंतर्भूत केल्या होत्या. तेव्हा ते मुंबई विदयापीठातच बी.ए.च्या वर्गात शिकत होते (१९३५). रंगीन रूबैयुन (म.शी. बहुरंगी चतुष्पदया, १९५९) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यात फार्सी काव्याचा नमुनादर्श समोर ठेवून १९४ चतुष्पदया रचल्या आहेत. रंजक कल्पनांच्या घट्ट विणीच्या गुंफणीमुळे त्या वाचनानंद देतात. त्यांतील १०८ चतुष्पदया त्यांच्या हिंदी पदयानुवादासह भारतीय ज्ञानपीठाने प्रकाशित केल्या आहेत. प्रिहा जी बाखा (म. शी. पहाटेचा पहिला प्रकाश, १९७२) या काव्यसंग्रहातील बऱ्याचशा कविता मुक्तछंदात आहेत. चीख (म. शी. किंकाळी, १९७७) या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार (१९७८) लाभला त्यातील कविता मुक्तछंदात आहेत. त्यांतून आधुनिक संवेदना प्रकट करण्याकडे त्यांचा कल दिसतो. याशिवाय यू. जी. सी. चाही पुरस्कार त्यांना प्राप्त झाला (१९८१). दैनंदिन जीवनातील अनुभव व व्यक्तिनिष्ठ भावभावना यांची अभिव्यक्ती या दोन्ही काव्यसंग्रहांत आढळते. निसर्गसौंदर्य, सूक्ष्म व नाजुक भावनाविष्कार, प्रासंगिक विनोद, सामाजिक दुष्प्रवृत्तींवर टीका ही त्यांच्या काव्याची वैशिष्टये होत. त्यांची भाषाशैली प्रासादिक व साधी आहे. त्यांच्या खुशबू जो सफर (म. शी. सुगंधाचा प्रवाह, १९८०) या काव्यसंग्रहात ४५७ चतुष्पदया असून त्यांतून चिरंतन मानवी अनुभूतींची विविध रूपे प्रकटली आहेत. त्यांच्या कंवर परून पतर मैं (म. शी. कमळाची मुळे खोलवर पसरली आहेत, १९८४) या समीक्षागंथात शाह अब्दुल लतिफ या श्रेष्ठ सिंधी कवीच्या काव्याचा तौलनिक अभ्यास आहे. सदारंगाणींच्या अन्य साहित्यकृतींत रूहा दिनो रेलो (१९६३) हा काव्यसंग्रह कारवा ऐन काना (१९६६) हा निबंधसंगह बाबर नामो गुरू गोविंद सिंग, उमराव जान आदा ’, वळ्ळत्तोळ, विरहगे खान पोई जो चून्डा इ. साहित्यकृती आणि अनेक अनुवादित गंथांचा समावेश होतो. त्यांनी इंग्रजीमध्ये पर्शियन पोएट्रस ऑफ सिंध (१९५६) व फार्सीमध्ये पार्सी गूयाने हिंद व सिंध (१९७७) ही शोधप्रबंधपर पुस्तके लिहिली. साहित्य अकादेमीच्या सिंधी भाषेच्या सल्लगार मंडळाचे ते सदस्य (१९५७-७७) तसेच साहित्य अकादेमीची सर्वसाधारण परिषद व कार्यकारी मंडळ यांचेही ते सदस्य (१९६८-७७) आणि उपाध्यक्ष (१९८०-८४) होते.

निवृत्तीनंतर ते दिल्लीत उर्वरित जीवन लेखन-वाचनात व्यतीत करीत आहेत.

इनामदार, श्री. दे.