सचल सरमस्त : (१७३९-१८२९). सूफी पंथी सिंधी संतकवी. मूळ नाव अब्दुल वहाब. शाह, सामी व सचल या सूफी त्रैवर्गातील तो एक प्रसिद्ध कवी होता. ‘ सचल ’ किंवा ‘ सचू ’(सत्याचा उपासक) हे त्याने काव्यनिर्मितीसाठी स्वीकारलेले नाव. तो सदैव उन्मनी अवस्थेत असे, म्हणून त्याला ‘ सरमस्त ’ असे म्हणत. त्याचा जन्म दारजन (खैरपूर संस्थान, सिंध प्रांत) येथे झाला. सलाह उद्-द्दिन हे त्याच्या वडिलांचे नाव. सचलच्या बालपणीच ते वारले. त्यानंतर फकीर अब्दुल हक या त्याच्या चुलत्याने त्याचा सांभाळ केला. अब्दुल हक त्याचा ‘ मुर्शिद ’ (धर्मगुरू) व नंतर सासराही झाला. सचलने अनेक काव्यपंक्तींतून गुरूप्रशंसा केली आहे. सचलची पत्नी लग्नानंतर दोन वर्षांतच वारली. त्यानंतर त्याने पुन्हा लग्न केले नाही. सचलने फार्सी व अरबी या भाषांचे उत्तम अध्ययन केले होते. अवघे कुराण त्याला मुखोद्‌गत होते, त्यामुळे त्याला ‘ हाफिज ’ असे म्हणत असत. ‘ हाफिज दराजी ’ म्हणूनही तो ओळखला जातअसे. सचल आवैसी फकीर होता.तो ‘ शाइर-इ-हफ्त जबान ’ (सात भाषांचा कवी) होता. त्याने सिंधी, हिंदी, उर्दू, सरैकी, फार्सी, अरबी व पंजाबी या सात भाषांत काव्ये रचिली पण त्याने काव्य कधीही लिहून ठेवले नाही. ते मौखिक स्वरूपातच होते. दोहा, काफी, गझल, मस्नवी या प्रकारांत त्याने काव्यरचना केल्या. शेर महम्मद फरूकीने संकलित केलेल्या १८४८ मधील फार्सी काव्यसंग्रहात प्रथमच सचलच्या काही निवडक सिंधी भाषेतील कविता आढळल्या. पुढे मिर्झा अली कुली बेग याने दोन खंडांत त्याच्या काही कविता संपादित व संकलित करून प्रथमच मुद्रित स्वरूपात प्रसिद्घ केल्या (१९०३). त्यानंतर आगा सूफी यांनी काही कविता प्रकाशित केल्या (१९२२) तथापि उस्मान अली अन्सारी यांचा रिसालो सचल सरमस्त : सिंधी कलम (१९५८) आणि महम्मद सादिक राणिपुरी यांचा रिसालो सचल सरमस्त : सिरैकी कलम (१९५९) ह्या दोन संकलित- संपादित काव्यसंगहांत सचलच्या अनेक कवितांचा अंतर्भाव आहे. वरील सर्व संदर्भांचा परामर्ष घेऊन कल्याण बुलचंद अडवानी यांनी सचल सरमस्त जो चूंदा कलाम या नावाचा संकलित- संपादित काव्यसंग्रह प्रकाशित केला (१९६६). या संग्रहाचे देवनागरी सिंधी लिप्यंतर साहित्य अकादमीने प्रसिद्ध केल आहे (१९७०).

सचल संगीताचा विलक्षण भोक्ता होता. तबल्याच्या साथीवर सारंगी-वादन ऐकले, की त्याच्या मुखातून काव्यपंक्ती स्त्रवू लागत. त्याला उन्मनी अवस्थेत काव्य स्फुरत असे. गुढवादी कवी म्हणून तो लोकप्रिय होता. सत्य, प्रेम व सौंदर्य हाच खरा धर्म जाति-जातींत प्रेम असावे, असे संदेश त्याच्या काव्यातून त्याने प्रसृत केले. गाढ आध्यात्मिक अनुभूतीने त्याचे काव्य ओतप्रोत भरले असून सूफींच्या मेळाव्यात त्याची पदे आवडीने गायिली जातात. एकान्त व मौन ही साधनेची अविभाज्य अंगे त्याने मानली. त्याच्या प्रमुख शिष्यांत यूसिफ, याकूब व बेदिल यांचा समावेश होतो. याशिवाय रूकीबाई नावाची एक धार्मिक वृत्तीची हिंदू महिला त्याची शिष्या होती. तिने गुरूपदेशाच्या प्रसारार्थ सर्व जीवन व्यतीत केले. दारजन येथे त्याने देहत्याग केला, तेथेच त्याची कबर आहे.

इनामदार, श्री. दे.