मार्नीक्‌स, फिलिप्स व्हान : (१५४०–१५ डिसेंबर १५९८). डच धर्मशास्त्रवेत्ता, कवी आणि लेखक, ब्रूसेल्स येथे जन्मला. लूव्ही, पॅरिस आणि डोल येथे त्याचे शिक्षण झाले. पुढे त्याने फ्रेंच धर्मशास्त्रवेत्ता आणि ख्रिस्ती धर्मसुधारक जॉन कॅल्व्हिन ह्याच्या पंथाचा स्वीकार केल्यावर जिनीव्हा येथे त्याने धर्मशास्त्राचे अध्ययन केले.

लॅटिन आणि फ्रेंच ह्या भाषांत त्याने धर्मशास्त्रविषयक बरेच लेखन केले आहे. तथापि रोमन कॅथलिक पंथाविरुद्ध त्याने लिहिलेल्या ‘द बीहाइव्ह ऑफ द होली रोमन चर्च’ (१५६९, इं. शी.) ह्या उपरोधप्रचुर गद्यलेखनाबद्दल तो विशेष प्रसिद्ध आहे. डेव्हीडच्या साम्सचे त्याने सुंदर भाषांतरही केले. नेदर्लंड्‌सचे राष्ट्रगीत असलेली ‘Wilhelmus Van Nassouwen’ ही कविता त्याच्या नावावर मोडते.

लेडन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.