मार्थोमाइट पंथ (चर्च) : भारतातील एक ख्रिस्ती धर्मपंथ. मूळ नाव ‘मार थोमा सिरियन चर्च ’. येशू ख्रिस्ताचा एक शिष्य संत थॉमस (टॉमस) याने इ. स. पहिल्या शतकात ‘थॉमस ख्रिस्ती चर्च’ केरळमध्ये मलबार प्रदेशात स्थापन केले, असा पारंपारिक विश्वास आहे. या चर्चचे बिशप सिरियामधून यायचे. पुढे इस्लामी विस्तारामुळे इतर ख्रिस्तीजनांशी असलेले त्यांचे संबंध तुटले. ख्रिस्ती असलेले पोर्तुगीज लोक भारतात आल्यावर मात्र या मलबारमधील ख्रिस्ती लोकांना आनंद झाला. तथापि गोव्याचे आर्चबिशप आलिएक्सो डी मिनेजीस यांनी डियंपर येथील धर्मसभेत (१५९९) केरळमधील सिरियन चर्चमध्ये पाश्चिमात्य चर्चचे रीतिरिवाज आणि उपासनापद्धती आणून सुधारणा घडवून आणण्याचे आणि प्रत्यक्ष रोमशी जास्त जवळचे संबंध जोडण्याचे प्रयत्न केले. हे नवीन रीतिरिवाज आणि उपासनापद्धती यांच्याविरुद्ध थॉमस ख्रिस्ती चर्चच्या लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला तथापि शेवटी केरळमधील ख्रिस्तीजनात दुफळी निर्माण झालीच. त्यांच्यापैकी अखेर दोन तृतीयांश लोक रोमच्या बाजूला राहिले, तर उरलेल्या एक तृतीयांश लोकांनी स्वतंत्रपणे आपले ‘मलंकारा चर्च’ स्थापन केले. हे चर्च सध्या ‘सिरियन ऑर्थोडॉक्स चर्च’ या नावाने ओळखले जाते. या चर्चचाही एक लहान गट ब्रिटीश राजवटीत ‘चर्च ऑफ इंग्लंड’ मध्ये समाविष्ट झाला. कोट्ट्यम सेमिनरीतील एक शिक्षक अब्राहम मालपान हा मलंकारा चर्चच्या एका गटाचा नेता बनला. त्याचा पुतण्या मॅथ्यू अथानासियस आणि बहुसंख्य गटाचा प्रतिनिधी पुलिकोत जोसेफ ऊर्फ पाचवा डायोनिशिअस हे आपसात सत्तेसाठी झगडत होते. १८७५ मध्ये सिरियन पेट्रिआर्कने केरळला दिलेल्या भेटीमुळे पाचव्या डायोनिशिअसची म्हणजे पुलिकोत जोसेफची बाजू अधिक बळकट झाली. त्याच वर्षी मॅथ्यूचे निधन झाले. लवकरच चर्चची सर्व मिळकत पाचव्या डायोनिशिअसच्या म्हणजे बहुसंख्य गटाच्या ताब्यात आली आणि मॅथ्यूच्या गटाला काहीही मिळाले नाही. तेव्हा त्याच्या गटाने ‘ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च’ ची स्थापना केली (१८७५). त्याला ‘मार थोमा सिरियन चर्च’ किंवा ‘मार्थोमाइट पंथ (चर्च)’ अशीही नावे आहेत. १९७१ मध्ये केरळामध्ये एकूण ४४,९४०,८९ ख्रिस्ती लोक होते. त्यातील मार्थोमाइट पंथाचे फक्त ३,१०,०९२ इतके लोक होते. हा पंथ ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’ आणि ‘सिरियन ऑर्थोडॉक्स चर्च ’ या दोन्ही चर्चेसपासून आजपावेतो स्वतंत्रच राहिला आहे.
संदर्भ : 1. Podipara, P. J. The Thomas Christians, London, 1970.
2. Perumalil, H. C. Hambye, E. R. Ed. Christianity in India – A History in Ecumenical Perspective, Alleppey, 1972.
लेदलें, मॅथ्यू–रायनर