मार्जारनेत्री: (कॅट्स आय). खनिज प्रकार. घुमटाकार किंवा मदारघाटी (बहिर्गोलाकार) कापून चांगली झिलई केली असता ज्या खनिजामध्ये (रत्नामध्ये) प्रकाशाचा एक आडवा, चकचकीत बारीक पट्टा (रेघ) दिसतो, अशा खनिजाला मार्जारनेत्री म्हणतात. असा खडा उभ्या वा आडव्या दिशेत गोल फिरविल्यास त्याच्या पृष्ठावरील हा प्रकाशाचा पट्टा हलताना दिसतो अथवा ⇨ ओपल या खनिजाप्रमाणे याचे रंग बदलताना दिसतात. त्यामुळे मांजराने अंधारात बुबुळ फिरविल्याप्रमाणे भास होतो, त्यावरूनच याचे मराठी व इंग्रजी नाव पडले आहे. या दृश्य परिणामाला ‘मार्जारनेत्री परिणाम’ म्हणतात. विशेषकरून ⇨ क्रिसोबेरील या खनिजाच्या अशा प्रकाराला मार्जारनेत्री म्हणतात परंतु हा परिणाम इतर कित्येक खनिजांतही आढळतो व त्यानांही मार्जारनेत्री म्हटले जाते मार्जारनेत्रीचा उपयोग बहुतकरून रत्न म्हणून केला जातो.
क्रिसोबेरीलच्या अशा प्रकाराला सायमफेन, खरी किंवा पौर्वात्य (ओरिएंटल) मार्जारनेत्री म्हणतात. याची कठिनता ८·५, वि.गु. ३·५–३·८, चमक काचेसारखी ते रेशमासारखी, भंजन शंखाभ व रंग उदसर पिवळा असतो [→ खनिजविज्ञान]. यात समांतर मांडल्या गेलेल्या वडीच्या वा नळीच्या आकाराच्या पोकळ्या असतात व त्यांच्यावरून प्रकाश परावर्तित झाल्याने प्रकाश-पट्टा दिसतो. मधासारखा रंग असणाऱ्या या रत्नाची किंमत तेवढ्याच आकारमानाच्या हिऱ्याएवढी अथवा शुद्ध पाचूएवढी होते. श्रीलंका, ब्राझील व चीनमध्ये याचे चांगले नमुने आढळतात. भारतात किशनगढ (राजस्थान) येथे क्रिसोबेरील आढळते मात्र त्यात भेगा व इतर दोष असल्याने त्यावर पैलू पाडण्याचे काम करता येत नाही [→ क्रिसोबेरील].
क्वॉर्ट्झ या खनिजाचा मार्जारनेत्री प्रकार सर्वाधिक सामान्यपणे आढळतो. त्याला कॅल्सेडोनी मार्जारनेत्री म्हणतात. या पौर्वात्य देशांत आढळत असला, तरी वरच्या प्रकारापेक्षा वेगळा ओळखण्यासाठी त्याला पाश्चात्य (ऑक्सिडेंटल) मार्जारनेत्री असेही म्हणतात. याचा रंग करडसर हिरवा, पिवळा वा फिकट पिवळा, कठिनता ७ व वि. गु. २·६ असते.यातील मार्जारनेत्री परिणाम व रंग हे ॲस्बेस्टसच्या सूक्ष्म व समांतर तंतूंमुळे आलेले असतात. प्रत्यक्ष क्वॉर्ट्झ तंतुमय असल्यामुळेही हा परिणाम दिसू शकतो.
क्रॉसिडोलाइट किंवा आफ्रिकन मार्जारनेत्रीला सामान्यतः व्याघ्रनेत्री (टायगर्स आय) म्हणतात व हा प्रकार विशेषकरून द. आफ्रिकेत सापडतो. यात क्रॉसिडोलाइटाच्या विशिष्ट दिशेत मांडल्या गेलेल्या तंतूंच्या जागी सिलिका आल्याने हा परिणाम दिसतो.
कुरुविंदाची मार्जारनेत्री म्हणजे कुरूविंदाचा अपूर्ण तारांकित प्रकार असतो व त्यामुळे त्यात तारकाकृतीऐवजी प्रकाश-पट्टा दिसतो.
यांशिवाय अँफिबोल, ॲपेटाइट, विलेमाइट, स्कॅपोलाइट, डायोप्साइड, फायब्रोलाइट, ऑर्थोक्लेज, अल्बाइट, कायनाइट, वैदूर्य, कॉर्नेरूपाइन, प्रेहनाइट, सॅटेलाइट, ट्रेमोलाइट इ. खनिजांमध्येही मार्जारनेत्री परिणाम आढळू शकतो.
पहा : रत्ने.
ठाकूर, अ. ना.