मार्कोनी, मार्केझे गूल्येल्मो : (२५ एप्रिल १८७४–२० जुलै १९३७). इटालियन भौतिकीविज्ञ. बिनतारी तारायंत्रविद्येच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल मार्कोनी यांना ⇨ कार्ल फेडिंनांट ब्राउन यांच्या समवेत १९०९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. इतर शास्त्रज्ञांनी विशद केलेल्या विद्युत् चुंबकत्वासंबंधीच्या तत्त्वांचा उपयोग अवकाशातून संदेश प्रेषण करण्यासाठी मार्कोनी यांनी केला, तसेच एकाच वेळी अनेक ग्राही स्थानकांशी बिनतारी विद्युत् संदेशवहन साधण्याची व्यावहारिक शक्यता उपयोगातही आणली.

गूल्येल्मो मार्कोनी

मार्कोनी यांचा जन्म बोलोन्या येथे झाला.बोलोन्या व फ्लॉरेन्स येथे खाजगी रीत्या शिक्षण घेतल्यावर ते लेगहॉर्न येथील तांत्रिक शाळेत शिक्षणासाठी गेले. विद्यार्थिदशेतच त्यांना भौतिकीय व विद्युत् शास्त्रांची गोडी लागली. त्यांनी जेम्स क्लार्क मॅक्सवेल, हाइन्‍रिख हर्ट्‌झ, सर ऑलिव्हर लॉज व इतरांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केला. १८९४ मध्ये त्यांनी बोलोन्यानजीकच्या आपल्या वडिलांच्या इस्टेटीवर बिनतारी संदेशवहनासंबंधी प्रयोग करण्यास प्रारंभ केला. त्याकरिता त्यांनी उपयोगात आणलेल्या उपकरणसंचात विद्युत् दाब वाढविण्यासाठी ⇨ प्रवर्तन वेटोळे, प्रेषण स्थानी मॉर्स चावीने [→ तारायंत्रविद्या] नियंत्रित होणारा ठिणगी विसर्जक व ग्राही स्थानी रेडिओ तरंगांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) एक संवाहक चूर्णयुक्त नलिका अशा ओबडधोबड स्वरूपाच्या उपकरणांचा समावेश होता. अल्प अंतरासाठी प्राथमिक प्रयोग केल्यानंतर त्यांनी अभिज्ञातक नलिकेत सुधारणा केली आणि मग एका खांबावर वरच्या टोकाला एक धातूची पट्टी वा दंडगोल व त्याला तारेने जोडलेली तशाच प्रकारची पट्टी खांबाच्या तळाला बसवून तयार होणाऱ्या उभ्या आकाशकाचा (एरियलचा) उपयोग केल्याने संदेशवहनाचा पल्ला वाढतो, असे त्यांनी पद्धतशीर चाचण्या घेऊन सिद्ध केले. अशा प्रकारे संदेशवहनाचा पल्ला सु. २·५ किमी. इतका वाढविण्यात त्यांना यश मिळाले. याच काळात प्रारित (तरंगरूपी) विद्युत् ऊर्जा सर्व दिशांनी पसरण्याऐवजी शलाकेच्या स्वरूपात केंद्रित करण्याच्या दृष्टीने त्यांनी आकाशकाभोवती परावर्तक वापरण्यासंबंधीही प्रयोग केले.

आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यास त्यांना इटलीत फारसे प्रोत्साहन न मिळाल्याने १८९६ मध्ये ते इंग्‍लंडला गेले. तेथे टपाल खात्याचे मुख्य अभियंते विल्यम प्रीस यांच्याशी मार्कोनी यांची ओळख झाली आणि त्याच वर्षी जून महिन्यात बिनतारी तारायंत्रविद्येच्या एका प्रणालीचे त्यांना जगातील पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. त्या व पुढील वर्षी त्यांनी आपल्या प्रणालीची अनेक यशस्वी प्रात्यक्षिके करून दाखवली आणि त्यांतील काहींत त्यांनी आकाशकाकरिता अधिक उंची मिळविण्यासाठी फुग्याचा (बलून्सचा) व पतंगांचा उपयोग केला. सॉल्झबरी मैदानावर सु. ६·५. किमी. व ब्रिस्टल खाडीपार सु. १४·५ किमी. अंतरावर संदेश पाठविण्यात त्यांना यश मिळाले. मार्कोनी यांच्या चाचण्या व त्यांवरील प्रीस यांची व्याख्याने यांना इंग्‍लंडमध्ये व परदेशातही खूप प्रसिद्धी मिळाली. जून १८९७ मध्ये मार्कोनी यांनी इटालियन सरकारला ला स्पेत्स्या येथे जमिनीवर प्रेषण स्थानक उभारून सु. १९ किमी. अंतरावरील इटालियन युद्धनौकांना बिनतारी संदेश पाठविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तथापि या संदेशवहन पद्धतीच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दल बरीच साशंकता व्यक्त करण्यात आली आणि त्यात आर्थिक गुंतवणूक करण्याची उत्कंठा कोणी दाखवली नाही. तरीही मार्कोनी यांचे मावस बंधू व अभियंते जेम्सन डेव्हिस यांनी त्यांच्या एकस्वाला भांडवल पुरविले आणि त्यांच्या मदतीने वायरलेस टेलिग्राफ अँड सिग्‍नल कंपनी लि. जुलै १८९७ मध्ये स्थापन झाली. या कंपनीचे पुढे १९०० मध्ये मार्कोनीज वायरलेस टेलिग्राफ कंपनी लि. असे नामांतर करण्यात आले. पहिली काही वर्षे कंपनीने प्रामुख्याने रेडिओ तारायंत्राची उपयुक्तता लोकांच्या निदर्शनास आणण्याचे प्रयत्‍न केले. १८९९ मध्ये मार्कोनी यांनी फ्रान्स व इंग्‍लंड यांत इंग्‍लिश खाडीपार सु. ५० किमी. अंतरावर बिनतारी संदेशवहन प्रस्थापित केले. त्याच वर्षी ब्रिटिश युद्धनौकांनी सु. १२० किमी. अंतरावरून बिनतारी संदेशांची देवाणघेवाण केली.

सप्टेंबर १८९९ मध्ये मार्कोनी यांनी अमेरिकन चषकाच्या नौकाशर्यतीच्या प्रगतीची वार्ता न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांना कळविण्यासाठी दोन अमेरिकन जहाजांवर बिनतारी सामग्री बसविली. या प्रात्यक्षिकाच्या यशामुळे जगात सर्वत्र खळबळ उडाली आणि यातूनच अमेरिकन मार्कोनी कंपनीची स्थापना झाली. पुढील वर्षी जमिनीवरील स्थानके व जहाजे यांत बिनतारी तारायंत्र सामग्री बसविण्यासाठी व ती उपयोगात आणणारी सेवा पुरविण्यासाठी मार्कोनी यांनी बिनतारी तारायंत्रविद्येच्या उपकरणसंचातील सुधारणेसंबंधीचे आपले सुप्रसिद्ध एकस्व मिळविले. सर ऑलिव्हर लॉज यांनी पूर्वी केलेल्या कार्यावर आधारलेल्या या एकस्वामुळे अनेक प्रेषण स्थानकांना एकमेकांत व्यत्यय न येता निरनिराळ्या तरंगलांब्यांवर कार्य करणे शक्य होऊ लागले.


काही प्रख्यात गणितज्ञांनी असे मत व्यक्त केले होते की, पृथ्वीच्या वक्रतेमुळे विद्युत् तरंगांद्वारे १५०–३०० किमी. इतक्या अंतराच्या मर्यादेपर्यतच संदेशवहन व्यवहार्य होऊ शकेल. तथापि मार्कोनी यांनी डिसेंबर १९०१ मध्ये कॉर्नवॉल (इंग्लंड) मधील पॉल्ड्यू यथील स्थानकापासून प्रषित झालेले संदेश अटलांटिक महासागर पार करून न्यू फाउंडलंडनमधील सेंट जॉन्स येथे मिळविण्यात यश प्राप्त केले. ही घटना म्हणजे पुढील ५० वर्षांत झालेल्या रेडिओ संदेशवहन, प्रेषण व मार्गनिर्देशन सेवा यांत झालेल्या प्रचंड विकासाचा प्रारंभ होता आणि मार्कोनी यांनी स्वतःही त्यात महत्वाची कामगिरी बजावली.

मार्कोनी यांनी १९०२–१२ या काळात अनेक नवीन शोधांची एकस्वे मिळविली. १९०२ मध्ये अमेरिकेच्या ‘फिलेडेल्फिया’ या जहाजावरील प्रवासात त्यांना दिवसा १,१०० किमी. अंतरावरील व रात्री ३,२०० किमी. अंतरावरील संदेश मिळविण्यात यश आले. अशा प्रकारे काही रेडिओ तरंग वातावरणाच्या वरच्या थरापासून परावर्तित होतात आणि काही वेळा दिवसापेक्षा रात्रीची परिस्थिती रेडिओ प्रेषणाला अनुकूल असते, याचा त्यानी प्रथमच शोध लावला. (दिनप्रकाश परिणाम). याचे कारण म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे वातावरणाचा खालचा थर आयनीभूत (विद्युत्‌ भारित अणु-रेणूंनी बनलेला) झाल्याने तो विद्युत्‌ संवाहक होऊन तरंगांच्या ऊर्ध्वगामी प्रवासाला मर्यादा पडते. त्याच वर्षी त्यांनी आपल्या चुंबकीय शोधकाचे (अभिज्ञातकाचे) एकस्व मिळविले व पुढे अनेक वर्षे हा शोधक प्रमाणभूत बिनतारी ग्राही म्हणून वापरात होता. त्यानंतरच्या तीन वर्षांत त्यांनी क्षैतिज (क्षितिजसमांतर) आकाशक विकसित केला व त्याचे १९०५ मध्ये एकस्वही मिळविले. या दोन प्रयुक्तींमुळे रेडिओ संदेशवहनात फार मोठी सुधारणा झाली. डिसेंबर १९०२ मध्ये प्रथम नोव्हास्कोशातील ग्लेस वे व नंतर मॅसॅचूसेट्‍समधील केप कॉड येथील स्थानकांमधून पॉल्ड्यू येथे पहिले संपूर्ण संदेश पाठविण्यात त्यांना यश लाभले. या चाचण्यांमुळे इटलीतील बारी व माँटनीग्रोतील अँव्हिदारी यांच्या दरम्यान पहिली कमी पल्ल्यांची सार्वजनिक बिनतारी तारायंत्र सेवा स्थापन झाली आणि १९०७ मध्ये ग्लेस वे व आयर्लंडमधील क्लिफडन यांच्या दरम्यान अटलांटिकपार व्यापारी सेवा सुरू करण्यात आली. १९१२ मध्ये त्यांनी अखंडितपणे तरंग निर्माण करणाऱ्या ‘समयोचित-ठिणगी’ प्रणालीचे महत्त्वाचे एकस्व मिळविले. १९१० मध्ये ८,००० मी. तरंगलांबीचा उपयोग करून त्यांनी क्लिफ्‌डेन येथून ९,६०० किमी. अंतरावरील ब्वेनस एअरीज (अर्जेंटिना) येथे संदेश मिळविले. दोन वर्षानंतर मार्कोनी यांनी आणखी नव्या क्लृप्त्यांचा उपयोग करून प्रेषण व ग्रहण यांत इतकी सुधारणा केली की, महत्त्वाची लांब पल्ल्याची स्थानके प्रस्थापित करणे शक्य झाले. या वाढलेल्या कार्यक्षमतेमुळे सप्टेंबर १९१८ मध्ये इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला पहिला रेडिओ संदेश पाठविणे मार्कोनी यांना शक्य झाले.

पहिल्या महायुद्धात १९१४ मध्ये त्यांनी इटालियन भूसेनेत लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला, पुढे त्यांना कॅप्टन म्हणून बढती मिळाली आणि १९१६ मध्ये कमांडर म्हणून नाविक दलात त्यांची बदली झाली. १९१७ मध्ये अमेरिकेस गेलेल्या इटालियन शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. १९१९ मध्ये पॅरिस येथील शांतता परिषदेसाठी इटलीचे पूर्णाधिकरी प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. युद्धकाळातही त्यांनी आपले प्रयोगकार्य चालू ठेवले होते. आकाशकाभोवती परावर्तक वापरून अधिक लहान तरंगाचा उपयोग केल्यास प्रेषित संदेश शत्रूने मध्ये अडविण्याचा संभव कमी होऊन संदेशाच्या शक्तीतही वाढ होते, असे १९१६ मध्ये त्यांना दिसून आले. इटलीमध्ये याच्या चाचण्या घेतल्यानंतर मार्कोनी यांनी ब्रिटनमध्ये आपले कार्य पुढे चालू ठेवले. १५ मी. तरंगलांबीवर ३२ ते १६० किमी. पल्ल्यातील संदेश मिळविले. १९२३ मध्ये त्यांनी ‘इलेक्ट्रा’ या आपल्या खास सामग्री बसविलेल्या नौकेवर संदेश मिळाले आणि ते वेल्समधील कर्नरव्हन येथील शेकडोपट मोठी तरंगलांबी वापरणाऱ्या व १०० पट शक्तिमान असलेल्या प्रेषकापासून मिळणाऱ्या संदेशांपेक्षा खूपच जोरदार होते. अशा प्रकारे लघुतरंग बिनतारी संदेशवहणाच्या विकासाला प्रारंभ झाला आणि इष्ट दिशेत उर्जा केंद्रित करणाऱ्या शलाका आकाशक प्रणालीसही लघुतरंग संदेशवहन पद्धती बहुतेक सर्व आधुनिक लांब पल्ल्याच्या रेडिओ संदेशवहनाला आधारभूत ठरली आहे. १९२४ मध्ये मार्कोनी कंपनीला इंग्लंड व ब्रिटिश राष्ट्रकुलातील देश यांच्या दरम्यान लघुतरंग संदेशवहन प्रस्थापित करण्याचे काम मिळाले आणि इंग्‍लंड व कॅनडा यांना जेडणारे पहिले शलाका स्थानक १९२६ मध्ये सूरू झाले.

मार्कोनी यांनी १९३१ मध्ये आणखी लघुतर (सु.०·५ मी. लांबीच्या) तरंगांच्या प्रसरणावर संशोधन करण्यास प्रारंभ केला. १९३२ मध्ये त्यांनी व्हॅटिकन सिटी न पोप यांचे कास्तेल गांदॉल्फो येथील उन्हाळी निवासस्थान यांच्या दरम्यान जगातील पहिली सूक्ष्मतरंग रेडिओ दूरध्वनी प्रणाली बसविली. दोन वर्षानंतर त्यांनी सेस्त्री लेव्हांते येथे जहाजांच्या मार्गनिर्देशनासाठी आपल्या सूक्ष्मतरंग रेडिओ शलाकेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. पुढे ५५ सेमी. इतक्या अल्प लांबीच्या तरंगाच्या पल्ल्यालाही क्षितिजीपुरती किंवा प्रेषक व ग्राही यांतील प्रकाशीय अंतराइतकीच मर्यादा नसते. असे मार्कोनी यांनी दाखवून दिले. १९२२ मध्ये त्यांनी अमेरिकन इन्सिटट्यूट ऑफ रेडिओ एंजिनिअर्स चा संस्थेत दिलेल्या व्याख्यानात ⇨ रडारसंबंधी भाकित केलेले होते आणि १९३५ मध्ये इटलीमध्ये त्यांनी त्याच्या तत्त्वाचे व्यवहार्य प्रात्यक्षिकही करून दाखविले.

मार्कोनी त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ नोबेल पारितोषिकाखेरीज इतर अनेक बहुमान मिळाले. त्यांत इटलीचा नाइट हा किताब (१९०२), रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे अल्बर्ट् पदक, अमेरिकेची फ्रँकलिन व फ्रिट्‌झ पदके(१९०९), ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर (१९१४), इटलिचे लष्करी पदक (१९१९) व मार्केझ ही परंपरागत पदवी हे विशेष उल्लेखनीय होते. १९२९ मध्ये त्यांची इटलीच्या सिनेटवर नियुक्ती झाली व पुढील वर्षी रॉयल इटालियन ॲकॅडेमीच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. ते रोम येथे मृत्यू पावले.  

भदे, व. ग.