मार्केझान : द. पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन द्वीपसमूहातील एक वैशिष्ट्यपूर्ण आदिम जमात. मार्केझास बेटांच्या किनारपट्टीवर यांची प्रामुख्याने वस्ती आढळते. सामोअन, हवाईअन, टॉगन, माओरी, मार्केझान यांसारख्या अनेक आदिवासी जमातींना उद्देशून पॉलिनीशियन ही सर्वसाधारण संज्ञा आधुनिक मानवशास्त्रज्ञ देतात. हे लोक मुख्यतः कॉकेशियन वंशाचे असून उंचपुरा बांधा, तपकिरी वर्ण, काळे कुरळे केस, बारीक पिंगट डोळे, रुंद चेहरा, काहीसे पसरट पण टोकदार नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्री-पुरुषांत गोंदण्याची चाल आहे. हे लोक मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील पॉलिनीशियनची बोली भाषा बोलतात.

हे लोक दर्यावर्दी म्हणून ख्यातनाम असून मच्छीमारी व शेती हे व्यवसाय करतात. त्यांची प्रमुख पिके टॅपिओका, रताळी, भाकरीचे झाड, आंबा, सुरण, आर्वी, कॉफी व नारळ असून नारळाचे खोबरे ते निर्यात करतात.

त्यांची खेडी छोटी असून बहुधा एका खेड्यात एकाच विस्तारित कुटुंबातील नातेवाईक राहतात. घराचा चौथरा (तोडुआ) जेवढा मोठा तेवढे ते कुटुंब श्रीमंत व प्रतिष्ठित मानले जाते. दगडी पायावर पण लाकडाचा जास्तीतजास्त उपयोग करून ते घरे बांधतात. काष्ठशिल्पांच्या कलेसाठी ही जमात प्रसिद्ध आहे. सुरुवातीस हे लोक अर्धनग्‍न स्थितीत वावरत असत आणि ते नरमांसभक्षकही होते पण उत्तरोत्तर त्यांच्या राहणीमानात बदल होत गेला. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे वारसा हक्क ज्येष्ठ मुलाकडे जातो. समूह-विवाहाची पद्धत हे या जमातीचे एक वैशिष्ट्य! त्यांच्यात स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे भ्रातृ-बहुपतित्वाची प्रथा अस्तित्वात होती. बहुभर्तृत्व व बहुपत्‍नीकत्व या दोन्ही प्रथांचा एकत्रित अवलंब म्हणजे समूहविवाह असे म्हणता येईल. अलीकडे स्त्रियांचे प्रमाण वाढत असल्यामुळे या प्रथेत बदल होऊ लागला आहे.

संदर्भ : Suggs, R. C. Marquesan Sexual Behaviour, New York, 1965.

देशपांडे, सु. र.