मार्कंडादेव : महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील वास्तुशिल्पशैलीसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. ते वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर चामोर्शी या तालुक्याच्या गावाच्या पश्चिमेस गडचिरोलीपासून ५२ किमी. वर वसले आहे. गावाची लोकसंख्या ६०० (१९८१) असून येथील मंदिरे व त्यांवरील शिल्पकला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. येथे दक्षिणवाहिनी वैनगंगा उत्तरवाहिनी झाल्यामुळे या ठिकाणास धार्मिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
वैनगंगा नदीच्या तीराजवळील उंच खडकावर श्रीमार्कंडेश्वर देवस्थान असून दक्षिणोत्तर ६३ मी. लांब व पूर्व-पश्चिम ५३ मी. रुंद अशा विस्तृत आयताकार प्रकारामध्ये हा नागरशैलीत बांधलेला मंदिर-समूह आहे. सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स याने १९२४–२ ५ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात येथे चोवीस मंदिरे असल्याचा उल्लेख केला आहे परंतु संद्यःस्थितीत या समुहात १८ मंदिरे विच्छिन्न अवस्थेत असून त्यांपैकी मार्कंडेय ऋषी, यमधर्म, मार्कंडेयाचा पिता मृकंड ऋषी आणि शंकर ही चार मंदिरे कलात्मक दृष्ट्या उल्लेखनीय आहेत. याही मंदिरांत मार्कंडेश्वर (मार्कंडेय ऋषी) हे पुर्वाभिमुख मंदिर शिल्पाकृतींचे वैपुल्य, भव्यता आणि सौंदर्य या दृष्टींनी अप्रतिम आहे. या मंदिराला पूर्व, दक्षिण व उत्तर बाजूंस अर्धमंडप असून त्यांवर पूर्वी शिखरे होती. अर्धमंडपांशिवाय सभामंडप, अंतराल व गर्भगृह असे इतर भाग आहेत. पूर्वेला नंदीमंडप आहे. त्याचे विधान तारकाकृती असून गूढमंडपातील रंगशिळा मध्यभागी नेहमीपेक्षा अधिक उंचीवर बांधली आहे. पावणेतीनशे वर्षापूर्वी वीज पडून या मंदिराचे फार नुकसान झाले. शिखर सभामंडपावर कोसळले व त्याचेही नुकसान झाले. तत्कालीन गोंड राजांनी (१४८०–१७५१) त्याचा जिर्णोद्धार केला पण पूर्ववत छत व शिखर त्यांना बांधता आले नाही.
मुख्य मंदिराचे बाह्यांग व अंतरंग शिल्पांनी अलंकृत असून देवदेवतांची वाहने (लांछने) त्यांच्याखाली दर्शविली आहेत. शिखरांवर वानरांच्या क्रीडा, बदकांचे खळप, हत्तिणींची प्रसूती, पक्ष्यांची शिकार वगैरे दृश्ये दाखविली आहेत. प्राणीसमूहांत वानर, वाघ, हत्ती व पक्षी आहेत. या मंदिरांच्या स्तंभांवर, विमानावर (छतावर) तसेच मंडोवरावर (अधिष्ठान व शिखर यांमधील भागावर) तीन रांगांत सुमारे चारशे स्वतंत्र शिल्पे आहेत. त्यांत देवदेवता, अष्टदिक्पाल, सुरसुंदरी आणि वाघ, सिंह, घोडा, हत्ती, एडका, मांजर इ. विविध प्रकारचे व्याल यांच्या आकृत्या आहेत. त्यांपैकी अर्ध्याहून अधिक मूर्ती शैव संप्रदायातील आहेत. विशेषतः त्या शिव-पार्वती व त्यांच्या श्रीगणेश, कार्तिकेय, भैरव आदी उपदेवता असून सप्तमातृका, विष्णुलक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, दशावतार, रामायण-महाभारतातील प्रसंग इत्यादींचे मनोहर शिल्पांकनही आहे. अप्सरांत वा सुरसुंदरींत विविध नृत्यांगना, दर्पणधारी, पुत्रवल्लभा, बासरीवादक, शालभंजिका इ. प्रकार असून सुरसुंदरींतील पत्रलेखिका, केशरचना करणारी अप्सरा, काटा काढणारी, कंदुक-क्रीडा करणारी, काजळ घालणारी इ. स्त्रियांची शिल्पे मोहक व प्रमाणवद्ध आहेत. नृत्यांच्या बहुढंगातील आणि त्रिभंगातील विभूषित स्त्री-प्रतीमा डोळ्यांना खिळवितात. वाली-सुग्रीवयुद्ध, लवकुश व श्यामकर्ण अश्व, भीम-दुर्योधन मल्लयुद्ध यांसारखे प्रसंग काही ठिकाणी खोदलेले आहेत. दोन पायांवर उभ्या स्थितीतील व्याल खजुराहो व्यतिरिक्त (मध्य प्रदेश राज्य) अन्यत्र आढळत नाहीत. यांशिवाय या मंदिरांच्या परिसरात एक शिल्पखंड आहे. त्यावर मुरलीधर कृष्ण, गोपालक कृष्ण, रामलक्ष्मण, सती जाणारी स्त्री वगैरे प्रतिमा आहेत. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला आदिशक्ती महिषासुरमर्दिनीचे, तर पूर्वेला नंदिकेश्वराचे छोटे मंदिर आहे. तसेच प्राकाराजवळच दशावताराचे एक मंदिर आहे. त्याच्या उत्तरेला मृकंड ऋषींचे मंदिर मार्कंडेय ऋषींच्या पित्याच्या स्मरणार्थ बांधले आहे. याशिवाय या समूहात घृणेश्वर, भुवनेश्वर, गणपती वगैरे अन्य मंदिरे आहेत. एकूण शिल्पकामात प्रणयी युगुले आणि नग्न मूर्तीही कोरलेल्या आहेत परंतु खजुराहोच्या तुलनेने त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. मृकंड ऋषींच्या मंदिरासमारील दक्षिण कोपऱ्यात दोन शिळा असून त्यांवर लेख खोदलेला आहे. त्यात मदिराचे बांधकाम करणाऱ्या कलाकारांपैकी बप्पन्नागश्री नावाच्या कलाकाराचा उल्लेख आहे.
सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, गोंड यांच्या आधिपत्याखाली हा प्रवेश असल्याचे उल्लेख ताम्रपट व शिलालेख यांतून मिळतात तथापि येथील मंदिराच्या बांधणीसंबंधी एकही लिखित पुरावा उपलब्ध नाही. येथील वास्तुशिल्पशैलीच्या धाटणीवरून कलासमीक्षकांनी या मंदिर-समूहांचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांच्यातही एकवाक्यता आढळत नाही. मंडोवरावरील त्रिस्तरीय मूर्तिपट्टांचा आभार घेऊन शां. भा. देव या मंदिरांचे साम्य खजुराहोशी दर्शवितात आणि त्याचा काळ इ. स. ११०० नंतरचा असावा, असे अनुमान काढतात तर वा. वि. मिराशी राष्ट्रकूटांची राजधानी मयूरखंडी म्हणजे मार्कंडी असण्याचा संभव व्यक्त करून राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद (कार. ७९३–८१३) याच्या काळात ही मंदिरे बांधली गेली असावीत, असे मत व्यक्त करतात. तर काही संशोधक येथील शिलालेखांच्या अक्षरवटिकेवरून व मूर्तीच्या किंचित स्थूल शरीरयष्टीवरून राष्ट्रकूटांच्या काळातच ही मंदिरे बांधली गेली असावीत, असे मत व्यक्त करतात. खजुराहो येथे सर्वत्र दृग्गोचर होणारा उभटपणा आणि शिखरांची रचना यांचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवतो, हे निश्चित.
संदर्भ : 1. Deglurkar. G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashira, Nagpur. 1974.
2. Deo. S. B. Markandi Temples, Nagpur, 1973.
3. Government of Maharashtru, District Gazatteers : Chandrapur District, Bombay. 1974.
४. भिराशी, वा. वि. संशोघनमुक्तावली, नागपूर, १९७६.
देशपांडे, सु. र.