माया संस्कृति : अमेरिका खंडातील एक प्राचीन संस्कृती. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण मेक्सिको, ग्वातेमाला, हॉन्डुरस आणि एल् साल्वादोरचा काही भाग यांतून आढळतो. या भागात आज दोन हजार वर्षे माया समाज वस्ती करून आहे. या भागात पसरलेल्या शहरांत भग्न अवशेष आणि घेगो-दे-लंदा या स्पॅनिश धर्मप्रसारकाने इ. स. १५५० च्या सुमारास रचलेली बखर ही माया संस्कृतीच्या इतिहासाची प्रमुख साधने असून खूद्द माया लोकांना लेखनकला अवगत होती, तरी त्यांची लिपी अद्याप पूर्णपणे वाचता आलेली नाही. आणि दुसरे म्हणजे त्यांची कागदावरील सर्व पुस्तके स्पॅनिश धर्मप्रसारकांनी ‘पाखंड’ म्हणून वसाहत स्थापल्यावर जाळली. त्यांच्या शिलालेखांत मुख्यत्वे कालनिर्देश आहेत व चित्रलिपीत प्रत्येक
कल्पना स्पष्टपणे व्यक्त झाली, तरी तिचे नमुने मर्यादित आहेत.
माया संस्कृतीचे कालबाह्य तीन भाग पडतात : प्राचीन, मध्य व अर्वाचीन. त्यांना अनुक्रमे अभिजातपूर्वकाल (इ. स. पू. १००० ते इ. स. ३००), अभिजातकाल (इ. स. ३००–९००) आणि अभिजातोत्तरकाल (१००० ते १६००) या संज्ञा इतिहासकारांनी दिल्या आहेत.
प्राचीन काल : या कालातील फारसे अवशेष उपलब्ध नाहीत. या कालाच्या अखेरच्या दिवसांत चित्रलिपीच्या लेखनास प्रारंभ झाला आणि पिरॅमिड पद्धतीच्या वास्तू ग्वातेमालाच्या मध्य भागात बांधावयास प्रारंभ झाला असावा.
मध्य काल : हा काल माया साम्राज्याचा उत्कर्षकाल म्हणून ओळखला जातो. या काळात कला, साहित्य, शिल्प, चित्रकला इ. सर्व क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाली. त्यामुळे या काळाला सुवर्णयुग अशीही संज्ञा देतात. या काळातील चित्रलिपीतील शिलालेख उपलब्ध झाले असून त्यांवरून काही गोष्टी ज्ञात होतात. माया लोकांची वस्ती जंगलातून विखुरलेली होती आणि त्यांचे शेती, शिकार आणि जंगलातील अन्य उद्योग हे प्रमुख धंदे होते. या काळात काही केंद्रे धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रशासनाच्या दृष्टीने विकसित झाली. वास्तुकला, चित्रकला यांचे उत्कृष्ट नमुने तीकाल, फ्लेंक आणि कोपान या ठिकाणी सापडले. फ्लेंक आणि कोपान येथील उंच चबुतऱ्यावर बांधलेले मंदिर आणि त्यांतील सभामंडप व बॉलकोर्टस ही वास्तुकलेची प्रगत अवस्था दर्शवितात. त्यांवरील चुनेगच्चीतील मूर्तीकाम उठावात असून छप्पर आणि द्वारशाखांसाठी कमानींचा वापर केलेला दिसतो. देव-देवतांच्या मूर्ती भिन्न आकारांच्या असून त्यांपैकी काही अतिभव्य आहेत. काही पाषाणशिल्पे आहेत आणि ही परंपरा पुढे अनेक वर्षे प्रचारात असल्याचे दिसते. या सर्वांत धातूचा कुठेही उपयोग केलेला आढळत नाही परंतु पाषाण आणि हाडांची हत्यारे यांनी मूर्ती गुळगुळीत केलेल्या असत. चाकाचा उपयोग या लोकांना माहीत नसावा. त्यामुळे हे लोक भांडी हातांनी बनवीत व त्यावर उत्तम चित्रकाम करीत. दळणवळणासाठीही अन्य मार्ग आचरणात आणीत.
अभिजात कालातील चित्रकलेचे नमुने तीकाल, फ्लेंक, अक्झाक्टन, बोनापांक आणि अन्य ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. बोनापांक, चियपाझ या ठिकाणची बहुविध रंगांतील भित्तिचित्रे प्रसिद्ध आहेत. या चित्रांचे सौंदर्य आकृत्यांच्या ठळक रेषांत आणि चेहेऱ्यांवरील अविर्भावातून प्रकट होते. याशिवाय मृष्मुद्रा आणि चुनेगच्चीतील बाहुल्यांतूनही माया कला दृग्गोचर होते. लघुकलांत पश्यांच्या पंखांचे कलाकाम, कपड्यांवरील विणकाम इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय दागिने सापडले आहेत. उत्पादनातील घट हेच या काळाच्या अधोगतीचे प्रमुख कारण असावे कारण यानंतर या संस्कृतीचे स्थलांतर उत्तरेकडे यूकातान प्रदेशाकडे झाले.
अर्वाचीन काल : या कालात नव माया साम्राज्य भरभराटीस आले. त्याचे प्रमुख क्षेत्र चीचेन ईत्सा आणि अक्झमल या यूकातान प्रदेशातील प्रमुख नगरींत (विशेषतः उत्तरेकडे) केंद्रित झाले. या काळात माया आणि टोल्टेक यांत संघर्ष होऊन माया संस्कृतीत संमिश्र कलाकृतींची निर्मिती झाली. त्यात भव्य वास्तू, शिल्पे आणि चित्रकाम आढळते. चीचेन ईत्सा आणि अक्झमल या ठिकाणी उंच चबुतऱ्यावरील पिरॅमिड पद्धतीची भव्य मंदिरे बांधण्यात आली. त्यांवर सर्पदेवता, मरूत्, सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. काही ठिकाणी टोल्टेकवरील विजय दर्शविला आहे. मंदिरांतून आतील व बाहेरच्या भिंतीवर चित्रकाम केलेल असून त्यांतून विविध विषय हाताळले आहेत त्यांत युद्धाचे देखावे जास्त आहेत परंतु अभिजात काळातील जोष आणि रंगसंगती त्यांत आढळत नाही. या काळात प्रथमच धातूचा उपयोग माया लोक करू लागले. काही सुवर्णाच्या तबकड्या आढळल्या असून त्यांवर माया व टोल्टेक यांच्या संघर्षाचा प्रसंग दाखविला आहे तसेच चित्रलिपीचा सर्रास वापर आढळतो. यांतील काही अवशिष्ट नमुने लक्षणीय आहेत.
तेराव्या शतकात मायपान हे शहर यूकातानचे प्रमुख केंद्र होते. या ठिकाणी माया इंडियन पुन्हा एकदा एकवटले आणि त्यांनी टोल्टेकना हाकलून देऊन साम्राज्याचे पुनरूज्जीवन करण्याचा अखेरचा प्रयत्न केला तथापि पूर्वीचे भरभराटीचे दिवस त्यांना लाभले नाहीत आणि कलेच्या अधोगतीबरोबर मायपान संघाची अनेक लहान राज्यांत विभागणी झाली आणि परस्परांत हेवेदावे सुरू झाले. हे संघर्ष १५४१ मध्ये स्पॅनियार्डसनी यूकातान जिंकेपर्यंत चालू राहिले. स्पॅनिश आक्रमणानंतर माया इंडियनांनी पुन्हा दक्षिणेकडे स्थलांतर करून एल् पेटेन या भागात अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत माया संस्कृती कशीबशी जिवंत ठेवली. मायपान, चीचेन ईत्सा, अक्झमल, तीकाल अशांसारख्या दहाबारा शहरांच्या अवशेषांचे संशोधन झाले आहे. यांपैकी मायपान व चीचेन ईत्सा ही राजकीय केंद्रस्थाने असावीत असे दिसते. शहराच्या मध्यभागी देवालयांसाठी रचलेली टेकाडे, त्या शेजारी राजप्रासाद आणि भोवती इतर वस्ती अशी सर्वत्र योजना आढळते. ही नगरे एकमेकाला पक्क्या दगडी रस्त्यांनी जोडण्यात आलेली होती. समाजव्यवस्थेत मुख्य पाया शेतकी हाच होता. शेतकीसाठी व मालाची ने-आण करण्यास गुलामांचा मोठ्या प्रमाणावर वापर होई. मध्य अमेरिकेतील प्राचीन समाजांपैकी माया लोकच दर्यावर्दी होते. दहा मीटर लांब असलेल्या नौकांतून त्यांचा मध्य व दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर व्यापार चाले. त्यांनी तयार केलेल कापड, मौल्यवान धातू, जेडसारखे दगड, इत्यादींचा मुख्यतः व्यापारी मालांत समावेश होई. सबंध प्रदेशावर एकतंत्री राज्यछत्र नव्हते. सर्वत्र नगरराज्ये होती आणि वांशिक, भाषिक व सांस्कृतिक एकता असूनही या राज्यांची सतत परस्परांत युद्धे होत असत. सर्व माया लोक सूर्यपूजक होते. तसेच निसर्गदेवता, स्थलदेवता यांचीही उपासना करीत. उपासनेतील मुख्य भाग नरबली असे. माया लोकांना आकाशातील ग्रहांची चांगली माहिती असावी तसेच त्यांचे सांख्यिकी आराखडे नावाजण्यासारखे आहेत. त्यांनी तयार केलेले पंचांग तपशीलवार असून ग्रहांच्या सूक्ष्म निरीक्षणावर ते आधारलेले होते. त्यात पुढे वेळोवेळी जरूर त्या दुरूस्त्या करण्यात येत. शेतकी व सागरी व्यापार दोन्हींसाठी हे पंचांग आवश्यक होते. ‘ड्रेझ्डेन कोडेक्स’ सारखी उपलब्ध पुस्तके पंचांग व धार्मिक विधिंवरीलच आहेत. माया नगरांतील अनेक वास्तू अवशिष्ट आहेत. आरंभीच्या वास्तूंत कमानीचा वापर असे. नंतरच्या काळात लाकडी तुळ्या वापरीत. बांधकामाला सर्वत्र चुना वापरलेला आहे. वास्तू शोभनासाठी दगडी, चुन्याच्या व लाकडी शिल्पाचा उपयोग करीत. तसेच रंगकामही होत असे. शिल्प व चित्र यांत प्रामुख्याने धार्मिक विधी (बलिकर्मासारखे) दाखवलेले असले, तरी चित्रकामांतून मायांच्या रोजच्या जीवनाचीही कल्पना येऊ शकते. नगररचना, खगोलशास्त्र, कला, लेखन आणि अर्थव्यवस्था यांसारख्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांत प्रगतीच्या भराऱ्या मारणाऱ्या या समाजाचे काही क्षेत्रातील अज्ञान विस्मयकारक वाटते. उदा., लोखंड, चाक व वहाने आणि वहातुकीची जनावरे.
संदर्भ : 1. Hagen, V. W. Von, The Ancient Sun Kingdoms of the Americas, London, 1962.
2. National Geographic Society, National Geographic : The Maya, Vol. 148, No. 6, December 1975, Washington.
3. Peterson, F. A. Ancient Mexico, London, 1959.
4. Rivet, Paul, Trans. Kochan, Miriam and Lionel, Maya Cities, London, 1962.
5. Thomson. J. E. S. The Rise and Fall of Maya Civilization, Oklahoma, 1954.
माटे, म. श्री.
“