मायर, कोनराट फेर्डिनांड : ११ ऑक्टोबर १८२५–२८ नोव्हेंबर १८९८). स्विस साहित्यिक. जन्म झुरिक येथे एका श्रीमंत प्रॉटेस्टंट कुटुंबात. कोनराटच्या आईवडिलांना मज्‍जाविकृतीचा (न्यूरॉसीस) त्रास होता आणि ती मानसिक रूग्णता कोनराटमध्येही उतरली होती. तिचे झटके त्याला येत असत. कोनराटने कायद्याचा अभ्यास केला होता परंतु कायदा, चित्रकला, साहित्य अशा विविध क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात काम करावे, हे ठरविणे त्याला काही काळ अवघड झाले होते. अखेर त्याने स्वतःला साहित्यसेवेस वाहून घेतले. जर्मन आणि फ्रेंच ह्या दोन्ही भाषा त्याला अवगत होत्या आणि आपल्या वाङ्‌मयीन अविष्कारासाठी त्यांपैकी कोणती निवडावी ह्याबद्दलचा संभ्रमही त्याच्या मनात होताच. तथापि १८७० साली झालेल्या फ्रँको-प्रशियन युद्धानंतर (ह्या युद्धात फ्रान्सचा दारूण पराभव झाला) त्याने जर्मन भाषेत लेखन करण्याचा निर्णय घेतला.

मायरने आपले लेखन बऱ्याच उशिरा सुरू केले. आरंभी त्याने काव्ये लिहिली. हुट्टेन्स लेट्‌त्सट टाग (इं. शी. ‘लास्ट डेज ऑफ हुट्टेन’) हे त्याचे वीरकाव्य १८७१ मध्ये प्रसिद्ध झाले. उल्‌रिश फोन हुट्टेन (सोळावे शतक) ह्या शूर जर्मन वीराचा दुःखद मृत्यू हा ह्या काव्याचा विषय. त्यानंतर त्याचे लेखन मुख्यतः कथात्मक-दीर्घकथा आणि कादंबऱ्या-असे आहे. उदा., दस आमुलेट (१८७३ इं. शी. ‘द आर्मलेट’), युर्ग येनाट्‌श (ऐतिहासिक कादंबरी, १८७६), डेअर हाइलिग (१८८०, इं. भा. द सेंट, १९३०), प्‍लाउटुस इम नोन्नेनक्‍लोस्टर (विनोदी कादंबरी, १८८१, इं. शी. ‘प्‍लाउटुस इन द ननरी’), गुस्टाव्ह आडोल्फ्‌स पाग (१८८२, इं. शी. द पेज ऑफ गुस्टाव्हस अडॉल्फस’), डी लाय्‌डेन आइनेस क्‌नाबेन (१८८३, इं. शी. ‘द सफरिंग ऑफ अ बॉय’), डी होखत्साइट डेस मोय्‌न्शेस (१८८४, इं. भा. द मंक्‌स वेडिंग, १८८७), डी फरझूखुन्ग डेस पेस्कारा (१८८७, इं. शी. ‘द टेंप्‌टेशन ऑफ पेस्कारा’) आणि आंगेला बोर्गीया (१८९१). त्याच्या कविता-गेडिश्ट-१८८२ मध्ये प्रथम संकल्पित करण्यात आल्या.

मायरच्या कथात्मक साहित्यात ऐतिहासिक- विशेषतः प्रबोधनकाळ आणि ल्यूथरच्या धर्मसुधारणा-चळवळींचा काळ ह्यांच्याशी निगडित असलेले-विषय प्रामुख्याने हाताळलेले दिसतात. तीव्र धर्मभावना आणि मानवी मनांच्या अन्वेषणाची एक दृष्टी त्याच्या व्यक्तिरेखनात दिसून येते. जर्मन साहित्यातील वास्तववादाचा तो एक प्रमुख प्रतिनिधी मानला जातो. तथापि स्वच्छंदतावादी प्रवृत्तीही त्याच्या लेखनात आढळतात. प्रतीकात्मकता आणि भाषाशैलीतील कलात्मक संयम ही त्याच्या कथात्मक साहित्याची अन्य लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

विख्यात इटालियन शिल्पकार, वास्तुशिल्पी, चित्रकार आणि कवी मायकेलअँजेलो ह्याच्या काव्यलेखनाचा प्रभाव मायरवर दिसून येतो. मायरची काव्यशैली पारदर्शी आणि सारगर्भ अशी आहे.

झुरिकजवळील किल्खवेर्क येथे तो निधन पावला.

संदर्भ: 1. Burkhard, Arthur, Conrad Ferdinand Meyer : the Style and the Man, Cambridge, Mass. 1932.

           2. Henel, H. The Poetry of Conrad Ferdinend Meyer, Mandison, Wisconsin, 1954.

कुलकर्णी, अ. र.