माफीचा साक्षीदार: (ॲप्रूव्हर). माफीच्या अटीवर आपल्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्ह्यातीलकेलेल्या दुष्कृत्यांबाबत न्यायालयात साक्ष देणारा सहअपराधी. गुन्हेगारांपैकी काहींना किंवा गुन्ह्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधित असणाऱ्या व्यक्तीला माफीचे अभिवचन देऊन संपूर्ण सत्य माहिती प्रकट करून सांगण्याबद्दल माफी देण्यात येते. अशा व्यक्तीस अथवा सहअपराधीस ‘माफीचा साक्षीदार’ म्हणतात. माफीच्या साक्षीदाराने गुन्ह्याबाबत संपूर्ण व सत्य निवेदन करावयाचे बंधन त्याच्यावर असते. माफीच्या साक्षीदाराची सक्षम साक्षीदार म्हणून न्यायालयात तपासणी होते. त्याच्या साक्षीवर न्यायालयाने इतर आरोपीस केलेली शिक्षा अवैध नसली, तरी समाजसुरक्षिततेच्या व सावधगिरीच्या दृष्टीने त्याच्या साक्षीची पुष्टी, बळकटी होणे आवश्यक मानतात. माफीच्या साक्षीदाराने गुन्ह्यासंबंधी खोटी माहिती अथवा पुरावा सादर केला किंवा सत्य परिस्थिती लपवून ठेवली आणि याबाबतीत सरकारी अभियोक्त्याने तसे प्रमाणित केले, तर माफीच्या अटी न पाळल्याबद्दल त्याच्याविरुद्ध त्याच किंवा इतरही संबंधित गुन्ह्याबद्दल खटला चालविता येतो. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये माफीच्या साक्षीदारासंबधी कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.
श्रीखंडे, ना. स. कुलकर्णी, स. वि.