विश्वासघात : (ब्रीच ऑफ ट्रस्ट). व्यवहारात विश्वास दाखवून फसवणूक केल्याच्या कोणत्याही प्रकारास सामान्यपणे विश्वासघात म्हटले जाते. तथापि कायद्याच्या दृष्टीने असा प्रत्येक प्रकार गुन्हा होत नाही. विश्वासाने ताब्यात दिलेल्या मालाचा एखाद्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे लबाडीने गैरवाजवी उपयोग केला तरच प्रचलित फौजदारी कायद्याने तो गुन्हा ठरतो.

इंग्रजी विधिपद्धतीचा प्राचीन इतिहास पाहता, विश्वासघात हा पूर्वी गुन्हा समजण्यात येत नसे, असे दिसते. व्यापारउदिमाच्या वृद्धीनंतर विश्वासघात हा गुन्हा मानला जाऊ लागला.

भारतीय दंड संहितेत (इंडियन पिनल कोड) ४०५ या कलमाने विश्वासघात या गुन्ह्याची व्याख्या केली आहे. एखाद्याकडे कोणतीही मालमत्ता सोपविली असता, जर तो त्या मालमत्तेचा अपहार करीत असेल किंवा तो स्वतःच ती उपभोगीत असेल, तर त्याने विश्वासघात केला असे कायदा म्हणतो. तसेच कायदेशीर रीत्या त्या मालमत्तेची व्यवस्था विशिष्ट प्रकारे करणे आवश्यक असताना त्याविरुद्ध वागून, जर एखाद्याने ती मालमत्ता स्वतःच वापरली अथवा तिची अन्य प्रकारे विल्हेवाट लावली, तर ते कृत्य विश्वासघाताचे ठरेल. त्याचप्रमाणे विश्वासाने सोपविलेल्या वस्तूची कशाप्रकारे विल्हेवाट लावावी यासंबंधी एखादा लिखित वा अलिखित करार असल्यास, त्या कराराचा भंग करून तो इसम त्या वस्तूची विल्हेवाट लावीत असेल, तर ते कृत्यही विश्वासघाताचे ठरेल. वरीलपैकी कोणतेही कृत्य स्वतः केल्यानेच नव्हे, तर इतर कोणासही असे वर्तन करण्यास एखाद्याने मुभा दिली, तर त्यावेळीही त्या इसमाचे वर्तन विश्वासघाताचे ठरेल. तेव्हा विश्वासघात हा गुन्हा शाबीत होण्यासाठी काहीतरी मालमत्ता ती कोणाच्यातरी हाती सोपविली जाणे व त्याने त्या मालमत्तेची अनिष्ट अशी विल्हेवाट लावणे हे तीन घटक आवश्यक आहेत. हे सिद्ध झाल्याशिवाय विश्वासघात हा गुन्हा शाबीत होणार नाही.

वचनभंग, करारभंग, फसवणूक हे प्रकार विश्वासघातासारखेच असले, तरी कायद्याच्या दृष्टीने ते निराळे आहेत. विश्वासघात व अफरातफर यांमध्येही फरक आहे. विश्वासघाताच्या कृत्यात मालमत्ता एखाद्याच्या हाती योग्य वा कायदेशीर रीत्या येते किंवा सोपविली जाते. आणि नंतर तिचा अपहार होतो. अफरातफरीच्या कृत्यात मालमत्ता योगायोगाने आलेली असते आणि मग तिचा अपहार होतो. [⟶ अफरातफर].

भारतीय दंड संहितेनुसार विश्वासघातांच्या गुन्ह्याकरिता तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा दोन्ही अशी कमाल शिक्षा सांगितली आहे. मालवाहतूक करणारे, गुदामे भाड्याने देणारे तसेच कारकून वा नोकर यांनी विश्वासघात केल्यास शिक्षेची कमाल मर्यादा सात वर्षे आहे तर पेढीवाले, सावकार, दलाल वा तत्सम इसम, सरकारी वा निमसरकारी सार्वजनिक नोकर यांच्या बाबतीत ही शिक्षा दहा वर्षे आहे.

कवळेकर, सुशील