मानसिंह : (१४८६–सु. १५२६). मध्ययुगीन हिंदुस्थानी संगीतातील गायक, संगीतज्ञ व संगीतरचनाकार. ग्वाल्हेरच्या तोमर अगर तंवर वंशातील हा राजा होता. याने आपली गुजरी राणी (मृगनयना) हिच्या नावाने ‘गुजरी’, ‘बहुलगुजरी’, ‘मालगुजरी’ आणि ‘मंगलगुजरी’ हे राग निर्माण केले. संगीतशास्त्रविषयक मानकुतूहल हा हस्तलिखित ग्रंथ त्याच्याच प्रेरणेने निर्माण झाला. धृपद गानपद्धतीचा उगम आणि विकास मानसिंहाने घडवून आणला, असे मानले जाते. [→ धृपद-धमार ]. ह्या गायकीचा उत्कर्ष पुढे अकबराच्या काळात (१५४२–१६०५) आणि नंतरही होत राहिला हे तानसेन, बैजू व दक्षिणेतील विजापूरचा दुसरा आदिलशहा (१५८०–१६२७) यांच्या संगीतामधील कर्तबगारीवरून दिसून येते. ग्वाल्हेर येथूनच पुढे प्रसृत झालेली ⇨ ख्यालगायकी एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात येईपर्यंत ही धृपद गायकीच स्थिर होऊन राहिली होती. मानसिंहाने निर्माण केलेले वरील चार राग अलीकडे प्रचारात आढळत नाहीत मात्र गुजरी तोडी प्रसिद्ध असून ती आजही गायली जाते.
देशपांडे, श्री. ह.