मानसरोवर : हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीतील एक नयनरम्य सरोवर व हिंदूच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक पवित्र यात्रास्थान. हे तिबेटच्या नैर्ऋत्य भागात नेपाळच्या वायव्येस आहे. सरोवराचा आकार अंडाकृती असून याच्या उत्तरेस कैलास पर्वत, दक्षिणेस गुर्लमांदात पर्वत व पश्चिमेस राकस (राक्षसताल) सरोवर आहे. सरोवराची पूर्व-पश्चिम लांबी २४ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १८ किमी. व क्षेत्रफळ ५१८ चौ. किमी. आहे. समुद्रसपाटीपासून उंची ४,५५७ मी. असून जगातील सर्वाधिक उंचीवरील, स्वच्छ व गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून हे ओळखले जाते.
मानसरोवराची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मनापासून झाली, त्यामुळे त्याला ‘मान सरोवर’ हे नाव पडले, असा वाल्मिकी रामायण व पुराणांत उल्लेख आहे. विष्णूने मानसरोवरात मत्स्यावतार धारण केल्याचा उल्लेख वामनपुराणात सापडतो. पाली व संस्कृत साहित्यांत या सरोवराचे उल्लेख ‘अन्नोटा’, ‘अनवटप्पा तळे’ असे केलेले आहेत, तर चिनी भाषेत ‘मानासालॉवू’ व तिबेटी भाषेत ‘मापाम्त्सो’ असा उल्लेख केला जातो.
मानसरोवराच्या पश्चिमेस १० किमी. राक्षसताल सरोवर आहे. ते मानसरोवरापेक्षा मोठे असून त्याचा आकारही अनियमित आहे. याचे अनेक फाटे लांबपर्यंत पर्वतांच्या दऱ्यांमध्ये घुसलेले आढळतात.शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी लंकाधिपती रावणाने याच सरोवराच्या काठी तपश्चर्या केली व त्यावरून या सरोवराला ‘राक्षसताल’ हे नाव पडले, असे मानले जाते. मानसरोवराचे पाणी ‘गंगा चू’ नदीमार्गाने राक्षसताल सरोवराला जाऊन मिळत असे. तो प्रवाहमार्ग आजही दिसतो. परंतु तो भाग आज उंचावलेला आहे. गंगा चू नदीप्रवाहाच्या काठावर गरम पाण्याचे झरे आहेत. प्रत्यक्षात मानसरोवरातून कोणत्याही नदीचा उगम होत असल्याचे दिसत नसले, तरी सरोवराचे पाणी भूगर्भातून दूरवर जाऊन मग भूपृष्ठावर येते. तेच एखाद्या नदीचे उगमस्थान ठरते. शरयू, सतलज व ब्रह्मपुत्रा या नद्या अशाच प्रकारे मानसरोवरातून उगम पावल्या आहेत, असे मानले जाते.
मानसरोवराचे पाणी निळसर दिसते. सरोवराचा बराचसा पृष्ठभाग बर्फाच्छादित असला, तरी त्याच्या तळाशी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे त्याचे पाणी सतत सौम्य शीतल असते. हंस पक्ष्यांविषयी हे सरोवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. अनेक काव्यांतूनही हे सरोवर व त्यातील हंस यांची वर्णने आढळतात. पांढरेशुभ्र राजहंस व मातट पांढरे किंवा बदामी रंगाचे हंस यांच्या विहारामुळे सरोवराच्या सौंदर्यांत भर पडली आहे. सरोवराच्या किनाऱ्यावर सशांचे कळप बागडताना आढळतात. सूर्योदय, सूर्यास्त यांची दृश्ये आणि हिमाच्छादित पर्वत व चांदण्या यांची सरोवरातील प्रतिबिंबे विलोभनीय असतात. यामुळे याला ‘सरोवरांची राणी’ असे संबोधले जाते. मानसरोवराच्या काठावर पांढरी रेती आढळते. भारतीय संशोधक स्वामी प्रवणानंद यांनी या भागाचे बरेच संशोधन केले. त्यांना राक्षसताल व मानसरोवर यांच्या दरम्यान काही प्रमाणात सोने, टाकणखार, रेडियम, लोह खनिज, टिटॅनियम, एमरी यांचे साठे सापडले.
भाविकांच्या मते या सरोवरात स्नान केल्याने व जलप्राशनाने स्वर्गप्राप्ती होते त्यामुळे दरवर्षी अनेक भाविक मानसरोवराची कष्टप्रद यात्रा करतात. मानसरोवराच्या उत्तरेस अवघ्या ३२ किमी. वर ⇨ कैलास हे हिंदूंचे पवित्र यात्रास्थान आहे. हिमालयातून अनेक पाऊलवाटा कैलासाकडे व मानसरोवराकडे जातात. त्यांपैकी अलमोड्यावरून जाणारा मार्ग अधिक सोयीचा समजला जातो. अलमोड्यापासून गर्बिअँग, लिपुलेख खिंड, तक्लाकोटमार्गे जाणारा हा रस्ता ३३५ किमी. लांबीचा आहे. प्रवासात घोड्यांचा व खेचरांचा वापर करावा लागतो. या भागात झुडुपांव्यतिरिक्त मोठ्या वनस्पती फारशा आढळत नाहीत. चीनच्या आधिपत्याखाली तिबेट आल्यापासून आणि विशेषतः भारत-चीन संघर्षापासून भारतीयांना कैलास व मानसरोवराच्या यात्रेस जाण्यावर फारच बंधने पाळावी लागतात.
खंडकर, प्रेमलता.