मानवमिति: निरनिराळ्या शरीरावयवांची शास्त्रशुद्ध मोजमापे व निरीक्षणे करण्याच्या पद्धतशीर तंत्राला मानवमिती म्हणतात. मानवमिती हे शास्त्र नसून हा एक तंत्र-पद्धतीचा समुच्चय आहे. मोजमापांच्या व निरीक्षणांच्या संख्येचा आवाका ज्या त्या संशोधनाच्या किंवा अभ्यासाच्या प्रश्नावर अवलंबून असतो. त्यामुळे त्यासंबंधीचे नियम, वर्गीकरण, मोजमापे व निर्देशांक हे सर्व सांकेतिक आहेत. उद्दिष्ट गाठण्याचे मानवमिती हे साध्य नसून साधन आहे. इतर अनेक तंत्राप्रमाणे मानवमितीचा वापर करताना ज्या काही अटी वा नियम पाळावे लागतात, ते असे : (१) मोजमापांची समर्पकता व त्यांना मिळणारा वाव यांचा काटेकोरपणे विचार (२) कार्यपद्धती व मार्गक्रमण यांच्यात अचूकपणा असणे व (३) वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची अचूकता.
प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष काम करून व क्षेत्राभ्यासाद्वारे ह्या तंत्रावर प्रभुत्व मिळविता येते. ह्या तंत्रामध्ये मोजण्याच्या कृतीवर भर दिला असला, तरी सोयीच्या दृष्टीने विज्ञानाचा भाग व निरीक्षणात्मक भाग यांचाही अंतर्भाव केला जातो. मानवमितीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते :
मानवमिती |
||||
। |
||||
शरीरमापन |
मस्तकमापन |
अस्थिमिती |
||
याशिवाय शारीर, शरीरावलोकन, मस्तकविज्ञान, मस्तकावलोकन, अस्थिविज्ञान व अस्थि-अवलोकन यांचाही अंतर्भाव यामध्ये केला जातो.
तसेच ह्या तंत्राच्या वापरासाठी प्रयोगशाळेतील ज्या उपकरणांची मदत घ्यावी लागते, त्यांतील मानवमितीचा स्तंभ, लहान सरकता कंपास, मोठा सरकता कंपास, अस्तिमापनाची फळी, चौकोनी कवटीधारक, मॉलीसनचा त्रिकोणी कवटीधारक, मोजपट्टा, कोनमापक, तालुमापक वगैरे काही उपकरणे प्रमुख आहेत.
स्वच्छ व भरपूर उजेड असलेल्या प्रयोगशाळेमध्ये सर्व उपकरणे अतिशय स्वच्छ असल्याची खात्री करून घेतल्यावर त्यांचा अचूकपणा शाबीत करावा लागतो. नंतर मोजमापे शक्यतो उघड्या शरीरावर अगर अगदी कमीत कमी कपडे अंगावर असताना डाव्या अंगावरच घ्यावीत आणि शरीराला इजा होईल अशा रीतीने उपकरणे वापरू नयेत. जरूरीचे निर्देशबिंदू प्रथमतः काटेकोरपणे निश्चित करून ते शरीरावरच नमूद करावेत.
या वेळी मोजमापात व ऋतुमानातील हवाबदलामुळे फरक होत असल्यास त्याची नोंद करून फार वयस्कर, आजारी, पंगू व्यक्तींची मोजमापे शक्यतो टाळावीत परंतु संशोधनाच्या विषयानुरूप त्यांची निवड करणे वा न करणे ठरवावे.
मानवमितीच्या तंत्राचा वापर फार पूर्वीपासून केला जात होता. त्याची सुरुवात जरी ग्रीक, ईजिप्शियनांच्या काळात झाली असली, तरी ह्या तंत्राची शास्त्रशुद्ध सुरुवात योहान फ्रीड्रिख ब्लूमेनवाख (१७५२–१८४०) याने केली. त्याने मस्तकविज्ञानाचा पाया घातला. स्वतः जमविलेल्या कवट्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्याने मानवजातीचे वर्गीकरण कॉकेशियन, मंगोलियन, इथिओपियन, अमेरिकन व मलेयन या पाच मानवजातींत केले. या प्रकारांवरून पुढे पीटर काम्परने (१७२२–८९) चेहेऱ्याची जडणघडण व चेहेऱ्याचे प्रवर्धन यांवर प्रकाश टाकला. चार्ल्स व्हाईटनेही त्याच सुमारास लांब हाडांच्या मोजमापाचे तंत्र सुधारून चिंपँझी, निग्रो व यूरोपियनांच्या लांब हाडांवर विशेषतः हातांच्या हाडांवर संशोधन केले.
पॉल ब्रोका (१८२४–८०), विल्यम हेन्री क्लौवर व विल्यम टर्नर यांनी ब्लूमेनबाखच्या पायाभूत अभ्यासामध्ये अधिक प्रगती केली. मस्तकविज्ञान व मस्तकमापन यांवर पॉल ब्रोकाने १८७५ मध्ये एक सूचनात्मक निबंध लिहिला. त्याचप्रमाणे कोणत्या मोजमापांचा उपयोग करावा, कोणते निर्देशबिंदू वापरावेत यांच्या व्याख्या तयार करून मोजमापासाठी कोणती उपकरणे वापरावीत हेही त्याने दाखवून दिले. त्याने सुचविलेल्या पद्धतींचा वापर विशेषकरून फ्रान्स, बेल्जियम, स्पेन व इटली या देशांत केला जातो. त्याच्या पद्धतीमध्ये किरकोळ फेरफार करून विल्यम हेन्री क्लौवर व टर्नरने त्यांचा उपयोग इंग्लंडमध्ये केला. क्लौवरने एका टोकाचा हात वक्र व दुसऱ्या टोकाला सरळ हात असणारा एक कंपास तयार केला. त्याला क्लौवरचा कंपास असे म्हणतात.
जवळजवळ १८७० पर्यंत ब्रोकाची पद्धत जगन्मान्य होती परंतु इ.स. १८७४ मध्ये येरिंगने त्याच्या पद्धतीतील कमकुवतपणा दाखवून दिला व मानवमितीचे तंत्र दर्जेदार करण्याचेही सुचविले. त्याला अनुसरून म्यूनिक (१८७७) व बर्लिन (१८८०) येथे मस्तकमापन तंत्रविषयक परिषदा भरविल्या गेल्या. कोलमान व रांके यांनी मस्तकमापन तंत्रविषयक तयार केलेले आराखडे फ्रँकफ्रुट/मेन येथे १८८२ मध्ये भरलेल्या, ‘जनरल काँग्रेस ऑफ द जर्मन अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी’च्या तेराव्या अधिवेशनात संमत झाले. यामध्ये सुचविलेली अनेक मोजमापे जरी ब्रोकाने सुचविल्याप्रमाणे असली, तरी त्याच्या व्याख्यांमध्ये मूलभूत बदल सुचविले होते. जवळजवळ त्याच सुमारास पॉल तोपीनार नावाच्या ब्रोकाच्या सहाध्यायाने मानवमितीच्या मोजमापांची एक नवीनच जंत्री सुचविली. त्यामुळे जर्मन व फ्रेंच असे दोन विचारप्रवाह निर्माण झाले. तसेच देशोदेशींचे मानवशास्त्रज्ञ मानवमितीचा वापर करताना स्वतःचे असे वेगळे तंत्र सुचवीत होते. परिणामतः त्यातील एकवाक्यता नष्ट झाली.
इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ प्रिहिस्टॉरिक अँथ्रोपोलॉजी अँड आर्किआलॉजीच्या मॉस्को येथे १८९२ मध्ये भरलेल्या बाराव्या अधिवेशनात यासंबंधी प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नात काहीच निष्पन्न झाले नाही. शेवटी १९०६ मध्ये इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ प्रिहिस्टॉरिक अँथ्रोपोलॉजी अँड आर्किआलॉजीच्या मोनॅको येथे भरलेल्या तेराव्या अधिवेशनात मस्तकमापनतंत्रावर एकवाक्यता झाली. त्याला इंटरनॅशनल ॲग्रिमेंट फॉर क्रेनिओमेट्री एकवाक्यता झाली. त्याला इंटरनॅशनल ॲग्रिमेंट ऑन क्रेनिओमेट्री असे म्हणतात. तसेच इ. स. १९१२ मध्ये जर्मन परिषदेने इंटरनॅशनल ॲग्रिमेंट फॉर युनिफिकेशन ऑफ मेझरमेंट्स ऑन द लिव्हींग सब्जेक्टस्ला मान्यता दिली. या ठरावामुळे गोंधळाची परिस्थिती खूपच निवळली. या दोन्ही करारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १९३२ मध्ये भविष्यकाळातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी लंडन येथे २० देशांतील प्रतिनिधींची आंतरराष्ट्रीय समिती स्थापन केली गेली. तिचा उद्देश मानवशास्त्रीय मानवमितीच्या तंत्रामध्ये एकसूत्रता आणणे हा होता.
अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांबरोबरच देशोदेशींच्या मानवमितीच्या तंत्राच्या एकसूत्रीकरणासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. त्या दृष्टीने रूडॉल्फ मार्टिनचे प्रयत्न स्तुत्य आहेत. त्याशिवाय आलेश हर्ड्लिचका (१९३९), चार्ल्स डॅव्हेनपोर्ट (१९२७) इत्यादींच्या ग्रंथांत उपयुक्त माहिती मिळते. सद्यस्थितीत उपकरणांच्या संख्येत वेळोवेळी भर पडत असून सुलभता व अचूकतेची कसोटी लावली जाते.
भौतिकी मानवशास्त्रामध्ये मानवी जीवनाचा जीववैज्ञानिक दृष्टिकोन अभिप्रेत आहे. त्यानुसार मानवाचा उगम, विकास, उत्क्रांती व मानवा-मानवांतील साधर्म्य व वैधर्म्य इ. प्रकारच्या अभ्यासावर भर दिला जातो. अलीकडे मानवी शरीराची वाढ व निरनिराळ्या लोकगटांतील त्या वाढीची प्रगती यांचाही अंतर्भाव या शास्त्रामध्ये केला जातो. शरीराच्या वाढीवर सभोवतालच्या परिस्थितीच्या व पोषणद्रव्यांच्या परिणामांचे मूल्यमापन करणेही आवश्यक असते. संरक्षणक्षेत्राशी निगडित असणाऱ्या साधनसामग्रीचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने, तसेच कारखान्यात लागणाऱ्या व तयार होणाऱ्या काही साधनांच्या उत्पादनाच्या दृष्टीने वस्तूंच्या दर्जाप्रमाणे परिमाणे तयार करावी लागतात. तसेच लाकडी वस्तू, कपडे, विमान बांधणी इत्यादींचे आराखडे निरनिराळ्या मानवी शरीरांना सोयीस्कर होतील, अशा प्रकारे तयार करावे लागतात. अवकाश-वाहने व अवकाश-यात्रींचा पोषाख, इतर उपकरणे इत्यादींबाबत काटेकोरपणा अत्यावश्यक असतो. ह्या व अशाच प्रकारच्या सर्व गोष्टींसाठी मानवमितीच्या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
संदर्भ : 1. Hooton, E. A. Up From the Ape, New York, 1963.
2. Roche, A. F. Falkner, Frank, Ed. Nutrition and Malnutrition (Identification and Measurement) Advances in Experimental Medicine and Biology, London, 1974.
3. Sinsh. I. P Bhasin, M. K. Anthropometry, Delhi, 1968.
कुलकर्णी, वि. श्री.
“