माचादो इ रुईथ, मान्वेल : (१८७४–१९४७). स्पॅनिश कवी. विख्यात स्पॅनिश कवी आनतोन्यो माचादो इ रुईथ ह्याचा ज्येष्ठ बंधू. सेव्हिल येथे त्याचा जन्म झाला. शिक्षणही सेव्हिल येथेच झाले. घरातील वातावरण विद्येला अनुकूल होते. त्याचे वडील स्पॅनिश लोकविद्या ग्रंथालयाचे (स्पॅनिश फोकलोअर लायब्ररी) संस्थापक होते. मान्वेलने ग्रंथकार, पत्रकार आणि नाट्यसमीक्षक अशी विविध प्रकारची कामे केली. Alma (१९००), Museo (१९१०), Cante hondo (१९१२),Sevilla Y Otros Poemas (१९२१), Horas de oro (१९३८) हे त्याचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. रूबेन दारीओ ह्या निकाराग्वन कवीचा तसेच फ्रेंच साहित्यातील ल पार्नास ह्या संप्रदायाचा काही प्रभाव मान्वेलच्या कवितेवर दिसून येतो. तसेच अँडलूझियाच्या प्रदेशातील जीवनाचे रंगही त्याला मोहवितात. लोकगीतांच्या लयतालांचा प्रत्यय त्याच्या कवितेतून येतो.
कुलकर्णी, अ. र.