माकेंझी, सर अलेक्झांडर : (१७६४?–१२ मार्च १८२०). स्कॉटिश समन्वेषक. कॅनडातील मॅकेंझी नदीमार्गाचा शोधक व फरचा व्यापारी. जन्म स्कॉटलंडच्या औटर हेब्रिडीझ बेटांपैकी लूझ बेटावरील स्टॉर्नवे शहरी.  आईच्या मृत्यूनंतर वडील त्याला घेऊन अमेरिकेत न्यूयॉर्क येथे आले (१७७४). अमेरिकन क्रांतीमध्ये वडिलांनी सक्रिय भाग घेतल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अलेक्झांडरला माँट्रिऑल (कॅनडा) येथे पाठविले (१७७८). तेथील अल्पकालीन शिक्षणानंतर त्याने लिपिक म्हणून ‘ग्रेगरी अँड मॅक्‌लाउड’ या फरच्या व्यापारी कंपनीत पदार्पण केले (१७७९). या कंपनीत त्याने लिपिक, व्यापारी व भागीदार म्हणून आपल्यावरील  जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. या कंपनीचे १७८७ मध्ये ‘नॉर्थ-वेस्ट कंपनी’त विलीनीकरण होऊन तिचा अलेक्झांडर भागीदार बनला. १७८८ मध्ये नॉर्थ–वेस्ट कंपनीचे ॲ‌थाबास्का सरोवराजवळील फोर्ट चिपवाइन येथील फर व्यापाराच्या पर्यवेक्षणाचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. हीच त्याच्या पुढील मोहिमेची सुरुवात ठरली. समन्वेषणास वेळ मिळावा म्हणून कंपनीचे काम  पाहण्यासाठी त्याने रॉडरिक या आपल्या चुलत भावाला बरोबर घेतले.

माकेंझीच्या अगोदर पीटर पाँड याने उत्तर कॅनडातील ग्रेट स्लेव्ह सरोवर नदीमार्गाने पश्चिमेस पॅसिफिक महासागराला जोडलेले असावे, अशी शक्यता व्यक्त केली होती. याच शोधासाठी ३ जून १७८९ रोजी  तीन छोट्या होड्या, काही कॅनडियन व अमेरिकन इंडियन लोकांसह अलेक्झांडर माकेंझी मोहिमेवर  निघाला. फोर्ट चिपवाइनपासून स्लेव्ह नदीमार्गाने तो ग्रेट स्लेव्ह सरोवरात आला. या सरोवर किनाऱ्याच्या तीन आठवड्यांच्या समन्वेषणानंतर त्याला सरोवराचे पाणी पश्चिमेकडे वाहत असलेला मार्ग सापडला. ह्या नदीमार्गाने तो  आर्क्टिक महासागराच्या बोफर्ट समुद्रकिनाऱ्यावर १४ जुलै रोजी येऊन पोहोचला. तेथून पुन्हा तो सु. तीन महिन्यांच्या प्रवासानंतर फोर्ट चिपवाइनला परतला. सुमारे तीन महिन्यांचा हा त्याचा प्रवास झाला. त्याने समन्वेषण केलेली ही नदी म्हणजे त्याच्याच नावावरून ओळखली जाणारी मॅकेंझी नदी होय. या नदीमार्गाने आपण पॅसिफिक महासागराला जाऊन पोहोचू अशी त्याला आशा होती, परंतु याबाबत त्याचा अंदाज चुकीचा ठरून पदरी निराशा आली. त्यामुळे या नदीला त्याने ‘निराशेची नदी’ असे संबोधले आहे. मॅकेंझी नदीची लांवी सु. १,७६० किमी. असून कॅनडातील ही सर्वांत लांबीची , तर मिसिसिपी-मिसूरी यांच्या खालोखाल उत्तर अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत तिला महत्त्वाचे स्थान आहे.

मार्केंझीला या प्रवासातून कोणताच फायदा झाला नाही. त्यामुळे या कामगिरीबाबत तो समाधानी नव्हता. या प्रवासावरून परतल्यावर त्याने जवळजवळ तीन वर्षे आपल्या कंपनीच्या कामात घालविली. तो १७९१ मध्ये माँट्रिऑलला आला. त्यानंतर, विशेषतः रेखावृत्तीय गणिताच्या अभ्यासासाठी आणि उपकरणे मिळविण्यासाठी, तो लंडनला गेला. १७९३ मध्ये आपली पॅसिफिककडे पोहोचण्याची  महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने दुसरी अत्यंत महत्त्वाची मोहीम हाती घेतली. ९ मे रोजी आपल्या सहकाऱ्यांसह फोर्ट फोर्क येथून पीस नदी व तिच्या पार्स्‌निप या उपनदीच्या उगमाच्या दिशेने प्रवासाला निघाला या नद्यांचा  जलविभाजक (रॉकी पर्वत) ओलांडून फ्रेझर नदीच्या प्रवाहाला अनुसरून तो खाली उतरू लागला. परंतु पश्चिमेकडे जाण्यासाठी हा नदीप्रवाह सोडून जमिनीवरील मार्गाने तो पॅसिफिकला मिळणाऱ्या बेला कूल नदीप्रवाहाला येऊन मिळाला. या नदीमार्गानेच तो मुखाकडील भरती–ओहोटीच्या मर्यादेपर्यंत येऊन पोहोचला (२१ जुलै १७९३). अशा रीतीने मेक्सिकोच्या उत्तरेकडील अमेरिका खंड पार करणारा अलेक्झांडर मार्केंझी हा पहिला यूरोपियन ठरला. तेथून तो पुन्हा फोर्ट फोर्कला परतला (२४ ऑगस्ट १७९३).

या दुसऱ्या यशस्वी सफरीनंतर मार्केंझीने प्रथम नॉर्थ–वेस्ट कंपनीच्या आणि त्यानंतर ‘एक्सवाय्’ कंपनीच्या फर व्यापाराचे काम एकाग्रतेने केले. या दोन्ही कंपन्यांचे १८०४ मध्ये विलीनीकरण झाले. १७९९ मध्ये कंपनीच्या कामातून मुक्त होऊन तो इंग्लंडला आला. तेथेच त्याने आपल्या समन्वेषणावरील व्हॉयिज फ्रॉम माँट्रिऑल ऑन द रिव्हर सेंट लॉरेन्स, थ्रू द काँटिनेंट ऑफ नॉर्थ अमेरिका, टू द फ्रोझन अँड पॅसिफिक ओशन्स, इन द  यिअर्स १७८९ अँड १७९३ हे पुस्तक प्रकाशित केला (१८०१). इतरांनीही त्याच्या कामगिरीविषयी  लेखन  केलेले आढळते. १८०२ मध्ये तिसऱ्या जॉर्जने त्याला सरदारकी दिली. १८०४ ते १८०८ या काळात त्याने कॅनडातील हंटिंग्टन परगण्याच्या कनिष्ठ विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यानंतर वास्तव्यासाठी तो स्कॉटलंडला परतला. १८१२ मध्ये तो विबाहबद्ध झाला. स्कॉटलंडमधील डंकेल्ड येथे त्याचे निधन झाले.

चौधरी, वसंत