माकड लिंबू : (रानलिंबू क. आडवी निंबे सं. अटवी जंबीर इं. वाइल्ड लाइम लॅ. ॲटलँशिया रॅसिमोजा कुल-रूटेसी). हा लहान काटेरी वृक्ष (किंवा झुडूप) श्रीलंकेत व भारतात सर्वत्र जंगलात आढळतो. पाने संयुक्त, एकदली, एकाआड एक व सुगंधी दल ५–१० X २·५ –४ सेंमी., दीर्घ वर्तुळाकृती, गोलसर टोकावर मध्ये खाच असलेली (निम्नमध्य), गुळगुळीत, सूक्ष्मदंतुर (फार बारीक दाते असलेल्या किनारीची) व चिवट असून देठ सपक्ष (पंखधारी) असतो. फुले पानांच्या बगलेत अकुंठित वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. ती द्विलिंगी, साधारणतः ३–५ खंडयुक्त, पांढरी, सुगंधी व लहान असतात. केसरदले व तंतू बहुधा जुळून नलिकाकृती झालेली किंवा ते फक्त तळाशी जुळलेले असतात. बिंब पेल्यासारखे असते [⟶ फूल]. मृदुफळ लहान (व्यास २ सेंमी.), बोराएवढे व गोलसर असून एप्रिल–मेमध्ये पिकते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रूटेसी वा सताप कुलातवर्णन केल्याप्रमाणे असतात.
लाकूड कठीण, जड व पिवळे असून खोकी व पेट्या यांकरिता आणि कातीव व कापीव कामास चांगले पाने व मुळे औषधी मूळ उत्तेजक व जंतुनाशक फळांचे तेल जुनाट संधिवातावर व पक्षाघातावर बाहेरून लावण्यास उपयुक्त आसते. पानांत ०·४–०·६ टक्के बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. पानांचा काढा सांध्याची सूज शेकण्यास वापरतात. कफयुक्त दमा व पडसे आले असताना पाने चिलमीतून ओढतात. ॲ. मोनोफायला या वनस्पतीची कित्येक लक्षणे व गुणधर्म वर वर्णन केल्याप्रमाणे आहेत.
संदर्भ: Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, Delhi, 1975.
परांडेकर, शं. आ.