ऑनेग्रेसी: (शिंगाडा-शृंगाटक-कुल). आवृतबीज वनस्पतींपैकी [→ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] द्विदलिकित या वर्गातील ⇨मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) गणात या कुलाचा अंतर्भाव केलेला आहे. याचा प्रसार समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील ओलसर व पाणथळ जमिनीत असतो. यात अंदाजे ३८ वंश व ५०० जातींचा समावेश आहे. बहुतेक वनस्पती ⇨षधी, लहान क्षुप (झुडूप) किंवा जलवासी आहेत पाने साधी व फुले एकटी किंवा फुलोरा [मंजरी, कणिश, → पुष्पबंध] असतो. ती द्विलिंगी, नियमित, अवकिंज, चतुर्भागी, क्वचित द्विभागी असतात. संदले ४ (क्वचित २–५), अंशत: किंवा पूर्णतः किंजपुटात वेढून राहणारी प्रदले ४ (क्वचित ०), सुटी केसरदले ४ किंवा ८ किंजमंडल अध:स्थ व ४–६ किंजदलांचे असते [→ फूल]. ⇨शिंगाडा या वनस्पतीत किंजपुट अर्धवट अध:स्थ असते. किंजपुटातील प्रत्येक कप्प्यात एक वा अनेक बीजे बनतात. फळ विविध प्रकारचे असते. या कुलातील ⇨फुक्सिया, ⇨इनोथेरा रोजिया, ⇨क्‍लार्किया वगैरे शोभेच्या वनस्पती बागेतून लावतात. महाराष्ट्रात ⇨पानलवंग वगैरे दलदलीत सापडतात. शिंगाडा संपूर्णपणे पाण्यात वाढतो व त्याच्या बिया उकडून अगर पीठ करून खातात.

वर्तक, वा. .