(१) हिंदोळा-महाल, सु. १४२५, (२) राणी रूपमतीच्या महालाचा मंडप, (३) छप्पन्न महाल.मांडू : मांडवगड. मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध ठिकाण. धार शहराच्या आग्नेयीस ३९ किमी. वर विंध्य पर्वतातील १०९ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या एका पठारावर हे आहे. समुद्रसपाटीपासून उंची ६३४ मी. असून याच्या तीन बाजूंना १८३ मी. खोल व २०० ते ६०० मी. रुंदीचा खंदक आहे. या खंदकाला ‘कांकडा डोह खंदक’ असे म्हणतात. याच्या दक्षिणेस निमाडचे मैदान आहे. हा गिरिदुर्ग टेकड्यांनी बनलेला असून हा पठारी भाग उंचसखल असल्याने त्यावर बरेच लहानमोठे जलाशय आढळतात. या पठारावर १२ नैसर्गिक तलाव असून काहींची लांबी पाच किमी. पर्यंत आढळते. सागर, मुंजा, कपूर हे त्यांतील प्रमुख तलाव होत. मांडूचा परिसर हिरव्यागार वनश्रीने आच्छादलेला असून त्यातून पाण्याचे पांढरेशुभ्र प्रवाह वाहताना दिसतात. विशेषतः पावसाळ्यातील हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे याला ‘सिटी ऑफ जॉय’ असे संबोधले जाते. ऐतिहासिक उल्लेखांमध्ये याचे मांडवगड, मंडपदुर्ग, मंडपाचल, मंडपगिरी, मंडपाद्री, मंडपशैल व शदीबाद असे नामोल्लेख आढळतात.

मांडूच्या स्थानेविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. सहाव्या शतकात याची स्थापना झाली असे मानले जात असले, तरी आठव्या शतकापर्यंत या गिरिदुर्गाबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. येथील भग्नावशेषांच्या अभ्यासावरून तो एक प्राचीन गिरिदुर्ग असावा, एवढेच अनुमान काढता येते. आठव्या ते तेराव्या शतकांत हा भाग परमार वंशीयांच्या आधिपत्याखाली होता. त्या काळात येथे कलेचा व साहित्याचा उत्कर्ष झाला. १४०१ मध्ये माळव्याच्या घोरी घराण्यातील पहिला सुलतान दिलावरखान याने आपली राजधानी धार येथून हलवून मांडवगड येथे नेली. दुसरा सुलतान हुशंगशहा याने (१४०५–३४) येथील प्रमुख वास्तू बांधविल्या. सोळाव्या शतकापर्यंत मांडूवर खल्‌जी , लोदी व घोरी यांच्या सत्ता होऊन गेल्या. अकबर, जहांगीर व शाहजहान या मोगल सम्राटांचे येथे बराच काळ वास्तव्य होते. ‘उत्कृष्ट निसर्गसुंदर ठिकाण’ म्हणून जहांगीरने याचे वर्णन केलेले आहे. सोळाव्या शतकात ⇨ बाझ बहादूर हा मांडूवर राज्य करीत होता (१५५४–६४). राणी रूपमती व बाझ बहादूर यांच्या रोमांचकारी प्रणयकथा आजही येथे लोकगीतांतून ऐकावयास मिळतात.

या गिरिदुर्गाभोवती ३७ किमी. लांबीची गोलाकार कोटाची भिंत आहे. याला एकूण दहा दरवाजे आहेत. गडाचे प्रवेशद्वार (दिल्ली दरवाजा) हुशंगशहाने बांधलेले असून त्याला लागूनच गाडी दरवाजा आहे.

खंडकर, प्रेमलता

वास्तुकला : आज जुन्या वास्तूंपैकी केवळ काहीच वास्तू उभ्या आहेत. हुशंगशहाने बांधलेली जामी मशीद, तिला जोडून असलेले त्याचे थडगे आणि समोर रस्त्याच्या पलीकडे ‘अश्रफी-महल’ हा राजप्रासाद असा एक समूह आहे. या वास्तू खूपच एकसारख्या आहेत. डौलदार उभट घुमट, साध्या पण ओघवान रेषांच्या कमानी व रंगीत कौले हे त्यांचे विशेष. अश्रफी-महालाच्या चारी कोपऱ्यांवर मनोरे होते, त्यांपैकी एक ‘हप्त मंझील’ सात मजली होता व तो हुशंगचा वारस महमूद याने राजा कुंभावर मिळविलेल्या विजयाचे स्मारक म्हणून उभारला होता. दिल्ली दरवाजाच्या आसपासच्या दुसऱ्या समूहात ‘जहाज-महाल’ व ‘हिंदोळा-महाल’ या प्रसिद्ध वास्तू आहेत. जहाज-महाल’ हा जलमंदिरासारखाच होता पण भोवतीचे तलाव फारच मोठे असल्याने तो जहाजासारखा वाटे. हिंदोळा-महालाला उतरते धिरे दिलेले असल्याने तो डोलत असल्याचा भास होई. तिसरा वास्तुसमूह सल्तनतीच्या ऐन वैभवाच्या काळातला. या वास्तुसमूहात बाझ बहादूर आणि राणी रूपमती यांचे महाल, बारादरी, सुटे मंडप अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तू पहिल्या समूहासारख्या बोजड वाटत नाहीत, तर हलक्याफुलक्या वाटतात. खांब बारीक व कमानी मोठ्या आहेत. राजस्थानी छत्र्यांसारखेच हे मंडप दिसतात. यावेळेपर्यंत राजस्थानी वास्तुशैलीचा प्रभाव त्या प्रदेशांत जाणवू लागला असावा. मांडू हे नगर आज भग्नावस्थेत असले, तरी शिल्लक असलेल्या वास्तू व एकंदर परिसर विलोभनीय दिसतो.

माटे, म. श्री.

संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture (The Islamic Period), Bombay, 1959.

            2. Department of Tourism, Government ofIndia, Mandu, New Delhi, 1958.

            3. Yazdani, Gulam, Mandu, the City of Joy, Oxford, 1929.