माइल्लधवल : दव्वसहावपयास (सं. रूप -द्रव्यस्वभावप्रकाश) किंवा बृहत् नयचक्र ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि शौरसेनी भाषेत लिहिलेल्या, जैन तत्त्वज्ञानाविषयक संग्रह ग्रंथाचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. तथापि नयचक्र हा जैन तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिणाऱ्या देवसेनांचा तो शिष्य होता, असे दिसते. गुरू देवसेनांना वंदन करून माइल्लधवलाने दव्वसहावपयास हा आपला ग्रंथ देवसेनांच्या नयचक्रात समाविष्ट केला. त्यामुळे देवसेनांच्या मूळ ‘लघु’ असलेल्या नयचक्राला ‘बृहत्’ हे विशेष लावले गेले.

४२३ गाथांच्या दव्वसहावपयासात गुण, पर्याय, द्रव्यसामान्य, पंचास्तिकाय, पदार्थ, प्रमाण, नय, निक्षेप, दर्शन, ज्ञान तसेच सरागचारित्र, वीतरागचरित्र आणि निश्चियचारित्र इ. विषयांची चर्चा आली आहे.

तगारे, ग. वा.