दुर्गदेव : (अकरावे शतक). दिगंबर जैन संप्रदायातील एक विद्वान आचार्य. ह्याची चरित्रात्मक माहिती फारशी उपलब्ध होत नाही. त्याच्या गुरूचे नाव संजयदेव. दुर्गदेवाने मरणकरंडिका ह्या परंपरागत ग्रंथाच्या आधारे मृत्युसूचक अपशकून, स्वप्ने इत्यादींची माहिती देणारा ⇨ रिष्टसमुच्चय  हा ग्रंथ इ. स. १०३२ मध्ये कुंभनगर (कुंभेरगड, भरतपूर) येथे लिहिला. हा ग्रंथ  मुख्यतः शौरसेनी प्राकृतात लिहिलेला आहे. ह्याशिवाय दुर्गदेवाने अग्घकंड  (अर्धकांड) ह्या नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला आहे. कोणत्या वस्तूंचा क्रयविक्रय केल्याने लाभ होतो, हे ह्या ग्रंथात सांगितले आहे.

तगारे, ग. वा.