शौरसेनी साहित्य : शौरसेनी भाषेतील साहित्यात धार्मिक आणि लौकिक असे दोन प्रकारचे साहित्य आढळते. धार्मिक साहित्यात दिगंबर जैनांचे धर्मगंथ अंतर्भूत असून त्यांतील शौरसेनीवर अर्धमागधी आणि माहाराष्ट्री ह्या भाषांचे संस्कार असल्यामुळे तिला ‘ जैन – शौरसेनी’ असे म्हटले जाते. लौकिक साहित्य, संस्कृत नाटकांतून आणि प्राकृत ⇨सट्टकांतून (सुखात्मिकेसारखा एक नाट्यप्रकार) येणारी विशिष्ट पात्रांची बोली असून तीत प्राकृत व्याकरणकारांनी सांगितलेली शौरसेनी भाषेची काही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

जुन्या परंपरेप्रमाणे दिगंबर जैन गंथांचे चार भागांत वर्गीकरण केले जाते : (१) प्रथमानुयोग (पौराणिक वाङ्मय), (२) करणानुयोग (जैन परंपरेतील विश्वविषयक ज्ञान), (३) द्रव्यानुयोग (व्यापक अर्थाने तत्त्वज्ञानविषयक) आणि (४) चरणानुयोग (आचारधर्मविषयक गंथ). द्रव्यानुयोग, चरणानुयोग, करणानुयोग आणि प्रथमानुयोग ह्या कमाने ह्यांची माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे :

द्रव्यानुयोग : ह्यात दिगंबर जैनांचे आगम साहित्य, आगमांवरील टीका आणि आगमलक्ष्यी साहित्य ह्यांचा अंतर्भाव होतो.

दिगंबर जैन आचार्यांनी श्वेतांबरांचे अर्धमागधी भाषेतील आगम अप्रमाण मानले. त्यामुळे दिगंबर मुनिपरंपरेत मूळ आगमांचा स्मृतिशेष असा जो भाग होता, तो शौरसेनीत गंथनिबद्ध करण्यात आला. उदा., ⇨पुष्पदंत व भूतबली ह्यांचा ⇨षट्खंडागम आचार्य गुणधरांचा कसाय-पाहुड (कषायप्राभृत). स्मृतिशेष असलेल्या ज्ञानप्रवादनामक ‘ पूर्व ’गंथातील ‘ पेज्ज-दोस-पाहुड’(प्रेयोद्वेष किंवा प्रेयस-द्वेष प्राभृत) ह्याच्या आधारे कसाय-पाहुडाची रचना केल्यामुळे त्यास पेज्ज-दोस-पाहुड असेही म्हणतात. कर्मबंधास कारणीभूत होणाऱ्या कोध, मान, माया, लोभ ह्या कषायांची चर्चा त्यात आहे. ह्या गंथाचे एकूण १५ अधिकार (विषय विभाग) असून पहिल्या आठ अधिकारांत संसाराला कारणीभूत होणाऱ्या मोहनीय कर्मांचा विचार केला आहे. उरलेल्या सात भागांत आत्म-परिणामांच्या विकासाने शिथिल होत जाणाऱ्या मोहनीय कर्मांच्या विविध दशांचे वर्णन आहे. शौरसेनी आगमावर ⇨कुंदकुंदाचार्य, ⇨यतिवृषभ, शामकुण्ड, ⇨ समंतभद्र इ. थोर आचार्यांनी ‘ मणि-प्रवाल ’शैलीत (संस्कृतमिश्रित शौरसेनी प्राकृतात) टीका लिहिल्या आहेत. त्यांत मूळ विषयाच्या स्पष्टीकरणाबरोबरच अन्य आनुषंगिक लोकोपयोगी विषयांचाही परामर्श घेतलेला आहे. वीरसेनाचे षट्खंडागमावरील ⇨धवला (इ. स. ८१६), तसेच वीरसेन व जिनसेन ह्या गुरूशिष्यांनी कसाय-पाहुडावर लिहिलेली ⇨जयधवला (इ. स. ८३७) ह्यांचा समावेश होतो.

आगमलक्ष्यी साहित्यात कुंदकुंदाचार्यांनी महत्त्वाची गंथरचना केली आणि दिगंबर जैन सांप्रदायिकांना सिद्धांत, कर्म व आचार यांसंबंधी मार्गदर्शन केले. समयसार, प्रवचनसार आणि ⇨पंचास्तिकाय ही गंथत्रयी तसेच दसभत्ति (दशभक्ती), अट्ठपाहुड (अष्टप्राभृत) हे त्यांचे काही निर्देशनीय गंथ होत. ह्यांपैकी अट्ठपाहुड लिहिणारे कुंदकुंदाचार्य दुसरे कोणी असतील, असे काहींचे मत आहे. कुंदकुंदाचार्यांनंतर जैन तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडणारा मीमांसक म्हणजे नेमिचंद्र (इ. स. अकरावे शतक) होय. त्यांनी गोम्मटसार, त्रिलोकसार, लब्धिसार, क्षपणसार आणि द्रव्यसंग्रह हे गंथ लिहिले. ह्यांपैकी गोम्मटसार सर्वांत लोकप्रिय आणि प्रभावी आहे. जीवकांड (७३३ गाथा) आणि कर्मकांड (९७२ गाथा) असे ह्या गंथाचे दोन भाग. जीवकांडात महाकर्म-प्राभृतातील जीवस्थान, क्षुद्रबंध, बंधस्वामी, वेदनाखंड व वर्गणाखंड ह्या पाच सिद्धांत-विषयांचे वर्णन आहे. कर्मकांडात प्रकृतिसमुत्कीर्तन, बंधोदयसत्त्व इ. कर्मांच्या विभिन्न अवस्थांचे वर्णन केले आहे. ह्या गंथावर नेमिचंद्रकृत जीवप्रदीपिका आणि अभयचंद्रकृत मंद-प्रबोधिनी ह्या संस्कृत टीका असून तोडरमल ह्या अभ्यासकाने लिहिलेली हिंदी टीकाही (सम्यग्ज्ञानचन्द्रिका, १७६०) आहे. गोम्मटसारा शी संबद्घ असलेल्या लब्धिसारा त (६४९ गाथा) आत्मशुद्घिरूप ‘ लब्धी ’प्राप्त करून घेण्याचा विधी सांगितला आहे. त्रिलोकसारा त (१,०१८ गाथा) त्रैलोक्यविषयक जैन पौराणिक कल्पनांचे विवेचन आहे. क्षपणसारात कर्मक्षय करणाऱ्या विधीचे विवेचन असून त्यावर माधवचंद्र त्रैविदयाने संस्कृत टीका लिहिली आहे (इ. स. १२०३). द्रव्यसंग्रहा त (५८ गाथा) जीव व अजीव तत्त्वांच्या विवेचनातून जैन तत्त्वज्ञान थोडक्यात मांडले आहे.

षट्खंडागम परंपरेतील कर्मसिद्धांतावरील दुसरा महत्त्वाचा गंथ म्हणजे पंचसंगह (पंचसंग्रह) होय. ह्याचा काल व कर्ता निश्चित नाही. ह्या गंथाच्या पाच प्रकरणांत प्रत्येकी स्वतंत्र मंगलाचरण व प्रतिज्ञा असल्यामुळे हे मूळ स्वतंत्र गंथ असावेत. यांवर प्रभाचंद्रयतीची (इ. स. सोळावे शतक) संस्कृत टीका आहे. शिवशर्मा किंवा शिवशर्मकृत कम्मपयडि ( कर्मप्रकृती ४१५ गाथा) ह्या गंथात कर्मसिद्धांत मांडला असून त्यावर मलयगिरीची टीका आहे.

ह्यांशिवाय कर्मसिद्धांताच्या भिन्न विभागांवर अतिसंक्षिप्त पण सुव्यवस्थित रचना असलेले सहा प्राचीन कर्मगंथ असे : (१) शतक (कर्ता शिवशर्मा), (२) कम्मविवाग (कर्मविपाक-कर्ता गर्गर्षी), (३) सडसीइ (षडशीती-कर्ता जिनवल्लभगणि), (४) कर्ता अज्ञात असलेले कम्मत्यव (कर्मस्तव), (५) बंधसामित्त (बंधस्वामित्व) आणि (६) सत्तरी (सप्ततिका). ह्या गंथांवर अनेक चूर्णी, भाष्ये, वृत्ती इ. उपलब्ध आहेत. जीवसमास (२८६ गाथा) ह्या गंथात एका जुन्या, पण अज्ञात गंथकाराने जीवादी द्रव्यांचे विवेचन केले असून त्यावर मलधारी हेमचंद्राने ७,००० श्लोकांची बृहद्‌वृत्ती लिहिली आहे (११०७). देवेंद्रसूरीने (इ. स. तेरावे शतक) कर्मविपाक (६० गाथा), कर्मस्तव (३४ गाथा), बंधस्वामित्व (२४ गाथा), षडशीति (८६ गाथा) व शतक (१०० गाथा) ही कर्मसिद्धांतावरील पाच प्रकरणे लिहिली, ती ‘ नवे कर्मगंथ ’म्हणून प्रसिद्ध आहेत.

चरणानुयोग : ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आचारधर्मपर गंथांत णियमसार (नियमसार-१८७ गाथा), अट्ठपाहुड, दसभत्ति बारस अणुवेक्‌खा (द्वादशानुप्रेक्षा) ह्या कुंदकुंदाचार्यांनी लिहिलेल्या प्रकरणांचा अंतर्भाव होतो. रयणसार (रत्नसार-१६७ गाथा) हा गंथ कुंदकुंदांच्या नावावर असला, तरी त्यातील अपभंश पद्ये व इतर पुरावे पाहता तो त्यांचा नसावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

वट्टकेराचार्यकृत मूलाचार (१,२५२ गाथा) हा दिगंबर मुनिधर्मावरील सर्वश्रेष्ठ गंथ. मुनींच्या आचारास आवश्यक असलेली महावते, समिती, केशलुंच, अचेलकत्व (नग्नत्व), अस्नान इ. २८ गुणांचे सविस्तर वर्णन त्यात आहे. ⇨शिवार्यकृत ⇨ आराधना हा मुनिधर्मावरील दुसरा महत्त्वाचा गंथ. त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन नंतर अनेक आराधनागंथ निर्माण झाले. स्वामिकुमार अथवा कार्तिकेय ह्यांनी लिहिलेल्या कत्तिगेयाणुवेक्‌खा (कार्तिकेयानुप्रेक्षा-४८९ गाथा) ह्या गंथात अधुव, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा,लोक, बोधिदुर्लभ व धर्म ह्या बारा अनुप्रेक्षांचे सविस्तर वर्णन आहे. अखेरीस बारा तपांविषयीही लिहिले आहे. शुभचंद्राने ह्या गंथावर संस्कृत टीका लिहिली आहे (इ. स. १५५६).

करणानुयोग : दिगंबर जैनांच्या विश्वविषयक पौराणिक कल्पना मांडणाऱ्या साहित्याचा विभाग ‘ करणानुयोग ’ह्या नावाने ओळखला जातो. त्यातील लोकविभाग हा पहिला गंथ लुप्त झाला असला, तरी सिंहसूरीने त्याचा संस्कृतात केलेला संक्षेप उपलब्ध आहे. ⇨यतिवृषभकृत ⇨ तिलोयपण्णत्ति (त्रिलोकप्रज्ञप्ति, इ. स. पाचवे ते सातवे शतक) हा भूगोल-खगोलविषयक गंथही प्रसिद्ध आहे. पद्मनंदीकृत ⇨जंबुद्दीवपन्नत्ति हा गंथ भूगोलविषयक माहितीबरोबरच महावीरोत्तर आचार्यांचा इतिहासही देतो.

प्रथमानुयोग : यातील साहित्य जैनांच्या महापुरूषांविषयी परंपरागत माहिती देणारे पण शौरसेनीतील साहित्यापुरते म्हणावयाचे तर अशी माहिती वर उल्लेखिलेल्या गंथांतून विखुरलेली आहे, तत्संबंधीचे स्वतंत्र गंथ शौरसेनीत नाहीत.

लौकिक साहित्य : आपल्या नाटकात वास्तवता आणण्याच्या दृष्टीने संस्कृत नाटककार विशिष्ट पात्रांच्या तोंडी प्राकृत भाषा घालत पण कोणत्या पात्राच्या तोंडी कोणती प्राकृत भाषा घालावयाची, हे नियम भरताच्या नाट्यशास्त्रापूर्वीच ठरून गेल्याचे दिसते. उदा., ⇨अश्वघोषकृत नाटकांच्या, मध्य आशियात उपलब्ध झालेल्या पोथ्यांत गणिका व विदूषक शौरसेनीत बोलताना आढळतात. ⇨ भासाच्या नाटकांत विदूषकाचे गद्य व पद्यसुद्धा शौरसेनीत आहे. ⇨शुद्रकाच्या ⇨मृच्छकटिकात सूत्रधार, नटी, वसंतसेना, तिची आई इ. एकूण अकरा पात्रे शौरसेनीत बोलतात. ⇨कालिदासाची काही पात्रेही शौरसेनी बोलतात. ⇨ भवभूतीची नाटके संस्कृतप्रधान असून त्यांतील शौरसेनी वररूचीच्या व्याकरणाप्रमाणे आहे आणि समासबाहुल्य इ. संस्कृतप्रमाणे आहे. प्राकृत सट्टकांमधूनही- उदा., धनश्यामकृत आनंदसुंदरी यात – शौरसेनीचा उपयोग केलेला आढळतो. संस्कृत वाङ्‌मयातील शौरसेनीचे स्वरूप कृत्रीम आणि संस्कृतने भारलेले आहे.

पहा : जैन साहित्य

तगारे, ग. वा.