उमास्वाति: (इ. स. पहिल्या–चौथ्या शतकांच्या दरम्यान). एक जैन आचार्य. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन्ही पंथ त्यांना आपले मानतात. श्वेतांबर पंथ त्यांना उमास्वाती या नावाने ओळखतो, तर दिगंबर पंथात ते उमास्वाती आणि उमास्वामी अशा दोन्ही नावांनी ओळखले जातात. श्वेतांबर परंपरेप्रमाणे ते प्रज्ञापनासूत्रकार श्यामाचार्यांचे गुरू होत, तर दिगंबर परंपरेप्रमाणे ते कुंदकुंदाचार्यांचे शिष्य होत. त्यांना श्वेतांबर पूर्ववित व दिगंबर श्रुतकेवलिदेशीय असे म्हणतात. ते स्वतः आपला निर्देश वाचक असा करतात. त्यांनी लिहिलेल्या तत्त्वार्थाधिगमसूत्र  या ग्रंथावरील भाष्य त्यांचे स्वतःचेच आहे असे मानल्यास, त्यांच्यासंबंधी पुढील चरित्रविषयक तपशील उपलब्ध होतात : त्यांचा जन्म न्यग्रोधिका या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव स्वाती असून मातेचे वात्सी असे होते. घोषनंदी हे त्यांच्या गुरूचे नाव. तत्वार्थाधिगमसूत्र हा ग्रंथ त्यांनी कुसुमपुर नगरात (पाटणा शहरी) लिहून पूर्ण केला.

उमास्वातींनी पाचशे ग्रंथ लिहिले असे श्वेतांबर संप्रदाय मानतो तथापि त्यांच्या नावावर मोडणारे काही थोडे ग्रंथच आज उपलब्ध आहेत. उदा., तत्त्वार्थाधिगमसूत्र व त्यावरील भाष्य, पूजाप्रकरण, सावयपण्णत्ति आणि प्रशमरति. या ग्रंथांपैकी तत्त्वार्थांधिगमसूत्र हा ग्रंथ निश्चितपणे उमास्वातींचा असून प्रशमरति हा ग्रंथही त्यांचाच असावा, असा विद्वानांचा तर्क आहे.

तत्त्वार्थाधिगमसूत्र हा ग्रंथ संग्रहात्मक स्वरूपाचा असून त्यात जैन आगामातील ज्ञान, ज्ञेय, आचार, भूगोल, खगोल यांसारखे महत्त्वाचे विषय सूत्ररूपाने आले आहेत. जैन आगमातील एकही महत्त्वाचा विषय त्यांच्या नजरेतून सुटलेला नाही. जैनांच्या अकरा अंगांविषयीच्या त्यांच्या श्रुतज्ञानाची या ग्रंथावरून उत्तम साक्ष पटते, तसेच वैशेषिक, न्याय, योग, बौद्ध इ. जैनेतर दर्शनांचा व्यासंगही प्रत्ययास येतो. ह्या ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या कारिका पाहता उमास्वाती हे उत्तम गद्याप्रमाणे प्रसन्न पद्यही लिहू शकत होते, असे दिसून येते. हेमचंद्राच्या मते ते एक सर्वोत्कृष्ट संग्रहकार होते. उमास्वाती हे संस्कृतमध्ये ग्रंथरचना करणारे पहिले जैन आचार्य होत.

कुलकर्णी, वा. म.