षट्‌खंडागम : जैन-शौरसेनी भाषेत लिहिलेला दिगंबर-जैन पंथाचा एक प्रमाणभूत गंथ. पुष्पदंत व भूतबली (इ. स. दुसरे शतक) हे त्याचे कर्ते होत. कर्मप्राभूत, सत्कर्मप्राभूत, खंडसिद्धांत, षट्‌खंडसिद्धांत अशीही या गंथाची पर्यायी नावे रूढ आहेत. अग्रायणीय पूर्वातील कर्मप्रकृतीनामक अधिकाराच्या (विभागाच्या) आधारे षट्‌खंडागमाची रचना झालेली आहे. गंथातील सत्‌प्ररूपणेचे विवेचन करणारी १७७ सूत्रे पुष्पदंताने लिहिलेली असून उरलेली ६,००० सूत्रे भूतबलीने रचलेली आहेत. गिरनारच्या चंद्रगुंफेत तपश्चर्या करणाऱ्या आचार्य धरसेन यांनी महाविरांपासून परंपरेने चालच आलेला व आपल्या आठवणीत राहिलेला, अंगवाङ्‌मयाचा विभाग चिरंतन राहावा, म्हणून पुष्पदंत व भूतबली यांच्याकडून षट्‌गमाची रचना करवून घेतली प्रस्तुत गंथावर इ. स. सहाव्या शतकापर्यंत अनेक टिका रचण्यात आल्या उदा., ⇨ कुंदकुंदाचार्यांची परिकर्म, शामकुंडकृत पद्धती, तुंबलूराचार्यांची चूडामणी, बप्पदेव गुरूकृत व्याख्याप्रज्ञप्ति. या सर्व टीका लुप्त झाल्यामुळे वीरसेनाने ७२ हजार श्लोकांची ⇨ धवला ही टीका (नववे शतक). त्याचप्रमाणे नेमिचंद्राने षट्‌खंडागमाच्या आधारे गोम्मटसार (अकरावे शतक) हा प्रमाणभूत गंथ लिहिला.

षट्‌खडागमाचे सहा खंड आहेत. पहिला खंड जीवठ्ठाण (जीवस्थान). यात सत्, संख्या (द्रव्य प्रमाण), क्षेत्र, स्पर्शन, काल, अंतर, भाव व अल्पबहुत्व असे असे आठ अनुयोगद्वार (विभाग) व नऊ चूलिका असून त्यात गुणस्थान (जीवाच्या आध्यात्मिक अवस्थांचे टप्पे) व मार्गणा यांचे विवेचन आहे. दुसरा खंड खुद्दाबंध (क्षुल्लकबंध). यांत अकरा अधिकार (विषय) असून अकरा प्ररूपण कर्मबंध निर्माण करणाऱ्या जीवाचे व कर्मबंधाच्या भेदांचे वर्णन आहे. तिसरा खंड बंधसामित्त विचय (बंधस्वामित्व-विचय). यात कर्मबंध निर्माण करणाऱ्या जीवांच्या दृष्टीने कर्मबंधाविषयीचे विवेचन आहे. चौथा खंड वेदना. कृती व वेदना असे याचे दोन विभाग (अणुयोगद्वार) असून यात मुख्यतः वेदनांचे वर्ण आहे. कृती अणूयोगद्वारात सात प्रकार असून भाव-कृति ‘वेदना’ अणुयोगद्वाराचे सोळा अधिकार (विषय-विभाग) आहेत. पाचवा खंड वग्गणा (वर्गणा). यात मुख्य अधिकार (विषय) बंधनीय कर्म असून त्यात तेवीस प्रकारच्या वर्गणांचे वर्णन आहे. याखेरीज यात स्पर्श, कर्म, प्रकृती व बंध ह्या चार अधिकारांचा अंतर्भाव केला आहे. सहावा खंड महाधवल किंवा महाबंध हा असून त्यात जीव व कर्म यांच्या बंधप्रकारांची सखोल चर्चा केलेली आहे [⟶ महाधवल].

पहा : जैन दर्शन जैन साहित्य शौरसेनी साहित्य.

संदर्भ : १. जैन, हिरालाल, संपा. षट्खंडागम, अमरावती,१९५८.

२. तगारे, ग. वा. प्राकृत साहित्याचा इतिहास, औरंगाबाद,१९८७.

तगारे, ग. वा.