काँकर्ड : अमेरिकेच्या न्यू हॅंपशर राज्याची राजधानी. लोकसंख्या ३०,०२२ (१९७०). हे मेरिमॅक नदीकाठी असून लोहमार्ग, सडका, व्यापार, ग्रॅनाइट खाणी यांचे केंद्र आहे. मुद्रण हा येथील प्रमुख उद्योग असून ‘काँकर्ड-कोच’ हे येथे तयार होणारे वाहन सुप्रसिद्ध होते. येथे विद्युत्‌ उपकरणे, यंत्रे, लाकूडकाम, चामड्याच्या वस्तू वगैरेंचे उत्पादन होते. राज्याचे ऐतिहासिक कागदपत्रांचे संग्रहालय, नगर भवन, सेंट पॉल हे जुने विद्यालय, रॉल्फ रुमफोर्ड संस्था, मेरी बेकर एडीचे वास्तुगृह वगैरे अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत.

लिमये, दि. ह.