मॅस्टिगोफोरा : प्रोटोझोआ या प्राणिसंघाचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे केले जाते व त्याबाबत एकमत नाही. यांपैकी अत्यंत आधुनिक वर्गीकरण सोसायटी ऑफ प्रोटोझूलॉजिस्ट्स या संस्थेने १९६४ साली सुचविले. त्यानुसार या संघाचे चार उपसंघांत विभाजन केले आहे. यांपैकी पहिला उपसंघ सार्कोमॅस्टिगोफोरा हा होय. या उपसंघाचे विभाजन दोन अधिवर्गांत केले आहे. व त्यांपैकी मॅस्टिगोफोरा हा एक अधिवर्ग होय. या अधिवर्गास फ्लॅजेलेटा असेही म्हणतात. यात वैचित्र्यपूर्ण विषम बहुसंख्य प्रोटोझोआंचा समावेश होतो. लहान आकारमानाचे नॉक्टिल्युकासारखे १,५०० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-६ मी.) व्यास असलेल्या प्राण्यापासून ते ३ मायक्रॉन व्यासापर्यंतचे इतर लहान मोनाडसारखे प्राणी या वर्गात आढळतात. सर्वसामान्य कशाभिकायुक्त [चाबकाच्या दोरीसारख्या लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय संरचनायुक्त ⟶ कशाभिका] प्राणी अग्रपश्च अक्ष विचारात घेता आकाराने गोलीय किंवा दंडगोलाकार असतो. हे आदि प्रोटोझोआचे जवळचे संबंधी असावेत पण त्यातल्या त्यात ⇨ सार्कोडिना या अधिवर्गाचा व त्यांचा निकटचा संबंध असावा. या प्राण्यांचा आकार, समूहरचना, आतील रचना, बाहेरील कवच, रंग चयापचयक्रिया (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी), प्रजनन व प्रर्यावरण यांत खूपच वैचित्र्य आढळते. मॅस्टिगोफोरात वनस्पतींची काही वैशिष्ट्ये आढळतात. त्यावरून बऱ्याच वेळा यांच्या काही जातींचा समावेश वनस्पतींतही केला जातो. काहींच्या मते हे कशाभिकायुक्त प्रोटोझोआ प्राणी व वनस्पती यांच्यातील दुवा आहेत.

सर्व मॅस्टिगोफोरांचे एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे कशाभिका होत. यांची संख्या एक, दोन किंवा अनेक असते व यांची चलनवलनास मदत होते. काही मॅस्टिगोफोरांत कशाभिकांचा ऱ्हास झालेला आहे. काही प्राण्यांत एकच अग्रीय कशाभिका असते, तर काहींत ती पश्चभागी असते. कशाभिकांच्या रचनेचे आणखीही काही प्रकार आढळतात. एक अग्र व दोन पश्च वा आठ अग्र अशाही रचना अस्तित्वात आहेत. काही प्राण्यांत शरीराच्या दोन्ही बांजूस एक किंवा अनेक कशाभिका असतात. ज्या काही प्राण्यांत कशाभिकेचा ऱ्हास झालेला असतो, ते प्राणी अमीबीय गतीने [⟶ प्राण्यांचे संचलन] हालचाल करतात.

शरीररचना : हे एककोशिक (एकाच पेशीचे बनलेले) प्राणी आहेत. कोशिकेचा आकार सामान्यतः लांबट असतो. मोनस या वंशातील कोशिकेचा आकार गोलीय आहे पण अंडाभ, नासपती (पेअर) फळासारखा, तर्करूप (चातीसारखा), सूच्याकृती, नलिकाकृती, सपाट या आकारांच्या कोशिकाही आढळल्या आहेत. सपाट आकार असलेल्या कोशिका पाण्यात न पोहता सरपटत जातात. काही जातींतील कोशिकांचा आकार स्थिर राहतात, तर काहींत ते बदलतात. यूग्लीना या वंशात असे बदल आढळून येतात. कशाभिकायुक्त प्राण्यांच्या कोशिकेची रचना वाटते तितकी साधी नसते. यांच्या कोशिकाद्रव्यात बऱ्याच रिक्तिका (पोकळ्या) आढळतात. काही कोशिकांत रंगद्रव्ये असतात. जर या कोशिकांत वर्णवलय असले, तर रंगद्रव्ये या वर्णवलयात विलीन झालेली असतात. कशाभिकेच्या बुडाशी काही वेळा संकोचशील रिक्तिका (आकुंचन पावू शकणाऱ्या जलीय विद्राव व स्त्राव असलेल्या पोकळ्या) आढळतात. कोशिकेभोवती सेल्युलोजाचे किंवा कायटिनयुक्त, सिलिकायुक्त अथवा कॅल्शियमयुक्त द्रव्याचे आवरण (लोरिका) असते.

बहुतेक जाती एककोशिक आहेत पण कित्येक जातींच्या प्राण्यांत समूह निर्मिती आढळते. या समूहाचे एकत्र रूप ही निरनिराळे (चपटा, अनियमित, नलिकाकार वगैरे) आकार घेते. व्हॉल्व्हॉक्समध्ये ते गोलीय असते. काही वेळा कोशिकांना आधाराला चिकटण्यासाठी फुलाच्या देठासारखा दांडा असतो.

कशाभिका : यात एक जटिल (गुंतागुंतीच्या) स्वरूपाचा अक्षीय तंतू असतो. या तंतूच्या बाजूस मॅस्टिगोनिम या नावाने ओळखले जाणारे तंतू असतात. कशाभिकेचा आरंभ ब्लीफेरोप्लास्ट या सूक्ष्म केंद्रापासून होतो. प्रत्येक कशाभिकेचे ब्लीफेरोप्लास्ट एकमेकांशी बारीक तंतूने जोडलेले असतात. या तंतूस पॅराडेस्मोस म्हणतात. ब्लीफेरोप्लास्टापासून केंद्रकाकडे (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर जटिल पुंजाकडे) जाणारे तंतूही आढळतात. कशाभिकेच्या या सर्व रचनेतूनच कोशिकेचे चलनवलन चालते. कशाभिकेच्या मुळाजवळ लाल रंगाचा बिंदू असतो. याला ‘डोळा’ असे संबोधिले जाते. हा प्रकाशग्राही व संवेदनाक्षम असतो.

केंद्रक : प्रत्येक कोशिकेत एक केंद्रक असते. काही कोशिकांत अंतःकाय कण असतो. याचे कार्य काय याविषयी अद्याप माहिती नाही पण गुणसूत्रांशी (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांशी) याचा काही संबंध नाही. केंद्राकात केंद्रिका आढळतात. यांपासून गुणसूत्रांस गुणसूत्रद्रव्य मिळते. डायनोफ्लॅजेलेटांच्या कोशिकांचे केंद्रक आकारमानाने मोठे पुटिकायुक्त असते. प्रत्येक जातीताल गुणसूत्रांची संख्या निराळी असते. कोशिकांचे विभाजन समविभाजनाने [⟶ कोशिका] होते. पुष्कळशा जातींत गुणसूत्रांची संख्या एकगुणित असते. या प्राण्यांचे प्रजोत्पादन कोशिकांच्या अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) विभाजनाने होते. काही प्राण्यांत कोशिकांचे बहुविध विभाजन होते. काही वेळा लैंगिक रीत्याही प्रजोत्पादन होते.

कोशिकांत कलकणू, गॉल्जी पिंड यांसारखी कोशिकांगेही [⟶ कोशिका] समाविष्ट असतात. यांशिवाय वर्णलवक व राखीव अन्नकणही आढळतात. वर्णलवकाचा आकार तबकडीसारखा, कपासारखा किंवा विषम जाळ्यासारखा असतो. यात एक किंवा अनेक प्रकारचे हरितद्रव्य व कॅरोटीन, झँथोफिल यांसारखी रंगद्रव्ये असतात. फायटोमोनाडीडा व यूग्लीनिडा या उपगणांतील प्राण्यांचा रंग हिरवा असतो. क्रायसोमोनाडीडाचा पिवळा, तर क्रिप्टोमोनाडीडा आणि डायनोफ्लॅजेलेट हे निळे, तपकिरी, हिरवे, गुलाबी किंवा लाल या रंगांचे असतात. वर्णलवकात प्राकलकणूंच्या (जीवद्रव्याच्या विशिष्ट सूक्ष्म दाट पुंजक्यांच्या) साहाय्याने स्टार्च निर्मिती होते. कोशिकांत लिपीडही (स्निग्ध पदार्थही) आढळते. उद्दीपनाला संवेदनशील असलेल्या नेमॅटोसीस्ट व ट्रायकोसीस्ट या रचना या प्राण्यांत आढळतात पण त्यांच्या कार्याबद्दल निश्चित माहिती नाही.

पोषण : हरितद्रव्ययुक्त प्राण्यात अकार्बनी द्रव्यापासून अन्ननिर्मिती होते. अशा प्रकारच्या पोषणास पादपसदृश पोषण म्हणतात. पाण्यात असणारे कार्बनी कण अथवा मृत जीवाच्या शरीराच्या विघटनामुळे पाण्यात मिसळलेले कण यांवर उपजीविका करणाऱ्या प्राण्यास मृतोपजीवी म्हणतात. असेही काही कशाभिक प्राणी आढळले आहेत. यूग्लीनासारखे काही प्राणी प्रकाशात पादपसदृश असतात, तर अंधारात मृतोपजीवी असतात. आणि काही प्राणी एकाच वेळी दोन्ही प्रकारांचा अवलंब करतात.

श्वसन : या प्राण्यांचे श्वसन जटिल स्वरूपाचे असते. कार्बन डाय-ऑक्साइड संकोचशील रिक्तिकांतून बाहेर फेकला जातो तसेच हरितद्रव्ययुक्त प्राणी ऑक्सिजनही याच रिक्तिकांतून बाहेर फेकतात. उत्सर्जित (शरीरक्रियेस निरूपयोगी असलेली) द्रव्येही याच रिक्तिकांतून बाहेर टाकली जातात.


पर्यावरण : तर्षणदाब [⟶ तर्षण], प्रकाश, pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] व तापमान यांच्या विस्तृत पल्ल्यात हे प्राणी जिवंत राहू शकतात. काही कशाभिक प्राणी गोड्या पाण्यात, तर काही खाऱ्या पाण्यात राहतात. ते सरळ गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात जात नाहीत. अन्नस्तूपाच्या [⟶ परिस्थितिविज्ञान] पायाशी कदाचित सूक्ष्मजंतूंनंतर या कशाभिक प्राण्यांचा क्रम लागतो. हे प्राणी आकारमानाने जरी लहान असले, तरी त्यांची संश्लेषणातील (साध्या वा मूळ घटकांपासून जटिल संयुगे तयार करण्यातील) विविधता, जलद प्रजोत्पादनशीलता आणि प्रचंड संख्या त्यांच्या लहान आकारमानास पूरक आहेत. कधीकधी महासागरात हे इतक्या मोठ्या संख्येने वाढतात व पाण्याच्या पृष्ठभागावर पसरतात की, त्यामुळे समुद्रातील मासे व अन्य जलचर प्राणी मरतात. तथापि हरितद्रव्ययुक्त कशाभिक प्राण्यांमुळे प्रदूषित पाण्यात पुन्हा हवा मिसळली जाते. पिण्याच्या पाण्यास काही वेळा यांच्यामुळे एक प्रकारचा वास व चव येते पण नैसर्गिक पाण्यातील कार्बनी द्रव्यावर सूक्ष्मजंतूंप्रमाणेच हे प्राणी तत्काळ आक्रमण करतात.

वर्गीकरण : या अधिवर्गाचे (अ) फायटोमॅस्टिगोफोरीया (किंवा फायटोफ्लॅजेलेटा) व (आ) झूमॅस्टिगोफोरीया (किंवा झूफ्लॅजेलेटा) या दोन वर्गांत विभाजन केले आहे.

(अ) फायटोमॅस्टिगोफोरिया : या वर्गात दहा गण आहेत, त्यांपैकी काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे : (१) क्रायसोमोनाडीडा : एक, दोन किंवा कधी कधी तीन कशाभिका असतात. उदा., ऑक्रोमोनस

(२) हेटेरोक्लोरिडा : दोन असमान कशाभिका, फिकट पिवळे वर्णलवक. उदा., क्लोरोमेसन.

(३) क्रिप्टोमोनाडीडा : दोन कशाभिका, एक किंवा दोन हिरवे, तपकिरी किंवा लाल वर्णलवक, उदा., क्रिप्टोमोनास.

(४) डायनोफ्लॅजेलेटा (डायनोफ्लॅजेलिडा) : सागरी, शरीरावर सर्पिल पन्हळ आणि त्यात कशाभिका. काही प्राण्यांच्या कोशिकेत विषनिर्मिती होते. हे प्राणी जर माशांनी खाल्ले, तर मासे मरतात. काही कालवे या प्राण्यांवर उपजीविका करतात. परिणामी हे विष कालवांच्या शरीरात साचून राहते. अशी कालवे जर मनुष्याच्या खाण्यात आली, तर मनुष्यही मरतो. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावरील ⇨ जीवदीप्ती नॉक्टिल्युकामुळे उत्पन्न होते. उदा., सिरेशियम, नॉक्टिल्युका.

 

(५) फायटोमोनाडीडा : आकारमानाने लहान, कोशिकेवर जाड आवरण, हिरवे वर्णलवकयुक्त, समूहाने राहणारे कशाभिक प्राणी. काही प्राण्यांच्या कोशिकाद्रव्यात लाल रंग द्रव्य असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रजोत्पादन झाल्यास पाण्यावर तांबडी साय असल्यासारखे दिसते. समूहात अगदी कमी म्हणजे चार ते व्हॉल्‌व्हॉक्ससारख्या जातीत १०,००० ते ५०,००० पर्यंत कोशिका आढळतात. यांच्यात नुसत्या विभाजनाने प्रजोत्पादन होत नाही, तर लैंगिक प्रजोत्पादन प्रकारही आढळतो. उदा., हीमॅटोकॉकस, व्हॉल्‌व्हॉक्स, पँडोरीना.

(६) यूग्लीनिडा : एक ते तीन कशाभिका. शरीरावर कठीण आवरण, हिरवे वर्णलवक. उदा., ⇨ यूग्लीना.

(७) क्लोरोमोनाडीडा : गोड्या पाण्यात राहणारे, दोन कशाभिका असलेले, भडक हिरवे वर्णलवक. उदा., गोनिस्टोमम. 

(आ) झूमॅस्टिगोफोरीया : या वर्गातील प्राण्यांत वर्णलवक नसतात. सेल्युलोज, स्टार्च, ल्युकोसिन किंवा पॅराअमायलम या पदार्थांचे संश्लेषण हे प्राणी करत नाहीत. यांच्या कोशिकांवरील कवच अत्यंत पातळ असल्यामुळे त्यांना अमीबीय हालचाल करणे शक्य होते. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले प्राणी), अपृष्ठवंशी व वनस्पती यांवर या वर्गातील बऱ्याच जाती परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या) आहेत. या वर्गात असलेल्या नऊ गणांपैकी काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे :

(१) ऱ्हायझोमॅस्टिजिडा : यांना एक ते चार कशभिका असतात व पादामही (अमीबीय हालचालीत शरीराच्या पृष्ठभागापासून उत्पन्न होणारे लहान, आखूड नलिकेसारखे भागही) असतात. उदा., मॅस्टिग अमीबा, हिस्टोमोनस (हे कुक्कुटरोगास कारणीभूत होतात).

(२) प्रोटोमॅस्टिजिडा : एक किंवा दोन कशाभिका, कोशिकेभोवती लवचिक कवच, काही मुक्तजीवी तर काही परोपजीवी, काही मुक्तजीवी समूहाने राहणारे. कशाभिकेभोवती एक कॉलरसारखी संरचना आढळते व त्यामुळे स्पंजामधील कोआनोसाइट या कोशिकांप्रमाणे हे दिसतात. ट्रिपॅनोसोमिडी या कुलात महत्त्वाच्या परोपजीवी जाती आहेत. यांपैकी ⇨ ट्रिपॅनोसोमा हा मानवात आढळतो व यामुळे ⇨ निद्रारोग उद्‌भवतो. इतर पृष्ठवंशी प्राण्यांतही हे परोपजीवी प्राणी आढळले आहेत. यांखेरीज लिशमॅनिया, हरपिटोमोनस व फायटोमोनस या प्राजातींतील परोपजीवी प्राणीही महत्त्वाचे आहेत.

(३) पॉलिमॅस्टिजिडा : यात एककेंद्रकी, द्विकेंद्रकी किंवा बहुकेंद्रकी प्राणी आढळतात. यांना तीन ते आठ कशाभिका असतात. हेही परोपजीवी आहेत. उदा., कॉस्टिया.

(४) ट्रिकोमोनाडीडा : एक केंद्रकी किंवा बहुकेंद्रकी, कशाभिका, ब्लीफेरोप्लास्ट वगैरे कोशिकांगांच्या रचनेवरून असे अनुमान निघते की, यांची कोशिका अनेक कोशिकांच्या संघटनामुळे निर्माण झाली असावी.

(५) हायपरमॅस्टिजिडा : यातील प्राण्यांत एकच केंद्रक असते पण अनेक कशाभिका असतात. हे झुरळे, वाळवी वगैरे कीटकांच्या शरीरात परोपजीवी जीवन जगतात. उदा., लेप्टोमोनस हे झुरळात त ट्रायकेनिम्फा हे वाळवीत आढळतात.

(६) ओपॅलिनिडा : याचे इतर कशाभिक प्राण्यांशी असलेले संबंध स्पष्ट नाहीत. बहुकेंद्रकी असून यांना पुष्कळ कशाभिका असतात. हे उभयचर प्राण्यांच्या अन्ननलिकेत परोपजीवी म्हणून आढळतात.

पहा : प्रोटोझोआ.

संदर्भ : 1. Hutner, S. H. Lwoff, A., Ed., Biochemistry and Physiology of Protozoa, 3. Vol. Ⅰ, New York, 1951-1964.

             2. Hyman, L. H. The Invertebrates, Vol. Ⅰ, New York, 1940.

इनामदार, ना. भा.