मॅसॅचूसेट्स : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्य कोपऱ्यातील न्यू इंग्लंड प्रदेशातील सहा राज्यांपैकी एक राज्य. लोकसंख्या ५७,३७,०३७ (१९८०). पूर्व-पश्चिम लांबी ३०५ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १७७ किमी., क्षेत्रफळ २२,६४६ चौ.किमी. पैकी अतर्गत जलाशय १,१९१ चौ. किमी. राज्याचा आकार साधारणपणे आयताकृती आहे. मॅसॅचूसेट्सच्या उत्तरेस व्हर्माँट व न्यू हँपशर ही राज्ये, पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस कनेक्टिकट व ऱ्होड आयलंड व पश्चिमेस न्यूयॉर्क ही राज्ये आहेत. राज्याचे आग्नेयीकडील वक्राकार केप कॉड हे द्वीपकल्प अटलांटिक महासागारात १०० किमी. घुसलेले आहे. प्यूरिटन पंथीयांनी मॅसॅचूसेट्स उपसागर किनाऱ्यावर प्रथम आपली वसाहत केल्याने हे ‘उपसागर राज्य’ किंवा ‘प्यूरिटन राज्य’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय ‘बेक्ड बीन स्टेट’, ‘ओल्ड कॉलनी स्टेट’ असेही या राज्याचे नामोल्लेख केले जातात. ‘मॅसॅचूसेट्स’ म्हणजे मोठ्या टेकडीवर किंवा टेकडीजवळ. ब्लू टेकड्यांमध्ये आणि बॉस्टनच्या परिसरात राहणाऱ्या मॅसॅचूसेट या इंडियन जमातीवरून राज्याचे हे नाव आलेले आहे. इंग्लंडमधील प्यूरिटन लोकांनी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात मॅसॅचूसेट्स वसाहतीची स्थापना केली.
भूवर्णन : मॅसॅचूसेट्स भूमीवर अनेक टेकड्या व नद्यांची खोरी आढळतात. पूर्वेकडील अटलांटिक किनाऱ्यापासून पश्चिमेकडे प्रदेशाची उंची वाढत जाते. पूर्वेकडून पश्चिमेकडे राज्याचे पाच नैसर्गिक विभाग पाडता येतात : (१) अटलांटिक कोस्टल प्लेन : हिमनदीमुळे वाळूचे संचयन झालेल्या आग्नेयीकडील ‘केप कॉर्ड’ द्वीपकल्पाचा या विभागात समावेश होतो. (२) न्यू इंग्लंड सी बोर्ड लोलँड्स : अटलांटिक किनाऱ्यापासून अंतर्गत भागातील सु. ४८ किमी. पर्यंतच्या मंद उताराचा प्रदेश यात येतो. (३) न्यू इंग्लंड अपलँड्स : राज्याच्या मध्यवर्ती भागातील विस्तृत प्रदेशांचा समावेश यात होतो. या प्रदेशाची सरासरी उंची ३०५ मी. असून ती मध्यभागाकडे क्रमाक्रमाने वाढत गेलेली दिसते. पश्चिमेकडे कनेक्टिकट नदीखोऱ्यात उंची बरीच कमी झालेली दिसते. (४) ग्रीन मौंटन : यामध्ये कनेक्टिकट व हूसिक-हूसटॉनिक नद्यांमधील वनाच्छादित सुंदर, ओबडधोबड परंतु गोलाकर बर्कशर हिल्स आणि ग्रीन मौंटन ह्या डोंगराळ प्रदेशांचा समावेश होतो. ॲपालॅचिअन पर्वत आणि व्हर्माँटमधील ग्रीन मौंटनचा हा विस्तारित भाग आहे. (५) टॅकॉनिक हिल्स : हूसिक-हूसटॉनिक खोऱ्याच्या पश्चिमेस न्यूयॉर्क राज्याच्या सरहद्दीदरम्यान हा नैसर्गिक विभाग आहे. या रांगेतील मौंट ग्रेलॉक हे राज्यातील सर्वोच्च शिखर (१,०६४ मी.) आहे.
नद्या : राज्यात सर्वत्र नद्यांचे जाळेच निर्माण झालेले आढळते. उल्लेखनीय अशा १९ नद्या असून त्यांपैकी कनेक्टिकट, चार्ल्झ व मेरिमॅक या नद्या महत्त्वाच्या आहेत. उत्तर-दक्षिण दिशेत वाहणारी कनेक्टिकट ही राज्यातील सर्वांत मोठी नदी असून डिअरफील्ड, वेस्टफील्ड, चिकपी व मिलर्झ ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत. पूर्वेकडील बर्कशर या डोंगराळ प्रदेशातून हूसटॉनिक ही दक्षिणेकडे, तर हूसिक ही उत्तरेकडे वाहणारी नदी आहे. राज्याच्या ईशान्य भागातून वाहणाऱ्या मेरिमॅक या नदीचा उगम न्यू हँपशर राज्यात असून या राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात न्यूबरी पोर्टजवळ ती अटलांटिक महासागराला मिळते. नॅशूआ आणि काँकर्ड या तिच्या उपनद्या आहेत. चार्ल्झ व मिस्टिक या नद्या बॉस्टनजवळ मॅसॅचूसेट्स उपसागाराला मिळतात. चार्ल्झ नदीला अनेक नागमोडी वळणे असून या नदीने बॉस्टन व केंब्रिज ही शहरे वेगळी केली आहेत. राज्यातील पूर्वेकडील उंचवट्याच्या भागातून ब्लॅकस्टोन नदी वहाते.
मॅसॅचूसेट्स राज्याला सु. ३,२०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. बॉस्टनच्या उत्तरेकडील किनारा खडकाळ असून तेथे अनेक छोटीछोटी बंदरे आहेत, तर दक्षिणेकडील किनारा वालुकामय असून तेथे काही खाडीसारखे भागही आहेत. धोकादायक अशा खडकांवर व ‘शोल’ वर अनेक ठिकाणी दीपगृह व बोये आहेत. किनाऱ्याजवळ अनेक बेटे असून त्यांपैकी एलिझाबेथ, मार्थाज व्हिन्यार्ड व नॅनटुकिट ही मोठी आणि महत्त्वाची आहेत.
राज्यात सु. १,१०० पेक्षा अधिक सरोवरे किंवा तळी आहेत. नद्यांचे, सरोवरांचे व तळ्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेले आढळते. बऱ्याच सरोवरांची नावे खूपच मोठी आहेत. उदा., चारगॉग गॉन मॅन चॉग गॉग चॉबन अंगगमॉग किंवा चॉबन अ गंगमॉग सरोवर. या सरोवराच्या नावाचा अर्थ असा होतो की, ‘तुम्ही तुमच्या काठावर मासे पकडा, मी माझ्या काठावर मासे पकडतो, मध्यभागी कोणीही मासेमारी करावयाची नाही.’ क्वाबिन (१०१ चौ. किमी.) व वॉचूसिट हे येथील मोठे मानवनिर्मित जलाशय आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी क्वाबिनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. वॉल्डन पाँड हे छोटेसे परंतु प्रसिद्ध तळे आहे. याशिवाय इतर अनेक जलाशय निर्माण करण्यात आलेले आहेत.
हवामान : समशीतोष्ण कटिबंधीय स्थानामुळे हवामान थंड आहे. उन्हाळ्यातील सरासरी तापमान २१° से., तर हिवाळ्यातील सरासरी तापमान -१° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७ ते ११७ सेंमी. असून तो वर्षभर सारख्या प्रमाणात पडतो. हिवाळ्यात हिमवृष्टी होते. किनाऱ्यावर अधूनमधून हरिकेनची निर्मिती होते. १९३८ व १९४४ मधील हरिकेन वादळे राज्याला फारच हानिकारक ठरली.
मृदा : राज्यातील मृदा सामान्यपणे कमी प्रतीची, वालुकामय व रेतीमिश्रित आहे. नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा असून कनेक्टिकट खोरे हा राज्यातील सर्वांत सुपीक भाग आहे. किनाऱ्यावर हिमनदीच्या संचयनाचे बरेच प्राचीन अवशेष आढळतात. पीटयुक्त मृदेचे प्रमाणही बरेच आहे. खतांचा वापर करून जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतली जातात. राज्यात महत्त्वाची खनिजे नाहीत. ग्रॅनाइट, संगमरवर, चुनखडक, चिकणमाती, वाळू, वालुकाश्म ह्या बांधकामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या खनिजांचे साठे बरेच आढळतात. १९८२ मध्ये खनिजउत्पादन ८९० लक्ष डॉलर किंमतीचे झाले.
वनस्पती व प्राणी : राज्याचे ६५% क्षेत्र अरण्यव्याप्त आहे. विविध प्रकारच्या मृदा, प्रदेशाचा उंचसखलपणा व स्थानिक परिस्थितीतील भिन्नता यांमुळे वेगवेगळे वनस्पतिप्रकार आढळतात. वेगवेगळ्या प्रकारचे पाइन वृक्ष व हेमलॉक या मऊ लाकडाच्या वनस्पती सर्वत्र आढळतात. यांशिवाय ओक, ॲश, बीच, रेड सीडार, हिकरी, चेरी, मॅपल, पिवळा बर्च, अलुबुखार, बेबेरी, रानगुलाब, अझेलीया, डॉगवुड, वेगवेगळ्या प्रकारचे नेचे, लॉरेल, ऱ्होडोडेंड्रॉन, मेफ्लॉवर, सॉलोमन यांशिवाय विविध प्रकारची झुडपे इ. वनस्पतिप्रकार आढळतात. केप कॉडच्या वालुकामय पुळणींच्या भागात वनस्पतींची वाढ होत नाही. तळ्यांच्या काठावरील दलदलीच्या भागात पाणकणीस व सेज या पाणथळ वनस्पती आढळतात. मिल्कवीड (रुई), ॲस्टर, गोल्डनरॉड हे येथील स्थानिक फुलझाडांचे प्रकार, तर इतर भागांतून आलेली डेझी व दुधळ (डँडेलिऑन) ही फुलझाडे आहेत. दरवर्षी वसंत ऋतूत निळे व पांढरे ‘व्हायोलेट’ बहरलेले दिसतात.
वसाहतकाळात मोठ्या संख्येने आढळणारे लांडगे आज नामशेष झालेले आहेत. बीव्हर, ऑटर, मिंक, लिंक्स (बिडाल), अस्वल, हरिण, ससा, रॅकून, चिचुंदरी, लाल व करड्या रंगाचा कोल्हा, ऑपॉस्सम, स्कंक, खार, वीझल इ. प्राणी व ग्राउझ, वुडकॉक, क्वेल, वुडडक, फेझंट, ब्ल्यू जे, व्हिपरविल, हळदी, फिंच, चिमण्या, कस्तूर इ, प्रकारचे पक्षी आढळतात. अटलांटिक महासागर किनाऱ्यावर हंसपक्षी व बदके, अनेक प्रकारचे कुरव व कुररी तसेच सरोवरे आणि तळ्यांमध्ये बास, पिकरेल, सनफिश, ट्राउट, पिवळे पर्च, तर किनारी भागात क्लॅम, लॉब्स्टर, ऑयस्टर हे जलचर आढळतात.जलाशयांमध्ये विविध प्रकारचे मासेही आहेत.
इतिहास व राज्यव्यवस्था : इंग्लंडमधील पिलग्रिमांनी १६२० मध्ये प्लिमथ येथे वसाहत करण्यापूर्वी अनेक यूरोपीय येथे येऊन गेले. तथापि त्यांपैकी कोणीही येथे कायमची वसाहत स्थापना केली नाही. याच्याही पूर्वी अकराव्या शतकात नॉर्स लोक या प्रदेशाजवळ येऊन गेलेले असावेत. १५०० ते १६०० या कालावधीत यूरोपीय देशांमधील मासेमारी करणारे शेकडो लोकही मासेमारीसाठी न्यू फाउंडलंडच्या किनाऱ्याला येऊन गेले. १६०२ मध्ये बार्थॉलोम्यू गॉझनोल्डच्या नेतृत्वाखाली ‘काँकर्ड’ हे ब्रिटिश जहाज प्रॉव्हिन्सटाउन येथे आले होते. काही काळ थांबून तेथे त्यांनी भरपूर कॉड मासे पकडले. त्यावरून गॉझनोल्ड याने या प्रदेशाला ‘केप कॉड’ हे नाव दिले. कॅप्टन जॉन स्मिथ याने १६१४ मध्ये येथील किनाऱ्याचे समन्वेषण केले, त्याला ‘न्यू इंग्लंड’ हे नाव देऊन त्या प्रदेशाचा नकाशा तयार केला व त्याच्यावर एक वृत्तांतही लिहून काढला. या नकाशावर काही स्थलनामे नव्याने दाखविण्यात आली. मात्र इंडियनांच्या प्रतिकारामुळे त्याला तेथे वसाहत स्थापन करणे शक्य झाले नाही. वेगवेगळ्या गटांचे अनेक इंडियन लोक या परिसरात राहत होते. उदा., बॉस्टनच्या परिसरातील मॅसॅचूसेट्स, प्लिमथ येथील वांपानोआग, केप कॉड येथील नॉसिट, ईशान्य भागातील पेन्नाकूक, वुस्टर येथील निपयुक कनेक्टिकट नदीखोऱ्यातील पोकमटक व बर्कशर येथील महिकन. यूरोपियनांच्या येथील आगमनाबरोबर काही साथीच्या रोगांचेही आगमन झाले. या साथीच्या रोगांमुळे विशेषतः १६१५ ते १६१७ या काळातील, प्लेगच्या साथीमुळे, इंडियनांची संख्या बरीच घटली व त्यांचे बळही कमी झाले. त्यामुळे पिलग्रिमांना येथे वसाहत करणे सोपे झाले. इंग्लंडमधून मेफ्लॉवर जहाजातून वसाहतीसाठी अमेरिकेत आलेले पिलग्रिम १६२० मध्ये ज्या ठिकाणी उतरले व वसाहत केली, त्या ठिकाणाला त्यांनी प्लिमथ असे नाव दिले हीच न्यू इंग्लंडमधील पहिली कायमची वसाहत होय. इंग्लंडमधील प्लिमथ येथूनच मेफ्लॉवर जहाज अमेरिकेच्या प्रवासास निघाले, त्यावरूनच त्यांनी या ठिकाणाला हे नाव दिले. याचदरम्यान मॅसॅचूसेट्स उपसागराच्या अर्धचंद्राकृती किनारी भागात, प्लिमथच्या उत्तरेस इंग्रजांच्या वेगवेगळ्या गटांनी लहानलहान वसाहती स्थापन केल्या. या वसाहती पिलग्रिमांच्याच होत्या. सेलेम ही यांपैकी सर्वांत महत्त्वाची वसाहत होती (१६२९). यानंतरच्या दुसऱ्याच दशकात मोठ्या संख्येने प्यूरिटन लोक या भागात वसाहतीस आल्याने मुख्य मॅसॅचूसेट्स वसाहत बनू लागली. विल्यम ब्रॅडफर्ड याने आपल्या कुशल नेतृत्वाखाली प्लिमथ वसाहतीला स्थिरता प्राप्त करून दिली. याच्या जवळपासच इतर इंग्रजांनी आपली मासेमारी आणि व्यापारी ठाणी स्थापन केली. उदा., अँडू वेस्टन याने १६२२ मध्ये वेसॅगुसेट (सांप्रतचे वेमथ) येथे, टॉमस वुल्स्टन याने १६२५ मध्ये मौंट वुल्स्टन किंवा मेरी मौंट (क्विन्सी) येथे आपली ठाणी वसविली. १६२६ मध्ये स्थापन झालेली सेलेम ही येथील प्रसिद्ध प्यूरिटन वसाहत होती. १६२९ मध्ये न्यू इंग्लंड कंपनीचे पुनर्रचना करून तिचे ‘मॅसॅचूसेट्स बे कंपनी’ त रूपांतर केले. नंतर ५० वर्षांपर्यंत ही कंपनी स्वतंत्रच राहिली. चार्ल्झ व मेरिमॅक नद्यांदरम्यान व्यापार व वसाहत करण्याचा या कंपनीला अधिकार होता. १६३०–४२ ह्या काळात धार्मिक छळामुळे प्यूरिटनांचे इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणावर स्थालांतर झाले. जॉन विंथ्रॉप याने १६३० मध्ये घडवून आणलेल्या प्यूरिटनांच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरात इंग्लंडहून ११ जहाजांमधून ९०० वसाहतकार येथे आले. सेलेम येथे ते इतर प्यूरिटनांना मिळाले व बॉस्टन येथे त्यांनी नवीन वसाहत स्थापन केली. १६४० पर्यंत वसाहतीसाठी आलेल्या लोकांची संख्या सु. १५,००० झाली. १६३० मध्ये धर्मशास्त्रावरून प्यूरिटनांमध्ये अनेक वेगवेगळे गट पडले. त्यांतून बाहेर पडलेल्यांनी ऱ्होड आयलंड, कनेक्टिकट, न्यू हँपशर या वसाहतींची स्थापना केली. १६३६ मध्ये हार्व्हर्ड वसाहतीची स्थापना झाली. अशा प्रकारे मॅसॅचूसेट्स उपसागर किनाऱ्यावर वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या. १६४३ मध्ये मॅसॅचूसेट्स वसाहत न्यू इंग्लंड संघाची सदस्य झाली. १६७५ मध्ये इंडियन नेता किंग फिलिप याने वसाहतकऱ्यांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्यांची खूपच हानी झाली. स्वतः फिलिप त्यात मारला जाऊन त्याच्या अनुयायांवर गुलामगिरीची पाळी आली. ‘किंग फिलिपचे युद्ध’ म्हणूनच हे प्रसिद्ध आहे. १६९१ मधील एका नवीन करारानुसार मॅसॅचूसेट्स, प्लिमथ व मेन यांची मिळून एक दर्जेदार वसाहत निर्माण झाली. अंतर्गत भागातील वसाहतकारी शेती करू लागले, तर किनाऱ्यावरील लोक मासेमारी व्यवसायाकडे वळले. सुरक्षित समुद्र व चांगले लाकूड यांच्या उपलब्धतेमुळे जहाजबांधणी व्यवसायाचा विकास होऊ लागला. या जहाजांमधून मासे व लाकडी सामानाचा इंग्लंड व वेस्ट इंडीजशी व्यापार होऊ लागला. तथापि इंग्लंडने सतराव्या शतकाच्या मध्यात एक जहाजवाहतूक कायदा पास केला. या कायद्यानुसार मातृभूमी व वसाहती यांदरम्यान व्यापार हा केवळ ब्रिटिश जहाजांमधून होईल तसेच‘शुगर ॲक्ट’, ‘स्टँप ॲक्ट’, ‘टी ॲक्ट’ यांसारखे इतरही काही निर्बंध ब्रिटनने अमेरिकेतील वसाहतींवर घातले. परंतु मॅसॅचूसेट्समध्ये या निर्बंधांना दाद दिली गेली नाही. याचे पर्यवसान ‘बॉस्टन टी पार्टी’त झाले. यानंतरही ब्रिटनने मॅसॅचूसेट्स वसाहतीवर शिक्षा म्हणून असह्य असे निर्बंध लादले. परिणामतः ब्रिटिशांच्या वसाहतींविषयीच्या धोरणाला विरोध करणारे मॅसॅचूसेट्स हे मुख्य केंद्र बनले. यातूनच एप्रिल १७७५ मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचा भडका उडून लेक्झिंग्टन व काँकर्ड येथे व नंतर बॉस्टन येथे मोठ्या चकमकी उडाल्या. मार्च १७७६ मध्ये ब्रिटिश फौजा माघार घेईपर्यंत ह्या चकमकी चालू राहिल्या. या ‘बंकरहिलची लढाई’ म्हणून प्रसिद्ध आहेत. १७८० मध्ये जॉन ॲडम्सच्या नेतृत्वाखाली नवीन राज्यघटना अंमलात आली. आजही तीच प्रचलित आहे. राज्यक्रांतीत विजयी ठरलेल्या वसाहतींची आर्थिक स्थिती मात्र खालावत गेली. १७८६ मध्ये स्वातंत्र्ययुद्धातील मुरब्बी नेता डॅन्येल शेझ याच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडील शेतकऱ्यांनी पूर्वेकडील भांडवलदारांविरुद्ध बंड उभारले. परंतु राज्याच्या फौजांनी ते मोडून काढले. ‘शेझचे बंड’ म्हणूनच हे बंड ओळखले जाते. याच काळात बरेचसे शेतकरी राज्य सोडून व्हर्माँट व न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होण्यासाठी गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अतिपूर्वेकडील देशांशी, विशेषतः चीनशी, व्यापार सुरू झाल्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. १८०७ मधील जेफर्सनच्या ‘इंबार्गो ॲक्ट’ नुसार सर्वत्र विदेशी व्यापारावर पूर्णपणे निर्बंध घातले गेले. परंतु मॅसॅचूसेट्सने याला तीव्र प्रतिकार केला. १८१२ च्या युद्धालाही राज्याने तीव्र विरोध केला. यंत्रमाग वस्त्रोद्योगाचा विकास, शेतीचे कमी झालेले महत्त्व, मजूरपुरवठा व जलविद्युत्शक्तीची उपलब्धता यांमुळे १८१५ नंतर निर्मितिउद्योगांचा विकास होऊ लागला. १८२५ पासून लोहमार्गवाहतूक सुरू झाली. १८५० च्या दरम्यान जहाजबांधणी उद्योग बराच वाढला. दरम्यानच्या काळात व्हेल मासेमारीचाही विकास झाला. १८४० व १८५० मध्ये बहुसंख्येने आयरिश लोक येथे आल्याने औद्योगिकीकरण व नागरीकरण वेगाने वाढले. गुलामगिरीविरोधी चळवळीचा पुरस्कर्ता विल्यम लॉइड गॅरिसन याचा गुलामगिरीविरोधी चळवळीचा जोर राज्यात अधिक होता. विसाव्या शतकात अमेरिकेतील एक संपन्न राज्य म्हणून मॅसॅचूसेट्स ओळखले जाते.
राज्यात १७८० मध्ये स्वीकारण्यात आलेली घटनाच आज अंमलात असून आतापर्यंत तिच्यात ११६ वेळा दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत. गव्हर्नर हा राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. गव्हर्नर व ले. गव्हर्नर यांची निवड चार वर्षांसाठी केलेली असते. राज्याच्या सीनटचे ४० व प्रतिनिधिगृहाचे १६० सदस्य असून त्यांची मुदत दोन वर्षांसाठी असते. देशाच्या काँग्रेसवर राज्यातून २ सीनेटर व ११ प्रतिनिधी पाठविले जातात. १८ वर्षे वयातील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. राज्याचे एकूण १४ परगणे आहेत.
आर्थिक स्थिती : व्यापार, मासेमारी, निर्मितीउद्योग व तांत्रिक प्रगतीत हे राज्य देशात आघाडीवर आहे. एकूण लोकसंख्येपैकी एक टक्क्यापेक्षा कमी लोक शेतीव्यवसायात, २५·७% लोक निर्मितिउद्योगांत, २१·८% घाऊक व किरकोळ व्यापारांत, २२·९% सेवा व्यवसायांत व १७% लोक शासकीय सेवेत गुंतलेले आहेत (१९७९). कारखाने व निवास यांकरिता वापरल्या जाणाऱ्या जमिनीचे वाढते प्रमाण, शेतीचा लहान आकार, देशाच्या इतर भागांतून उपलब्ध होणारे स्वस्त अन्नधान्य यांमुळे वसाहतकाळापासूनच येथील शेतीव्यवसाय विशेष महत्त्वाचा नाही. राज्यात प्रगत शेती पद्धतीचा अवलंब केला जात असून दुग्धोत्पादन, अंडी, तंबाखू, कडधान्ये, शतावरी, बटाटे, कोबी, गाजर, लेट्यूस, टोमॅटो, सफरचंद, क्रॅन बेरी इ. उत्पादने घेतली जातात. क्रॅन बेरी फळाच्या उत्पादनासाठी हे राज्य देशात अग्रेसर असून येथून ही फळे सर्वत्र पाठविली जातात.
वसाहतकाळातच बॉस्टन हे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अमेरिकन राज्यक्रांतीनंतरच्या काळात सेलेम व बॉस्टन येथून चीनशी व्यापार चालत असे. एकोणिसाव्या शतकात सागरी व्यापारात घट झाल्याने हे राज्य निर्मितिउद्योगांकडे वळले. १८१४ मध्ये फ्रान्सिस कॅबट लॉवेल याने वॉलथॅम येथे देशातील पहिली कापड गिरणी सुरू केली. तेव्हापासून कापड व लोकर उद्योगांची झपाट्याने वाढ झाली व मेरिमॅक नदीखोऱ्यातील लोअल व लॉरेन्स, कनेक्टिकट नदीवरील चिकपी, दक्षिण किनाऱ्यावरील फॉल रिव्हर व न्यू बेडफर्ड ही कापडउद्योगाची प्रमुख केंद्रे बनली. बॉस्टन हे लोकरीच्या ठोक व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. तथापि १९२० मध्ये दक्षिणेकडील कापडउद्योगातील आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर, स्वस्त मजूर व शक्तिसाधनांचा पुरवठा यांमुळे राज्यातील जुन्या कापड गिरण्यांना त्यांच्याशी तीव्र स्पर्धा करावी लागली. परिणामतः राज्याने लोकर, लोकरीचे सूत व पादत्राणे या उद्योगांच्या विकासावर अधिक भर दिला. पूर्व मॅसॅचूसेट्समधील लीन, ब्रॉक्टन व हेव्हरिल ही पादत्राणे उद्योगाची प्रमुख केंद्रे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात राज्यातील वस्त्रोद्योगातील कामगारांची संख्या सु. ९०,००० नी कमी झाली. युद्धोत्तर काळात इलेक्ट्रॉनिकी साहित्य व विज्ञानाभिमुख उद्योगधंद्यांत वेगाने प्रगती झाली. त्यामुळे राज्यातील निर्मितिउद्योगांत इलेक्ट्रॉनिकी उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांचा प्रथम क्रमांक असून बॉस्टन हे त्यांचे प्रमुख केंद्र आहे. वस्त्रोद्योग आणि पादत्राणे निर्मितिउद्योगांचे महत्त्व अजूनही टिकून आहे. त्याबरोबरच शिक्षण, वैद्यकीय केंद्रे, वित्तसंस्था, शासकीय व व्यापारी सेवाव्यवसायांचीही बरीच वाढ झाली आहे. धातुसामान, छपाई, प्रकाशन, अन्नप्रक्रिया, कागद आणि तद्संबंधित उत्पादने, रसायने, प्लॅस्टिक साहित्य. रबर, वाहतुकीची साधने इ. उद्योगधंद्यांची संख्याही राज्यात बरीच आहे. नद्यांवरील धबधब्यांचा जलविद्युत् निर्मितीसाठी उपयोग करून घतलेला आहे. कनेक्टिकट, डिअरफील्ड, वेस्टफील्ड या नद्यांवर जलविद्युत्निर्मिती केंद्रे आहेत. जलविद्युत्शक्तीची उपलब्धता हाही सुरुवातीच्या काळातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला अनुकूल ठरलेला घटक आहे. शिक्षक, पोलीस यांना आपल्या संघटना स्थापून संयुक्तरीत्या आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा हक्क संमत करणारे मॅसॅचूसेट्स हे अमेरिकेतील पहिले राज्य आहे. १९७१ मध्ये राज्यात २,२९२ कामगार संघटना आणि त्यांचे ६,००,००० सभासद होते. राज्याचा पर्यटन व्यवसाय विशेष महत्त्वाचा आहे.
राज्यातील मासेमारी व्यवसाय महत्त्वाचा असून अंटलांटिक किनाऱ्यावरील मासेमारी उद्योगातील हे एक प्रमुख राज्य आहे. फ्लाउंटर, कॉड, हॅडॉक, व्हायकिंग, पर्च, कोळंबी, स्कॅलप, क्लॅम्स, ऑयस्टर इ. जलचर येथे पकडले जातात. न्यू बेडफर्ड, ग्लॉस्टर व बॉस्टन ही प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत. वसाहतकाळात खारवलेल्या कॉड माशांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे. एकोणिसाव्या शतकात खारवलेले कॉड व मॅकरेल मासे वेस्ट इंडीज, द. यूरोप व अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यांना पाठविले जाते. पूर्वी देवमासेही मोठ्या प्रमाणावर पकडले जात. १९७० मध्ये ४७० लक्ष डॉलर किंमतीची मासेमारी झाली.
सुरुवातीला मॅसॅचूसेट्सची, विशेषतः किनाऱ्यावरील नगरांची, अर्थव्यवस्था व्यापारावरच अवलंबून होती. १८१२ मधील युद्धानंतर येथील व्यापारी निर्मितिउद्योगांकडे वळल्याने दशकातच निर्मितिउद्योग प्रथम स्थानावर येऊन व्यापार दुय्यम स्थानावर गेला. बॉस्टन हे प्रमुख नैसर्गिक बंदर आहे. येथे खनिज तेल उत्पादने, मीठ, साखर, जिप्सम, लोखंड व पोलादी सामान, लाकूड, स्वयंचलित यंत्रे यांची आयात व भंगार धातूंची निर्यात केली जाते. बॉस्टनशिवाय फॉल रिव्हर, सेलेम ही शहरेही व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत.
राज्यात १५१ व्यापारी बँका (१९७३) आणि १८५ बचत व कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था (१९७१) होत्या. ‘बॉस्टन्स स्टेट स्ट्रीट’ हा देशातील प्रसिद्ध नाणेबाजार आहे. येथे विमाव्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. राज्यातील दरडोई उत्पन्न १२,०८८ डॉलर होते (१९८२).
बॉस्टन हे वाहतूक व दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. ५४,३९६ किमी. लांबीचे रस्ते व २,११० किमी. लांबीचे लोहमार्ग असून (१९८३) मोटारगाड्यांची संख्या ४० लक्ष होती (१९८२). ५० सार्वजनिक व शंभरांवर खाजगी विमानतळ आहेत. पूर्व बॉस्टनमधील लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील अतिगजबजलेल्या विमानतळांपैकी एक असून दरवर्षी एक कोटींवर प्रवासी या विमानतळाचा वापर करतात. बॉस्टन, फॉल रिव्हर व न्यू बेडफर्ड ही खोल पाण्याची प्रमुख बंदरे आहेत.
लोक व समाजजीवन : यूरोपिय लोकांच्या आगमनापूर्वी या भागात सु. ३०,००० अमेरिकन इंडियनांचे वास्तव्य होते. आज ही संख्या सु. १,२०० पर्यंत आहे. आजच्या लोकसंख्येत फ्रेंच, कॅनडियन, इटालियन, इंग्रज, स्कॉटिश, आयरिश, रशियन, पोलिश, स्पॅनिश इत्यादींचे मिश्रण आढळते. इतर यूरोपीय देशांतील लोकही पुष्कळ आहेत. रोमन कॅथलिक, यहुदी, मेथडिस्ट, बिशप वर्गीय व एकेश्वरवादी असे हे लोक आहेत. लोकसंख्येतील ही विविधता त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक चालीरीतींमधून स्पष्टपणे जाणवते. राज्यातील ३३% लोक जन्माने परदेशी आहे. या लोकांपैकी ८७% लोक नागरी क्षेत्रात राहतात. राज्यातील व्यापार व औद्योगिक विकासाला अनुसरून लोकसंख्यावाढीचे वेगवेगळे चार कालखंड पडतात. १७९० ते १८३० या काळात दशकाला सरासरी १३% लोकसंख्या वाढली. या काळात ग्रामीण लोकवस्तीचे तसेच शेती व मासेमारी व्यवसायाचे आधिक्य होते. १८३० ते १९१० या काळात (यादवी युद्धाचा काळ वगळता) दशकाला २०% किंवा त्यापेक्षा जास्त इतक्या प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढली. औद्योगिक विकास आणि मोठ्या प्रमाणावरील देशांतर यांमुळे १८४०–५० या दशकात तर हा वेग ३५% होता. १९१० नंतर लोकसंख्यावाढीचा वेग फारच कमी झाला. १९३०–४० या दशकात तर तो केवळ २% एवढाच होता. १९७०–८० या दशकात हा वेग केवळ ०·८% एवढा राहिला. मॅसॅचूसेट्स देशातील एक दाट लोकवस्तीचे व नागरी वस्तीचे प्रमाणाधिक्य असलेले राज्य आहे. १७९० ते १८२० या काळात नागरी लोकसंख्या दुप्पट झाली. १९०० मध्ये ८६% लोकसंख्या नागरी होती. १९७० ते ८० या दशकात ग्रामीण लोकसंख्या १५·४% वरून १६·२% पर्यंत वाढली, तर नागरी लोकसंख्या ८४·६%वरून ८३·८% पर्यंत कमी झाली. राज्याचा पूर्व भाग म्हणजे लोकसंख्येने गजबजलेले क्षेत्र असून तेथे विशालनगरांची निर्मिती झालेली आढळते. परंतु १९७० ते ८० या काळात उपनगरांच्या विस्तारामुळे महानगरांची लोकसंख्या कमी होत गेलेली दिसते. बॉस्टर, वुस्टर व स्पिंगफील्ड या सर्वांत मोठ्या तीन शहरांची लोकसंख्या तर ७ ते १२ टक्क्यांनी कमी झालेली दिसते. दरहजारी जन्मप्रमाण १२·९, मृत्यूप्रमाण ९·२ व बालमृत्यूप्रमाण ९·६ होते (१९८१). याच वर्षी राज्यात ४७,८०२ विवाह झाले, तर १९,५०२ घटस्फोट घेण्यात आले.
राज्यात आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा भरपूर आहेत. ‘बॉस्टन डिस्पेन्सरी’ हे पहिले सार्वजनिक रुग्णालय १७९६ मध्ये व ‘मॅसॅचूसेट्स जनरल हॉस्पिटल’ १८११ मध्ये सुरू झाले. त्यानंतर मनोरुग्णालय, डोळे आणि कान इत्यादींची अनेक स्वतंत्र रुग्णालये तसेच अनेक वैद्यकीय, वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक संशोधन संस्थांची येथे स्थापना झाली. येथे १८६ रुग्णालये असून त्यांत ३९,१७० खाटांची सोय होती (१९८०). ‘मॅसॅचूसेट्स बे कॉलनी’ च्या स्थापनेपासून सहा वर्षांतच येथील शिक्षणाच्या प्रसारास सुरुवात झाली. बॉस्टन लॅटिन स्कूल (१६३५) हे माध्यमिक विद्यानिकेतन व हार्व्हर्ड महाविद्यालय (१६३६) ह्या उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींमधील पहिल्या शैक्षणिक संस्था याच राज्यात सुरू झाल्या. तेव्हापासून वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांचा सतत विस्तार होत गेला. १८३७ मध्ये ‘स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन’ ची स्थापना झाली. अंध, मुक्या, बहिऱ्या आणि अपचारी मुलांसाठी स्वतंत्र शाळा निघाल्या. विद्यानिकेतनांचा (पब्लिक स्कूल्स) प्रसार वेगाने झाला. उच्च शिक्षणसंस्थांसाठीसुद्धा हे राज्य देशात आघाडीवर राहिले आहे. हार्व्हर्ड विद्यापीठ, विल्यम्स (१७९३) व ॲम्र्स्ट (१८२१) ही महाविद्यालये, मौंट हॉल्योक (१८३७) हे महिलांचे महाविद्यालय ह्या देशांतील सर्वांत जुन्या शैक्षणिक संस्था आहेत. १९७२ पासून ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. १९८१–८२ मध्ये नगरांनी व शहरांनी विद्यानिकेतनांसाठी ३०८·९० कोटी डॉलर खर्च केले. याच वर्षी येथे ६१,६३२ शिक्षक व ९,४१,३९६ विद्यार्थी होते. १९८२ मध्ये असलेल्या १२६ पदवी महाविद्यालयांत वा संस्थांत १४,२७४ पूर्ण वेळ अध्यापक व ४,१५,३२० विद्यार्थी होते.
राज्यातील प्रत्येक नगरात व शहरात मुक्तद्वार सार्वजनिक ग्रंथालये आहेत. ‘बॉस्टन सार्वजनिक ग्रंथालय’ हे राज्यातील सर्वांत मोठे व जुने (१८५२) ग्रंथालय आहे. विंझर व हार्व्हर्ड येथील ग्रंथालये दुर्मिळ व महत्त्वाच्या ग्रंथसंग्रहांसाठी जगात प्रसिद्ध आहेत. बॉस्टन येथील ऐतिहासिक ग्रंथालय व वुस्टर येथील पुरातत्त्वविषयक ग्रंथालयही प्रसिद्ध आहे. मॅसॅचूसेट्समध्ये अनेक उत्कृष्ट वस्तुसंग्रहालये आहेत. आशियाई कला, प्राचीन अमेरिकेन रंगचित्रकला, प्रत्येक कालखंडातील यूरोपियन कला, अमेरिकन फर्निचर आणि धातुशिल्पांच्या भव्य प्रदर्शनासाठी बॉस्टन ललितकला वस्तुसंग्रालय जगात प्रसिद्ध आहे. बॉस्टनमधील विज्ञान वस्तुसंग्राहालय तेथील विज्ञान, उद्योग, तंत्रविद्या, पर्यावरण यांच्या प्रदर्शनासाठी आणि त्यातील विशाल अशा खगोलदर्शनागारासाठी विख्यात आहे. यांशिवाय बॉस्टनमधील इझाबेला स्टीवर्ट गार्डनर म्यूझीयम, न्यू इंग्लंड मत्स्यालय, लिंकन येथील दे कॉर्दोव्हा म्यूझीयम, हार्व्हर्ड विद्यापीठातील फॉग आर्ट म्यूझीयम, वुस्टर आर्ट म्यूझीयम, पिटस्फील्ड बर्कशर म्यूझीयम, केंब्रिज येथील आगास्सिझ म्यूझीयम व त्यातील पुरातत्त्वविद्या आणि मानववंशशास्त्रविषयक ‘पीबॉडी’ म्यूझीयम आणि तौलनिक प्राणिशास्त्र म्यूझीयम, सेलेम येथील ऐतिहासिक एसेक्स इन्स्टिट्यूट, न्यू बेडफर्ड व नँटुकिट येथील देवमाशांचे म्यूझीयम इत्यादी उल्लेखनीय संग्रहालये आहेत.
कला, वास्तुशिल्प, खेळ या बाबतींतही हे राज्य आघाडीवर आहे. येथील ‘बॉस्टन सिंफनी ऑर्केस्ट्रा’ (१८८१) जगात प्रसिद्ध आहे. याशिवाय संगीत, नाट्य, नृत्य कंपन्या पुष्कळ आहेत. लेनॉक्सजवळील ‘बर्कशर संगीत महोत्सव’ (१९३४) तसेच ली येथील ‘जेकब्स पिलो डान्स फेस्टिव्हल’ हे उल्लेखनीय उत्सव आहेत. राज्यात, विशेषतः पश्चिम भागात व केप कॉडवर, बरीच उन्हाळी नाट्यगृहे आहेत. डेडम येथील फेअरबँक्स हाउस (१६२६), सौगस येथील बोर्डमन हाउस (१६५१), टॉप्सफील्ड येथील पार्सन कॅपेन हाउस (१६८३), हिंगममधील ओल्ड शिप चर्च (१६८१), बॉस्टनमधील ओल्ड नॉर्थ चर्च व ओल्ड साउथ मीटिंग हाउस, मेडफर्डमधील रॉयल हाउस इ. वास्तू म्हणजे वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट नमुने आहेत. येथील अनेक वास्तुशिल्पज्ञ जगप्रसिद्ध असून चार्ल्स बुलफिंच (१७६३–१८४४) हा राज्यातील पहिला व प्रसिद्ध व्यावसायिक वास्तुशिल्पज्ञ होय. जलतरण, नौकानयन, हायकिंग, मच्छीमारी हे लोकांचे उन्हाळ्यातील तर शिकार, बर्फावरील खेळ हे हिवाळ्यातील आवडीचे कार्यक्रम असतात. बेसवॉल, बास्केटबॉल, पायचेंडू, हॉकी हे व्यावसायिक खेळ म्हणून खेळले जातात. येथील घोड्यांच्या व कुत्र्यांच्या शर्यतीही प्रसिद्ध आहेत. वेस्ट स्प्रिंगफील्ड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ‘ईस्टर्न स्टेट्स ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रिअल एक्स्पोझिशन’ हे प्रदर्शन भरते, तर ग्रेट बॅरिंग्टन, टॉप्सफील्ड व मिडल्बर येथे वार्षिकोत्सव होतात.
पर्यटन : राज्याच्या पश्चिम भागातील बर्कशर टेकड्यांपासून पूर्वेस केप कॉडपर्यंत अनेक पर्यटन स्थळे पहावयास मिळतात. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक राज्याला भेट देऊन जातात. वेगवेगळी ऐतिहासिक स्थळे, विस्तीर्ण बागा व उद्याने, अरण्य प्रदेश, अभयारण्ये, समुद्रकिनारा व त्यावरील सुंदर पुळणी, मोठमोठी शहरे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. शासनाकडून तसेच खाजगी रीत्या पर्यटकांना सर्व प्रकारच्या मनोरंजनादी सुविधा पुरविल्या जातात. अँम्झबेरी, अँडोव्हर, बॉस्टन, बेव्हर्ली, केंब्रिज, चार्ल्सटाउन, काँकर्ड, डेडम, डिअरफील्ड, लेक्झिंग्टन, प्लिमथ, प्रॉव्हिन्सटाउन, क्किन्सी, सेलेम, सौगस, स्टरब्रिज ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे असून तेथे वसाहतकाळापासूनच्या सुंदरसुंदर वास्तू आजही सुस्थितीत पहावयास मिळतात. बॉस्टन, वुस्टर, स्प्रिंगफील्ड, न्यू बेडफर्ड, केंब्रिज, ब्रॉक्टन, फॉल रिव्हर, लॉवेल, क्विन्सी, न्यूटन, लिन, समरव्हिल, फ्रेमिंगहॅम, लॉरेन्स ही साठ हजारांवर लोकसंख्या असलेली शहरे आहेत.
चौधरी, वंसत
“