मॅन्सफील्ड–२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ओहायओ राज्यातील एक शहर व रिचलँड परगण्याचे मुख्य केंद्र. लोकसंख्या ५३,९०७ (१९८०). ॲपालॅचिअन पर्वताच्या पश्चिम पायथ्याजवळील समृद्ध कृषिक्षेत्रात मोहीकन नदीच्या एका फाट्यावर वसले असून ते क्लीव्हलँड व कोलंबस या दोन शहरांच्या साधारण मध्यभागी आहे. मॅन्सफील्डची स्थापना १८०८ मध्ये करण्यात येऊन संयुक्त संस्थानांचा मुख्य सर्वेक्षक जेरेड मॅन्सफील्ड याचे नाव शहराला देण्यात आले. त्यानेच या शहराच्या आखणीबाबत मार्गदर्शन केले. १८१२ मधील युद्धात जॉनी ॲपलसीड (जॉन चॅपमन) याने अमेरिकन इंडियनांच्या हल्ल्यातून अत्यंत चिकाटीने ही वसाहत वाचविली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे त्याचे स्मारक उभारण्यात आले आहे. १८५७ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला.
मॅन्सफील्ड औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे असून विद्युत्साहित्य, पोलाद व रबर उत्पादने, पितळी ओतीव वस्तू, यंत्रे, प्रशीतके, स्नानगृहाचे साहित्य, प्रशीतक पंप इ. तयार करण्याचे उद्योगधंदे येथे चालतात. येथेच तीन लोहमार्गही येऊन मिळतात. ओहायओ राज्याचे बालसुधारगृह शहराच्या जवळ आहे. ओहायओ राज्य विद्यापीठाची विस्तारशाखा तसेच रिचलँड काउंटी म्यूझीयम शहरात आहे. कादंबरीकार लूइस ब्रॉमफील्ड (१८९६–१९५६) याचे हे जन्मग्राम होय. त्याच्या निवासस्थानी परिस्थितिविज्ञान केंद्र स्थापण्यात आले आहे. मॅन्सफील्ड हे हिवाळी खेळांचे (बर्फावरील खेळांचे) केंद्र म्हणून प्रसिद्ध असून ‘स्नो ट्रेल्स’ या मॅन्सफील्डजवळील एका ठिकाणी ‘ओहायओ स्की कार्निव्हल’ नावाचा वार्षिक महोत्सव भरतो.
चौधरी, वसंत