मॅग्नोलिया प्युमिला : (लॅ. मॅग्नोलिया कॉको, तलौमा प्युमिला कुल–मॅग्नोलिएसी). ह्या फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] मॅग्नोलिया प्रजातीत एकूण ८० जाती असून त्यांपैकी १० जाती भारतात आढळतात. त्यांतील हे साधारणपणे १·५ ते ३·५ मी. उंचीचे सदापर्णी क्षुप (झुडूप) बहुवर्षायू अनेक वर्षे जगणारे) असून त्याचा प्रसार जावा, चीन इ. भागांत मर्यादित आहे. हे भारतात बागेतून शोभेकरिता व सुंदर, सुवासिक फुलांकरिता लावलेले आढळते. हे कवठी चाफ्याच्या [⟶ चाफा, कवठी] प्रजातीतील आणि मॅग्नोलिएसी वा चंपक कुलातील असल्याने याची काही लक्षणे त्या लेखांत वर्णिल्याप्रमाणे असतात. याची पाने साधी, लांबट, ८–१५ सेंमी. लांब व चकचकीत असतात. पानांच्या बगलेत पांढरी पिवळट, कवठी चाफ्याच्या फुलांपेक्षा लहान, ३ सेंमी. व्यासाची, गोलसर अंडाकृती व सुगंधी फुले येतात. रात्रीच्या वेळी त्यांचा सुवास अधिक दरवळतो. फुलांत फक्त सहा (कवठी चाफ्यात नऊ ते बारा) पाकळ्या असतात. याची नवीन लागवड गुटी कलमांनी करतात.

पाटील, शा. दा.