मॅग्नोलिएसी : (चंपक कुल), फुलझाडांपैकी [वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील प्रारंभिक समजलेल्या ⇨ रॅनेलीझ किंवा मोरवेल गणात या कुलाचा समावेश केलेला आढळतो जे. हचिन्सन यांनी मात्र मॅग्नोलिएलीझ या स्वतंत्र गणात याचा समावेश केला आहे. फुलझाडांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) याला महत्त्वाचे स्थान आहे. यात सु. १० प्रजाती आणि १०० जाती (काहींच्या मते १८ प्रजाती व ३०० जाती) असून त्यांचा प्रसार मुख्यतः समशीतोष्ण प्रदेशात आणि आग्नेय आशिया, ईशान्य व मध्य अमेरिका, वेस्ट इंडीज, पूर्व ब्राझील इ. प्रदेशांत झाला आहे. यातील काही जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) यूरोपात सापडतात. उत्तर क्रिटेशस कल्पातील (सु. १२ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील) खंडकांमध्ये मॅग्नोलिया व लिरिओडेंड्रॉन यांच्या काही जातींच्या पानांचे ठसे भरपूर आढळले आहेत. भारतात मुख्यतः पूर्व हिमालयात या कुलातील काही वनस्पती आढळतात. भारतात एकूण सु. तीस जाती आहेत. ह्या कुलातील वनस्पती काष्ठयुक्त, सदापर्णी किंवा पानझडी, मोठे व लहान वृक्ष, क्वचित क्षुपे (झुडपे) असतात. त्यांच्या खोडात व पानांत तैलकोश असतात. पूर्व अमेरिकेतील एक अतिउंच (७५ मी.) ⇨ ट्यूलिप वृक्ष (लिरिओडेंड्रॉन ट्यूलिपीफेरा) याच कुलातील असून त्याचे लाकूड इमारतींसाठी फार उपयुक्त आहे.
पाने साधी, एकाआड एक, अनेकदा सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली) असतात. फुले मोठी, नियमित बहुधा एकेकटी, फांद्यांच्या टोकांस किंवा पानांच्या बगलेत येतात. ती सुवासिक व सुंदर असतात परिदले बहुधा सर्व सारखी, अनेक, पाकळ्यांसारखी तीन वा तिनाच्या पटीत फुले द्विलिंगी फार क्वचित एकलिंगी केसरदले व किंजदले अनेक व सुटी सर्वच पुष्पदले, लांबट पुष्पस्थलीवर (फुलातील अक्षावर) बहुधा सर्पिल प्रकारे (फिरकीप्रमाणे) किंवा अंशतः मंडलांमध्ये (चक्राप्रमाणे) रचलेली असतात. परागकोश पृष्टबद्ध (पाठीकडे तंतूस चिकटलेले) प्रत्येक किंजदलात एक कप्पा व त्यात बहुधा एक बीजक, क्वचित दोन किंवा अधिक बीजके असतात [⟶ फूल]. प्रत्येक किंजदलापासून एक स्वतंत्र साधे फळ (मृदुफळ, पेटिका किंवा सपक्ष) व त्या सर्वांचे एक घोस फळ [⟶ फळ] असून बियांत फार लहान गर्भ व भरपूर पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) असतो. शोभा, लाकूड, सुंदर सुवासिक फुले यांकरिता या वनस्पती प्रसिद्ध आहेत. या कुलाचे ⇨ ॲनोनेसी वा सीताफल कुलाशी, तसेच ⇨ मिरिस्टिकेसी किंवा जातिफल कुलाशी जवळचे नाते असून जीवाश्मरूप ⇨ बेनेटाइटेलीझ या गणापासून याचे पूर्वज अवतरले असावेत, असे काही शास्त्रज्ञ मानतात.
पहा : चाफा, कवठी चाफा, सोन रॅनेलीझ.
2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
पाटील, शा. दा.