मॅग्नेसाइट : खनिज. स्फटिक षट्कोणी त्यांची संरचना कॅल्साइटाप्रमाणे मात्र स्फटिक अगदी क्वचित आढळतात. बहुधा याच्या पांढऱ्या मातीसारख्या व कधीकधी पाटनक्षम, कणमय किंवा तंतुरूप राशी आढळतात. ⇨ पाटन : (1011) चांगले. ठिसूळ. भंजन सपाट ते शंखाभ [⟶ खनिजविज्ञान]. कठिनता ३·५–५. वि. गु. ३–३·२. चमक काचेसारखी ते रेशमासारखी. रंग सामान्यपणे चॉकसारखा पांढरा पण लोहामुळे करडा, पिवळा वा उदी होतो. काहीसे पारदर्शक ते अपारदर्शक. रा. सं. MgCO3. यामध्ये मॅग्नेशियमाच्या जागी थोडेसे कॅल्शियम, मँगॅनीज, लोह वा कोबाल्ट आलेले असू शकते. हे वितळण्यास कठीण असून गरम हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते. कार्बनिक अम्लयुक्त पाण्याची सर्पेटाइनासारख्या विपुल मॅग्नेशियमयुक्त खडकांवर विक्रिया होऊन हे तयार होते व त्याच्या अशा शिरा व वेड्यावाकड्या राशी आढळतात. रूपांतरणानेही (दाब आणि तापमान यांच्यामुळे बदल होऊनही) मॅग्नेसाइट बनते व ते संगजिरेयुक्त, क्लोराइटी व अभ्रकी सुभाजांत (सहज भंगणाऱ्या खडकांत) आढळते. मॅग्नेशियमयुक्त विद्रावकांद्वारे (विरघळविणाऱ्या पदार्थांद्वारे) कॅल्शियमी खडकांचे (उदा., चुनखडक, डोलोमाइट) प्रतिष्ठापन होऊनही हे बनते. संगजिरे व सर्पेटाइन ही ह्याच्याबरोबर आढळणारी खनिजे असून पेरिडोटाइट, सोपस्टोन व डोलोमाइट या खडकांशी मॅग्नेसाइट निगडित असते. हे कृत्रिम रीतीनेही बनविता येते.
चीन, उ. कोरिया, रशिया, झेकोस्लोव्हाकिया, अमेरिका, भारत, ग्रीस, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकी प्रजासत्ताक, व्हेनेझुएला, ब्राझील, तुर्कस्तान, कॅनडा तसेच ऑस्ट्रिया, यूगोस्लाव्हिया, मेक्सिको, पाकिस्तान, सुदान व नेपाळ या देशांत मॅग्नेसाइटाचे साठे आहेत. भारतामध्ये ह्याचे महत्त्वाचे निक्षेप (साठे) तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यांत असून यांशिवाय बिहार, जम्मू-काश्मीर, मध्य व पूर्व हिमालय या भागांतही हे आढळते. भारतातील याचे एकूण साठे ५२·४ कोटी टन असून १९७० साली ह्याच्या १२ खाणी चालू होत्या.
मॅग्नेसाइट हे सु. १,८७०° से. इतके तापमान सहन करू शकत असल्याने मुख्यत्वे याचा उपयोग उच्चतापसह (उच्च तपमानास न वितळता टिकून राहणाऱ्या) पदार्थांसाठी केला जातो उदा., भट्ट्यांसाठी लागणाऱ्या उच्चतापसह विटा, मुशी इत्यादी. भारतात अशा प्रकारे ९७ टक्के मॅग्नेसाइट वापरले जाते मात्र असा उपयोग करण्यापूर्वी ते भाजून घेऊन त्यातील जलांश व कार्बन डाय-ऑक्साइड वायु काढून टाकण्यात येतात. ह्यापासून मॅग्नेशिया (MgO) व मॅग्नेशियमाची इतर संयुगे तसेच कार्बन डाय-ऑक्साइड तयार करतात. पूर्वी हे मॅग्नेशियम मिळविण्यासाठी वापरीत असत परंतु आता सागरी पाण्यापासून मॅग्नेशियम मिळविण्यात येते. यांशिवाय रबर, खते, सॉरेल सिमेंट (ऑक्सिक्लोराइड सिमेंट), रंगलेप, काच, कागद, साखर, अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) पदार्थ इ. उद्योगांत तसेच विद्युत् घटमाला, विद्युत् व तापनिरोधक द्रव्ये, जंतुनाशके, औषधे, काही मिश्रधातू, विद्युत् अग्रे इ. बनविण्यासाठीही याचा वापर होतो.
याच्या रा. सं.वरून म्हणजे पर्यायाने मॅग्नेशिया या स्थलनामावरून याचे मॅग्नेसाइट हे नाव पडले आहे.