मॅग्नीटोगॉर्स्क : मध्य सोव्हिएट रशियातील रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या (आरएस्एफएस्आर) चल्याबिन्स्क ओब्लास्टमधील (प्रांतवजा विभाग) एक महत्त्वाचे औद्योगिक शहर. लोकसंख्या ४,१९,००० (१९८३). चिल्याबिन्स्कच्या नैर्ऋत्येस २५६ किमी. अंतरावर उरल नदीच्या डाव्या काठावर लोहखनिज व मॅग्नेटाइट यांच्या साठ्यांनी समृद्ध अशा ‘मॅग्नीत्नाया गोरा’ या पर्वताच्या पायथ्याशी हे वसलेले आहे. या भागात अनेक वर्षे वश्किर व किरगीज टोळ्या पशुपालन व्यवसाय करीत असत. १९२९–३१ यांदरम्यान रशियाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात मॅग्नी टोगॉर्स्क शहराची उभारणी करण्यात आली. ‘स्टॅलिन स्टील वर्क्स’ हा शहरातील प्रचंड लोखंड व पोलाद निर्मितीचा कारखाना व अन्य कारखाने यांच्यामधील संयंत्राची उभारणी प्रथम अमेरिकन अभियंते व कामगार यांनी केली. चार वर्षातच प्रथम खेडेवजा असलेले मॅग्नीटोगॉर्स्क पोलादनिर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले व त्याची लोकसंख्याही दोन लक्षांवर गेली. हे शहर म्हणजे सोव्हिएट रशियाच्या औद्योगिक सामर्थ्याचे प्रतीक बनले. १९७० मध्ये येथील लोखंड व पोलाद कारखान्याची (वार्षिक पोलाद उत्पादन क्षमता सु. १ कोटी टन) सबंध जगातील सर्वांत मोठ्या लोखंड व पोलाद कारखान्यांमध्ये गणना होत होती. सांप्रत येथील स्थानिक कच्च्या लोखंडाचे साठे संपण्याच्या अवस्थेत असल्याने ते कझाकस्तानमधील रूडनी येथून, तर कोकिंग कोल कारागांदाहून आणण्यात येतो. शहरात अभियांत्रिकी, सिमेंट, नत्रखते, रसायने, रबर, काच, उपभोग्य वस्तू इत्यादींचे कारखाने असून सूक्ष्म उपकरणे व यंत्रे, धातुपदार्थ, खाणकामसाहित्य, उच्चालक, वाहतूक साधनसामग्री इत्यादींचे उत्पादन होते.
उरल नदीच्या डाव्या तीरावर मोठे औद्योगिक कारखाने व अस्थायी स्वरूपाची गृहवसाहत बांधण्यात आलेली असून कायमस्वरूपी निवासी घरे व विस्तारित भाग नदीच्या उजव्या तीरावर प्रदूषणविरहित क्षेत्रात वसविण्यात आलेला आहे. मॅग्नीटोगॉर्स्क हे नियोजनबद्ध शहर असून येथे शिक्षक-प्रशिक्षण संस्था व धातुवैज्ञानिक संस्था त्याचप्रमाणे एक मोठे नाट्यगृह, प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, ग्रंथालये, विद्यापीठ व अनेक माध्यमिक विद्यालये आहेत. शहर लोहमार्गांनी उत्तर व आग्नेगय भागांना जोडलेले आहे.
गद्रे, वि. रा.