मॅग्ना कार्टा : इंग्रजी संवैधानिक विधीचा प्रारंभ करणारा दस्तऐवज. राजा आणि सरंजामी सरदारवर्ग यांच्या संघर्षातून हा दस्तऐवज जन्माला आला.
अँजेव्हिन किंवा प्लँटेजेनेट घराण्यातील जॉन लॅकलँड राजा (कार. ११९९–१२१६) हा अत्यंत जुलमी आणि विश्वासघातकी होता. त्याचा वस्तुतः इंग्लंडच्या गादीवर हक्क नव्हता. त्याचा भाऊ रिचर्ड मृत्यू पावल्यावर जॉनने आपला पुतण्या आर्थर यास कैदेत टाकून गादी बळकाविली. पुढे त्याने आर्थरचाही खून करविला आणि प्रजेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
जॉनचा आपल्या कारकीर्दीमध्ये पोप तिसरा इनोसंट आणि फ्रान्सचा राजा फिलीप ऑगस्टस ह्यांच्याबरोबर तीव्र संघर्ष झाला. दोन्ही बाबतींत जॉनला हार खावी लागली. १२१४ मध्ये जॉनने फ्रान्सच्या फिलीप ऑगस्टसविरुद्ध बादशाहा चौथा ऑटो आणि फ्लँडर्सच्या काउंटबरोबर मैत्री केली पण बूव्हेनच्या लढाईत फ्रान्सने या युतीचा पराभव केला. तेव्हा जॉनला प्रत्यक्ष युद्धासाठी बाहेर पडावे लागले. त्याच्या इंग्लंडमधील अनुपस्थितीचा फायदा असंतुष्ट सरदारांनी घेतला. त्यांनी एकत्र येऊन राजसत्तेला मर्यादा घालण्याचे ठरविले. या बाबतीत आर्चबिशप स्टिव्हन लॅंग्टन याने सरदारांना मार्गदर्शन केले पहिल्या हेन्री ने दिलेल्या स्वातंत्र्याच्या मसुद्याचे पुनरुज्जीवन करावे, असे त्याने सुचविले. त्याप्रमाणे त्या मसुद्यावर आधारलेली हक्काची सनद तयार करण्यात आली आणि ती राजापुढे ठेवण्यात आली (६ जानेवरी १२१५). जॉनने सुरुवातीला सही करण्यास नकार दिला आणि सरदार व चर्चचे अधिकारी ह्यांच्यामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच सरदारांचे सैन्य लंडनमध्ये शिरल्यावर (१७ मे १२१५) क्रूझेडमध्ये शिरकाव करून त्याने पोपचीही सहानुभूती मिळविण्याचा यत्न केला पण हे सर्व प्रयत्न फसल्यावर रन्नीमीड येथे जॉनने ह्या सनदेवर सही केली (१५ जून १२१५).
इंग्लंडच्या घटनात्मक इतिहासात ह्या सनदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, म्हणूनच त्यास मॅग्ना कार्टा-मोठी सनद असे म्हणतात. ह्या सनदेमध्ये एकंदर बासष्ट कलमे असून स्थूलमानाने या कलमांचे वर्गीकरण अकरा शीर्षकांखाली केले आहे : त्यात चर्चसंबंधीची कलमे, राजा व सरदार वर्ग यांचे संबंध स्पष्ट करणारी कलमे, सामान्य घटनात्मक कलमे, राजाच्या कर्जासंबंधीची कलमे, न्यायविषयक कलमे, स्थानिक स्वराज्यविषयक कलमे, व्यापार, नागरी शासन वगैरे विविध विषय आहेत. सनदेच्या प्रारंभी आणि शेवटी चर्चच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिली असून राजा किंवा त्याचे वारसदार यांनी हे वचन पाळले पाहिजे. महत्त्वाच्या कलमांचा संक्षिप्त आशय असा होता : राजाने सरंजामशाहीच्या हक्काचा दुरुपयोग करू नये. याकरिता मुख्यत्वे सरदारांनी राजाविरुद्ध चढाई केली होती. साहजिकच बरीचशी कलमे सरंजामशाहीच्या हक्कांविषयीची आहेत. उदा., बॅरनकडून १०० पौंड आणि नाइटकडून १०० शिलींग ह्यापेक्षा जास्त ‘रिलीफ’ घेऊ नये. सरदाराचा वारस अल्पवयीन असल्यास त्याच्या मालमत्तेचा कारभार चालविताना राजाने फक्त योग्य तोच मेहनताना घ्यावा आणि साधारणतः सरदारांकडून कायदेशीर तेवढीच सेवा स्वीकारावी.
कायदा व सुव्यवस्थेसाठी कॉमन प्लीकोर्ट योग्य ठिकाणी भरावे, दंडाची रक्कम गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार आकारावी आणि कायदा जाणणारे आणि कायद्याचे पालन करू इच्छिणारे असेच निःपक्षपाती न्यायाधीश नेमावेत.
ह्या सनदेमधील सर्वांत महत्त्वाची कलमे मूलभूत हक्क्वांविषयीची आहेत. कोणाचीही मालमत्ता योग्य नुकसानभरपाई दिल्याखेरीज सार्वजनिक कामाकरिता घेतली जाणार नाही (कलमे २८ ते ३१) कोणाही व्यक्तीस कायद्याप्रमाणे शिक्षा झाल्याखेरीज बंदीवासात टाकले जाणार नाही किंवा हद्दपारही करण्यात येणार नाही (कलम ३९) न्याय आणि हक्क कोणाही व्यक्तीला नाकारला जाणार नाही किंवा राजा तो विकणार नाही किंवा त्याच्या अंमलबजावणीत उशीर करणार नाही (कलम ४०). या मौलिफ कलमांमुळेच ह्या सनदेस इंग्रजी राज्यघटनेचे बायबल, इंग्रजी स्वातंत्र्याच्या कमानीतील मधला चिरा वगैरे गौरवपर शब्दांनी संबोधण्यात आले आहे. बिशप स्टब्झच्या मताप्रमाणे देशाने आपली अस्मिता ओळखल्यानंतर केलेले हे पहिले महत्वाचे कार्य आहे.
या सनदेबद्दल उलटसुलट-अनुकूल-प्रतिकूल अशी बरीच चर्चा झाली आहे. सनदेमध्ये ‘फ्री मेन’ ह्यांचा उल्लेख केला आहे आणि घटना त्यांना लागू आहे. त्या काळी हा वर्ग लहान होता. फार मोठा वर्ग म्हणजे मजुरीने काम करणाऱ्या लोकांचा होता. त्यांना ‘रुर्फ’ असे म्हणत असत. त्यांना ही सनद लागू करण्यात आली नव्हती. त्यांची जर ही स्थिती तर गुलामांविषयी बोलावयास नकोच. जे हक्क बड्या सरंजामदारांनी राजाकडून स्वतःकरिता मागून घेतले, ते हक्क आपल्या हाताखालील लोकांना देण्याचे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. कायदे करण्याचे अधिकार वरिष्ठ वर्गाच्या सभेला दिल्यामुळे सामान्य नागरिक आणि कनिष्ठ सरदार यांना काहीच अधिकार मिळाले नाहीत.
असे असूनसुद्धा इंग्रजी राज्यघटनेमध्ये या सनदेस असाधारण महत्त्व आहे कारण कायद्याची अधिसत्ता राजाने मान्य केल्याचे हे पहिले उदाहरण असून राजा कितीही मोठा असला, तरी त्याने कायद्याचे पालन हे केलेच पाहिजे, त्याला कायदा मोडता येणार नाही किंवा पळवाट शोधता येणार नाही.
जॉनवर सरदारांचा विश्वास नसल्यामुळे तो सनदेची काटेकोर अंमलबजावणी करेल किंवा नाही याची त्यांना शंका होती. म्हणून त्यांनी २५ सरदारांचे निरीक्षण मंडळ नेमले. राजाने सनदेचा भंग केल्यास ह्या निरीक्षण मंडळाने राज्यकारभार आपल्या हातात घ्यावयाचा होता. अशा रीतीने एका प्रकारे प्रस्तुत उठावाला कायदेशीर स्वरूप या सनदेने प्राप्त झाले.
संदर्भ : 1. Holt, J. C. The Northerners : a Study in the Reign of King John, Oxford, 1961.
2. Clarke, J. J. Outlines of Central Government, London, 1962.
३. बर्वे, प. ह. कुलकर्णी, अ. रा. इंग्लंडच्या राज्यघटनेचा इतिहास, पुणे, १९६३.
राव, व. दी.