मॅक्स्विनी, टेरेन्स : (२८ मार्च १८७९–१८ ऑगस्ट १९२०). आयर्लंडच्या मुक्तिसंग्रामातील एक जहाल तडफदार नेता. त्याचा आयर्लंडमधील कॉर्क गावी सधन घरण्यात जन्म झाला. वडिलांचे नाव जेम्स मॅक्स्विनी. ते तंबाखूचे व्यापारी होते. लहानपणीच ते वारले, त्यामुळे टेरेन्सचा सांभाळ व शिक्षण आईने केले. त्याचे प्राथमिक शिक्षण कॉर्क येथील ख्रिश्चन ब्रदर्स स्कूलमध्ये झाले. पुढे त्याने रॉयल विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली (१९०७). ख्रिश्चन ब्रदर्स या शाळेतूनच मॅक्स्विनीस देशभक्तीची स्फूर्ती मिळाली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने ‘डायर’ कंपनीत नोकरीस प्रारंभ केला. आपल्या कामातील कार्यक्षमता व कौशल्य यांमुळे कॉर्क परगण्याच्या औद्योगिक शिक्षण समितीत व्यापारी शिक्षण आणि प्रचारक म्हणून त्यास नोकरी मिळाली (१९११). हा व्यवसाय करीत असताना तो जहाल राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाला. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्याला लेखनवाचनाचा छंद जडला. चार्ल्स डिकन्स, थॅकरे, वुल्फ टोन, जॉन मिशेल इ. मान्यवर लेखकांचे साहित्य त्याने वाचले. टोन-मिशेल यांच्या प्रभावामुळे आयर्लंडविषयी निष्ठा व निःसीम भक्ती त्याच्या मनात दृढ झाली. फावल्या वेळात शेक्सपिअरची नाटकेही त्याने वाचून काढली. शेक्सपिअरच्या नाट्यप्रयोगांनाही तो हजर राहत असे.
कॉर्क, डब्लिन, बेलफास्ट इ. शहरांतून आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या तरूण आयर्लंड, मातृभाषा सेवक वाङ्मय मंडळ, संयुक्त आयरिश लोक इ. विविध संस्थाचे एकीकरण करून ‘सिन फेन’ हा पक्ष उदयास आला (१९०५). या पक्षात तो तत्काळ सामील झाला तथापि तो पक्ष होमरूल चळवळीविरुद्ध होता. आयर्लंड पूर्ण विभक्त झाल्याखेरीच त्याला खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार नाही, या सिद्धान्ताचे प्रतिपादन हा पक्ष करू लागला. म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य ही त्याची प्रमुख मागणी होती. इंग्लंडच्या वर्चस्वातून आयर्लंडला मुक्त केले पाहिजे, या आर्थर ग्रिफिथच्या विचाराला टेरेन्सने आपले ध्येय मानले व त्याकरिता सुरूवातीस मातृभाषेचा प्रसार व प्रचार करण्याचे काम त्याने हाती घेतले. आयर्लंडच्या स्वातंत्र्याच्या प्रचारार्थ आयरिश फ्रीडम हे वृत्तपत्र निघाले (१९१०). त्यात टेरेन्स लेखन करू लागला आणि आपली स्वातंत्र्यासंबंधीची मते परखडपणे मांडू लागला. होमरूल लीग बिलाला त्याने विरोध केला. पुढे ‘सिन फेन’ पक्षाच्या संमतीने पार्लमेंटने ॲल्स्टरच्या स्वयंसेवक संस्थेस मान्यता दिली. १९१४ साली महायुद्धाच्या सुरुवातीस त्याने फियाना फेल हे वृत्तपत्र काढले. त्यातून तो ॲल्स्टर संघाविषयी व ब्रिटिशांच्या जुलूमाविषयी सडेतोडपणे लिहू लागला. परिणामतः त्याला अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. सिन फेन पक्षाचा टेरेन्स जसा कट्टर अनुयायी होता तद्वतच गोलिक संस्थेबद्दलही त्याला अभिमान होता आणि स्वयंसेवक संघटनेच्या क्रांतिकारक मार्गकडे तर तो अधिकच ओढला गेला. त्या संस्थेचे नेतृत्व त्याच्याकडे आले. युद्धकाळात क्रांतिकारकांत दोन तट पडले : एक जॉन रेमंडचा आणि दुसरा टेरेन्स मॅक्स्विनीचा. इंग्लंकडच्या सेवेसाठी आयर्लंडला आपण तयार करू, असे आश्वासन रेमंडने कॉमन्स सभेत दिले आणि आपल्या अनुयायांचे महायुद्ध संपेपर्यंत इंग्लंडशी पूर्ण सहकार्य राहील, असे जाहीर केले तर टेरेन्सला या संधीचा फायदा घेऊन इंग्लंडला अडचणीत आणावे आणि आयर्लंडच्या स्वातंत्र्याचा प्रश्न धसास लावावा, असे वाटत होते. परिणामतः आयर्लंडमध्ये १९१६ मध्ये ॲल्स्टर येथे सशस्त्र उठाव झाला. क्रांतिकारकांनी प्रजासत्ताक स्थापून इंग्लंडला धक्का दिला. टेरेन्सला पुन्हा तात्पुरती अटक झाली. पुढे त्याला हद्दपार करून लिंकन (इंग्लंडला) येथील तुरुंगात ठेवण्यात आले (१९१८). तेथे त्याची डी. व्हेलेराशी गाठ पडली. डिसेंबर १९२८ मध्ये ब्रिटिश संसदेच्या निवडणुका घेण्यात आल्या त्यात बहुसंख्येने सिन फेनचे उमेदवार (७३) विजयी झाले. त्यांत टेरेन्स कॉर्क परगण्यातून ब्रिटिश संसदेवर निवडून आला. पुढे टॉमस कर्टिन या नगराध्यक्षाच्या आकस्मिक खूनानंतर (१९ मार्च १९२०) त्याची कॉर्कच्या नगरध्यक्षपदी ३० मार्च १९२० रोजी एकमताने निवड झाली परंतु पुढे ब्रिटिशांनी सूडबुद्धीने त्यास व त्याच्या दहा सहकाऱ्यांना १२ ऑगस्ट १९२० रोजी कॉर्कच्या नगरभवनात अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचे अनेक आरोप लादण्यात येऊन त्यास दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. अटक केल्यापासून त्याने अन्नत्याग केला व त्यातच ७४ दिवसांच्या प्रायोपवेशानानंतर लंडनच्या ब्रिक्स्टन तुरुंगात तो क्षीणावस्थेत मरण पावला.
विद्यार्थिदशेतच कविता करण्याचा त्याला छंद होता. म्युझिक ऑफ फ्रीडम हा त्याचा काव्यसंग्रह क्यूरिडिआन या टोपण नावाखाली १९०७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याचे स्फुटलेख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. याशिवाय त्याने काही नाटके लिहिली. त्यांपैकी द लास्ट वॉरिअर्स ऑफ कूल (१९१०), मॅनर्स मास्केथ मॅन (१९१२), द रिव्होल्यूशनिस्ट (१९१४) इ. प्रसिद्ध आहेत. रिव्होल्यूशनिस्ट या त्याच्या नाटकाने त्यास बरीच लोकप्रियता मिळाली. या नाट्यकृतीत त्याने आयर्लंडच्या स्वातंत्र्य चळवळीचा विषय हाताळला आहे. फंडामेंटल्स ऑफ फ्रीडम हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात त्याने पारतंत्र्यामुळे व्यक्तीचा कसा नैतिक अधःपात होतो म्हणून स्वातंत्र्ययुद्ध हे धर्मयुद्ध आहे, आणि त्यासाठी सशस्त्र प्रतिकार आवश्यक असून तो न्याय आहे, असे प्रतिपादिले आहे.
त्याच्या त्यागमय व समर्पित जीवनामुळे आयरिश स्वातंत्र्य चळवळीला दिशा व उत्तेजन मिळाले आणि अमेरिकेत हद्दपारीत असलेले डी व्हॅलेरासारखे नेते नव्या जोमाने कार्यरत झाले. मॅक्स्विनीची आत्मयज्ञाची कृती त्यानंतर जगभर प्रसृत झाली आणि स्वातंत्र्य व मानवी हक्क यांसाठी लढणारे व बलिदान करणारे वीर तिचे आनंदाने अनुकरण करू लागले. मॅक्स्विनी आयर्लंडच्या इतिहासात हुतात्मा झाला. लंडन टाइम्स या वृत्तपत्राने म्टटल्याप्रमाणे त्याने ‘आपल्या धैर्याची आणि करारीपणाची साक्ष जगाला पुरी पटविली’. आयर्लंडचा मॅझिनी म्हणून तो इतिहासात ख्यातनाम पावला.
संदर्भ : 1. O’Hegarty, P. S. Corkery, D. A. Short Memoir of Terence Mocswiny, London, 1922.
२. जोगळेकर, स. आ. अनु, स्वातंत्र्याची मूलतत्त्वे, मुंबई, १९२५.
३. फडके, ना. सी. हिम्मतबहादूर टेरेन्स मॅक्स्विनी, पुणे, १९६४.
शेख, रुक्साना