मॅकलेनन, जॉन फर्ग्युसन : (१४ ऑक्टोबर १८२७–१६ जून १८८१). एक प्रसिद्ध ब्रिटिश समाजिक मानवशास्त्रज्ञ आणि विधिज्ञ. त्यांचा जन्म इनव्हेरनेस (स्कॉटलंड) येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. किंग्ज महाविद्यालय (ॲबरडीन विद्यापीठ) येथून पदवी मिळाल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु तेथील वास्तव्यात त्यांनी कोणतीही विशिष्ट पदवी मिळविली नाही. स्कॉटिश बारचे सदस्यत्व मिळवून (१८५७) त्यांना कायद्याचा अभ्यास केला. याशिवाय ते ‘द एडिंबर इव्हिनिंग क्लबचे’ संस्थापक-सदस्य होते. १८७१ मध्ये त्यांची स्कॉटलंडमध्ये संसदीय प्रारूपकार (ड्राफ्ट्‌समन) म्हणून नेमणूक झाली होती. ते कायदातज्ञ व व्यवसायाने वकील होते तथापि त्यांनी मानवशास्त्र व समाजशास्त्र विषयांचे विशेष अध्ययन करून अनेक शोधनिबंध व काही ग्रंथ लिहिले. त्यांच्या संशोधनपर लिखाणाबद्दल ॲबरडीन विद्यापीठाने त्यांना सन्मान्य ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही पदवी देऊन गौरव केला होता. प्रदीर्घ आजारानंतर मॅकलेनन केंट परगण्यातील हेझ कॉमन या गावी मरण पावले.

मॅकलेनन यांची ग्रंथसंपदा मर्यादित असली, तरी त्यांनी मौलिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे प्रिमिटिव्ह मॅरेज (१८६५), स्टडीज इन एन्शन्ट हिस्टरी (१८७६) आणि पेट्रिआर्कल थिअरी (१८८५–मरणोत्तर) हे तीन ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

मॅकलेनन यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे सिद्धांतवजा विचार मांडले, त्यांमध्ये विवाहसंस्थेचा व कौटुंबिक वारसापद्धतीचा विकासक्रम व कुलप्रतीकवाद (सिम्बॉलिझम्) यांसबंधीचे विचार महत्त्वपूर्ण आहेत. मॅकलेन यांच्या मते मानव समाजाची रचना प्रारंभिक अवस्थेत प्राण्यांच्या कळपासारखी होती व तिथे लैंगिक संबंधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या वैवाहिक निर्बंधाचा अभाव होता. साहजिकच मुलांचे पितृत्व निश्चित करता येते नसे. त्यामुळे प्रथमतः मातृवंशीय समाजपद्धती निर्माण झाली.

प्रचलित समाजात अवशेषरूपाने असलेल्या वधू-अपहरणाच्या प्रतीकात्मक विधींचे स्वरूप पाहून त्यांनी पूर्वी वधूचे अपहरण करून विवाह करण्याची पद्धती रूढ होती, असे मत प्रतिपादन केले. मानवी समाजाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बहिर्विवाह पद्धती रूढ होती. मानवी टोळ्यांचे परस्परसंबंध संघर्षांचे असल्याने विवाहासाठी वधूचे अपहरण करण्याशिवाय गत्यंतर नसे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

आद्यकालीन मानव समाजात जीवन खडतर व धोक्याचे असे. त्यामुळे तिथे स्त्री-भ्रूणहत्या-पद्धती प्रचलित होती. या पद्धतीमुळे टोळीतील स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येच्या मानाने कमी होत असे व त्यामुळे तिथे बहुपतिविवाह पद्धती रूढ झाली. हा सिद्धांतवजा विचारही त्यांनी पुढे मांडला. बहुपतिविवाहपद्धती प्रचलित असलेल्या समाजामध्ये मुलांचे पितृत्व निश्चित करणे शक्य होत नसल्यामुळेही प्रथमतः मातृवंश पद्धती प्रचलित झाली असावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. बहिर्विवाह-पद्धती प्रथम प्रचलित होती व त्यामुळे स्त्री-अपहरण विवाह-पद्धती रूढ झाली, असे जे मत मॅकलेनन यांनी अगोदर व्यक्त केले होते. ते त्यांनी नंतर बदलले. स्त्री-भ्रूणहत्येमुळे स्त्रियांचा तुटवडा पडू लागल्याने अपहरणाची पद्धती प्रचलित झाली. पुढे पुढे बाहेरून स्त्रियांचे अपहरण करून आणण्याची प्रथा इतकी अंगवळणी पडली की गटाबाहेरच्या स्त्रियांबरोबर विवाह करणेच योग्य आहे, असे मानण्यात येऊ लागले व त्यातून बहिर्विवाहाची प्रथा रूढ झाली. स्त्री-अपहरण-विवाह पद्धती रूढ झाल्यावर पळवून आणलेल्या स्त्रियांबरोबर राहण्याचा प्रघातही रूढ झाला व त्यातून बहुपत्नीविवाह पद्धती रूढ झाली. तसेच पितृवंशपद्धती आणि पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा उगमही त्यातूनच झाला, असे मॅकलेनन यांचे मत होते.

अशा प्रकारे मानवी समाजाची वाटचाल बहुपतिविवाह पद्धती-मातृवंशपद्धती ते बहुपत्नीविवाह व पितृवंश व पितृसत्ताक पद्धती अशी झाली, असे विचारसूत्र मॅकलेनन यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसते.

‘टोटेमीझम’ व ‘द वर्शिप ऑफ ॲनिमल्स अन्ड प्लॅन्ट्स’ हे दोन निबंध लिहून त्यांनी कुलप्रतीकवादाची संकल्पना पुढे मांडली. कुलप्रतीकाभोवती संरचित झालेली समाचरचनेची अवस्था प्रत्येक समाजाच्या इतिहासात येऊन गेलेली आहे, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. जे एखाद्या प्राण्याची वा वनस्पतीची पूजा करतात, त्यांचे तो प्राणी किंवा ती वनस्पती समाईक कुलप्रतीक असते व त्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्वांची भावना निर्माण होते.

कुलप्रतीकांची संकल्पना बहिर्विवाहाची प्रथा रूढ होण्यापूर्वी प्रचारात होती, असे त्यांनी नमूद केले आहे.

मॅकलेनन यांचा बहुपतिविवाह-पद्धती हा विवाहाचा आद्य प्रकार होय, हा विचार मॉर्गन आणि स्पेन्सर यांनी खोडून काढला. त्यांच्या कुलप्रतीकासंबंधीच्या विचारांवरही टॉयलर यांनी टीका केली. मॅकलेनन यांनी पुढे मांडलेले मानवशास्त्रीय विचार हे त्यांच्या अफाट तर्कशक्तीतून निर्माण झालेले होते  त्यांना अनेकदा वस्तुस्थितीचा पुरेसा आधार नसे तथापि त्यांच्या विचारांच्या व संकल्पनांच्या आधारे नंतर अनेकांनी पुढील संशोधन व लिखाण केले. बहिर्विवाहपद्धती, अंतर्विवाहपद्धती यांसारख्या अनेक संज्ञा रूढ व प्रचलित करण्याचे श्रेय मॅकलेनन यांनाच जाते. कुटुंबसंस्थेच्या इतिहासाचा प्रणेता म्हणून त्यांना उल्लेख केला जातो.

संदर्भ :  1. Harris, Marvin, The Rise of Anthropological Theory, New York, 1968.

             2. Lowie, R. H. The History of Ethnological Theory, Toronto, 1937.

             3. Penniman, T. K. Hundred Years of Anthropology, London, 1965.

भोईटे, अनुराधा जोशी, प्रमिला