मँड्रिल मँड्रिल : हा नरवानर गणातील प्राणी आहे. बॅबूनप्रमाणे याचाही समावेश कॅटाऱ्हिनी श्रेणीतील म्हणजे जुन्या जगातील (पूर्व गोलार्धातील) वानरांत होतो. याचे कुल सर्कोपिथेसिडी हे होय. मँड्रिलची प्रजाती मँड्रिलस व जाती मँड्रिलस स्फिक्स ही आहे. ही अत्यंत कुरूप व अत्यंत क्रूर अशी वानराची जात आहे. याच्या  मुस्कटाचा रंग जांभळा असतो आणि पसरलेली मोठ्या आकाराची गालफडे निळसर रंगाची असतात. चेहऱ्याभोवती रोमांचे (राठकेसांचे) एकवर्तुळ असते. जननेंद्रियावरील व ढुंगणावरील रंग ही या प्राण्याचे दुय्यम लैंगिक लक्षणे समजली जातात. हे रंग नरात आढळतात व यामुळे माद्या आकर्षित होतात. ड्रील (मँड्रिलस ल्यूकोफीयस) हा वानर मँड्रिलसारखाच आहे. फक्त याचे तोंड काळे असते, इतकाच फरक आढळतो. या दोन्ही मँड्रिलच्या जाती कॅमेरून वा गाबॉ या पश्चिम आफ्रिकेच्या भागांत आढळतात. आफ्रिकेच्या पश्चिम आणि दक्षिण विभागांत व अरबस्तानात ३,०५० ते ३,९७५ मी. उंच प्रदेशात हे आढळतात. हे जंगलात राहत नाहीत. यांना सहजगत्या झाडावर चढणे जमत नाही. यांचे शरीर भक्कम असते. ढुंगणाचा रंग भडक असतो. गर्भावधी सात महिन्यांचा असतो व मादी एका वेळी एका पिल्लाला जन्म देते.

मँड्रिल सर्वभक्षी असून मुळ्या, शेंगा, फळे, किडे, पक्ष्यांची अंडी हे त्यांचे अन्न होय. हे मोठ्या प्राण्यांना मारून त्यांचे मांसही खातात. आवाजाद्वारे हे एकमेकांना संदेश देऊ शकतात.

मँड्रिलांच्या समूहात एका वेळी २०० ते ३०० वानर असतात. वयस्कर नर समूहाचे नेतृत्व करतो. कुटुंब व समूह निष्ठेचा यांच्यात बराच विकास झाला आहे. यांच्यात एकपत्नीतत्व की बहुपत्नीतत्व आहे, हे नक्की सांगता येत नाही पण नर आपल्या मादीचे अगर माद्यांचे इतर नरांपासून रक्षण करण्यात तत्पर असतो. प्रसंगी मादीच्या विश्वासघातकी वर्तनाबद्दल तिला देहांतासारखी क्रूर शिक्षाही सहन करावी लागते. नर आपली मादी अगर माद्या सोडून दुसऱ्या मादीशी लगट करताना आढळत नाही. लहान पिलांचे संगोपन मादी करते.

मँड्रिलांची समाजव्यवस्था बरीच विकास पावली आहे. निरनिराळी कार्ये करण्याकरिता समाजाची विभागणी केलेली आढळते. हे स्वतःचा बचाव उत्तम रीतीने  करू शकतात. वेळप्रसंगी चित्ते अगर शिकारी कुत्रे यांच्याशी सामना देण्यासही हे भीत नाहीत. ते सहसा माणसावर चालून येत नाहीत. मँड्रिल हे फार धोकेबाज प्राणी आहेत बंदुकीच्या आवजासही ते भीत नाहीत.

पहा : नरवानर गण बॅबून.

कानिटकर, बा. मो.