मळ्या : या गोड्या पाण्यातील माशाचा समावेश सायप्रिनिडी कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव गारा मळ्या (डिस्कोग्नॅथस लॅम्टा) आहे. भारतात थंड प्रदेश सोडून डोंगराळ भागातील नदीनाल्यांत हा सर्वत्र आढळतो. कृष्णेच्या उथळ पात्रात किंवा इतर पाणवठ्यावरही हा नेहमी पहावयास मिळतो.
मळ्याची लांबी २० सेंमी. पर्यंत असून शरीर वरच्या बाजूने तपकिरी किंवा निळसर हिरवे व खालच्या बाजूने पिवळसर हिरव्या रंगाचे असते. सामान्यतः कल्ल्यांच्या मागील बाजूस एक गर्द ठिपका असतो. पर (हालचालीसाठी वा तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) पिवळसर रंगाचे असून त्यांच्या कडा गर्द रंगाच्या असतात. श्रोणिपक्ष (कंबरेवरील पर) एकमेकांस जोडले जाऊन त्यांपासून एक चूषणबिंब तयार होते आणि ते खडकास वा दगडकपारीस चिकटून राहण्यास उपयोगी पडते. हा खडकावर वाढणाऱ्या शैवलांवर आपली उपजीविका करतो. हा मासा खडकाच्या रंगाचा व खडकावरच आढळणारा असल्यामुळे याला इंग्रजीमध्ये ‘स्टोन कार्प’ असे म्हणतात. याची वीण पावसाळ्याच्या सुरुवातीस विपुल प्रमाणात होते व याची पिले निरनिराळ्या ठिकाणी जाऊन याचा प्रसार होतो.
लहान प्रवाह व उथळ पाण्यात वावरत असल्यामुळे गोरगरीब भिल्ल, कातकरी यांची मासेमारी करून त्यांवर आपली उपजीविका करतात व तुलनात्मक दृष्ट्या हा स्वस्तही विकला जातो. यात चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्थानिक लोक हा आवडीने खातात. हा पाण्यातून बाहेर काढताच मरतो व मेल्यावर फार लवकर खराब होतो म्हणून हा ताजाच खाल्ला जातो.
कुलकर्णी, चं. वि.
“