प्रशांतचंद्र महालनोबीस

महालनोबीस, प्रशांतचंद्र : (२९ जून १८९३–२८ जून १९७२). भारतीय सांख्यिकीविज्ञ. जागतिक सांख्यिकीविज्ञानाच्या (संख्याशास्त्राच्या) क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची विशेष कीर्ती आहे. आर्थिक विकासाकरिता स्वातंत्र्योत्तर काळात जे नियोजन करण्यात आले, त्यात महालनोबीस यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे.

महालनोबीस यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. कलकत्ता येथील प्रेसीडेन्सी कॉलेजातून १९१२ मध्ये भौतिकीची बी.एस्‌सी. पदवी मिळविल्यानंतर १९१५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची भौतिकी व गणित या विषयांतील एम्.ए. पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजात भौतिकीचे प्राध्यापक (१९१५–२२), भौतिकी विभागाचे प्रमुख (१९२२–४५) आणि कॉलेजचे प्राचार्य (१९४५–४८) व १९४८ नंतर गुणश्री प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानी कलकत्ता येथे वातावरणवैज्ञानिक (१९२२–२६) व कलकत्ता विद्यापीठात सांख्यिकीच्या पदव्युत्तर विभागाचे मानसेवी प्रमुख (१९४१–४५) म्हणूनही काम केले. सांख्यिकीय क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल कार्यामुळे बंगाल सरकारचे सांख्यिकीय सल्लागार (१९४५–४८), भारत सरकारचे सांख्यिकीय सल्लागार (१९४९ पासून) व योजना आयोगाचे सदस्य (१९५५–६७) म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या. कलकत्ता येथे १९३१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या इंडीयन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे ते प्रथमपासून अध्यक्ष व सचिव होते. ही संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांख्यिकीतील संशोधनाची व प्रशिक्षणाची राष्ट्रीय संस्था म्हणून नावारूपास आली. रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीमध्ये महालनोबीस यांनी कर्मसचिव (मानसेवी प्रमुख सचिव) या पदावर (१९२१–३१) काम केले. १९६० मध्ये भारतातील संपत्तीच्या केंद्रीकरणाची व्याप्ती व उत्पादनाची साधने यांसंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते.

केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येताना त्यांनी आपल्याबरोबर कार्ल पीअर्सन यांच्या बायोमेट्रिका या नियतकालिकाचे अंक व त्यांनी प्रसिद्ध केलेली सांख्यिकीविज्ञांना उपयुक्त असलेली कोष्टके आणली. त्यांच्याद्वारे महालनोबीस यांना सांख्यिकीचा परिचय झाला. त्या काळी सांख्यिकी ही वेगळी ज्ञानशाखा म्हणून भारतातच काय पण जगात इतरत्रही मान्यता पावलेली नव्हती. आर्.ए. फिशर व इतर नामवंत शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण संशोधनानंतरच १९२० सालानंतर या ज्ञानशाखेला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. महालनोबीस यांनी सांख्यिकीच्या तीन क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. ⇨ बहुचरात्मक विश्लेषणात त्यांनी दोन समष्टींतील फरक दर्शविणारी ‘अंतर’ ही संकल्पना व ती मोजण्यासाठी D2 संख्यानक (सांख्यिकीय राशी) १९३० मध्ये प्रतिपादिले. अंतर या संकल्पनेचे त्यांनी पुढे अधिक व्यापकीकरणही केले. फिशर यांनी विकसित केलेल्या ⇨ प्रयोगांच्या अभिकल्पासंबंधीच्या क्रांतिकारी पद्धती महालनोबीस यांनी भारतात कृषी प्रयोगांसाठी वापरण्याकरिता पुढाकार घेतला. याकरिता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कृषी संशोधकांकरिता अनेक सांख्यिकीय टिपणे तयार केली व त्यांत स्वतःच्या सांख्यिकीय प्रयोगशाळेत नव्याने विकसित केलेल्या आणि सरळ प्रत्यक्षात वापरावयाच्या पूर्वरचित कार्यपद्धतींचा समावेश केलेला होता. या कार्यात त्यांना ⇨ राजचंद्र बोस यांचे मोठे सहाय्य झाले. कृषिविषयक प्रयोगाची योजना आखणे ही एक आर्थिक महत्त्वाची बाब आहे आणि त्याकरिता एका बाजूला प्रयोगाकरिता करावयाचा खर्च व दुसऱ्या बाजूला प्रयोगाद्वारे व्यक्तविलेल्या अंदाजांची अचूकता व विश्वासार्हता यांत समतोल राखणे आवश्यक आहे, असे महालनोबीस यांचे म्हणणे होते. १९४६ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्ये महालनोबीस यांचा बृहत् प्रतिदर्श सर्वेक्षणासंबंधीच्या [मोठ्या आकारमानाचा नमुना घेऊन केलेल्या पाहणीसंबंधीच्या ⟶ प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्धांत] सिद्धांतावरील एक महत्त्वाचा निबंध प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत मांडण्यासाठी त्याना अनेक पिकांच्या (उदा., बंगालमध्ये भात व ताग आणि उत्तर प्रदेशात गहू व ऊस ) प्रत्यक्ष सर्वेक्षणांत मिळालेल्या अनुभवाचा उपयोग झाला. १९५८ मध्ये त्यांनी नॅशनल सँपल सर्व्हेमार्फत गोळा केलेल्या प्रदत्ताच्या (माहितीच्या) आशयाच्या विवरणासाठी आंशिक आलेखीय विश्लेषणाची पद्धती विकसित केली. या पद्धतीमुळे अशा प्रदत्ताचा अर्थ लावणे गणितीय दृष्ट्या अधिक सुलभ झाले. या पद्धतीमुळे एकाच समाजगटाच्या दोन निरनिराळ्या कालखंडांतील किंवा एकाच कालखंडातील दोन समाजगटांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितींची तुलना करण्यातील अडचण दूर झाली. या सिद्धांतात प्रत्येक गटाचे समतुल्य आंशिक गटांत विभाजन करण्यात येते व मग त्यांची तुलना करण्यात येते.

आर्थिक सिद्धांतातही महालनोबीस यांनी सखोल अभ्यास करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांतील पर्याप्त (इष्टतम वा अनुकूलतम) गुंतवणुकीचे निर्धारण करण्यासाठी अर्थमितीय प्रतिरूपे [⟶ अर्थमिति] विकसित केली. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर पं. नेहरूंच्या सल्लागार मंडळातील आर्थिक वृद्धी व विकासाबाबतच्या प्रश्नांसंबंधीचे एक तज्ञ या नात्याने महालनोबीस यांनी राष्ट्रीय विकास योजना तयार करण्याचे बहुतांश वेळ कार्य केले. १९५६ मध्ये त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा सरकारला सादर केला. हा आराखडा नंतरच्या पंचवार्षिक योजना आखण्याकरिता आधारभूत ठरला. नियोजनावरील महालनोबीस यांचे विचार काहीसे परंपरागतच होते. नियोजनाद्वारे रोजगाराचे नवनवे मार्ग निर्माण झाले पाहिजेत आणि राहणीमानात हळूहळू सुधारणा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. ही उद्दिष्टे हस्तउद्योग आणि मोठे (अवजड) उद्योग यांचा एकाच वेळी विकास करून साधता येतील असा त्यांचा विश्वास होता. बेकारी हा भारतातील सर्वांत निकडीचा प्रश्न असून नियोजनाच्या पश्चिमी दृष्टिकोनाचा अवलंब करून हा प्रश्न सुटू शकणार नाही, याची त्यांना जाणीव होती. यामुळे मोठ्या उद्योगात गुंतवणूक करावी म्हणजे लघुउद्योगांची मागणी वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती. भावी गुंतवणूकी करण्यासाठी देशांतर्गत संपत्तीचा विनियोग करण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. बेकारांना व अनिवार्य काळात कामावरून कमी केलेल्या कामगारांना मदत करण्याच्या दृष्टीने एक राष्ट्रीय कामगार संघ निर्माण करावा, असे त्यांनी सुचविले होते.

महालनोबीस यांना अनेक अमेरिकन, युरोपीय व आशियाई देशांतील संस्थांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या होत्या. ऑक्सफर्डचे वेल्डन पदक व पारितोषिक (१९४४), कलकत्ता विद्यापीठाचे सर्वाधिकारी सुवर्ण पदक (१९५७), चेकोस्लोव्हाकिया ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सुवर्ण पदक (१९६४) वगैरे अनेक सन्मान त्यांना मिळालेले होते. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. भारतीय विज्ञान परिषदेचे ते १९५० मध्ये अध्यक्ष होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे संस्थापक सदस्य (१९३५) व अध्यक्ष (१९५७–५८), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य  लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१९४५), रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे, अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशनचे सदस्य इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सदस्य (१९३७), सन्मान्य सदस्य (१९५२) व सन्मान्य अध्यक्ष (१९५७) इंटरनॅशनल बायोमेट्रिक सोसायटीचे उपाध्यक्ष (१९४७) पाकिस्तान स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशनचे सन्मान्य सदस्य (१९५२) इंटरनॅशनल इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे सदस्य रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजचे सन्मान्य सदस्य (१९५८) वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे सदस्य (१९६३) संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकीय समितीचे सदस्य (१९४६) व अध्यक्ष (१९५४–५८) संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकीय प्रतिदर्शन उपसमितीचे अध्यक्ष (१९४७–५१) वगैरे अनेक पदे त्यांनी भूषविली. वॉशिंग्टन येथील जागतिक सांख्यिकीय परिषद (१९४७) इ. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळात सदस्य, निरीक्षक वा नेता म्हणून काम केले. भारतातील सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे संख्या हे नियतकालिक १९३३ मध्ये महालनोबीस यांनी स्थापन केले आणि तेव्हापासून त्याचे सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान त्यांनी प्राप्त करून दिले. विश्वभारतीच्या विश्वभारती पत्रिका या नियतकालिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले. टॉक्स ऑन प्लॅनिंग (१९६१), ॲन ॲप्रोच ऑफ ऑपरेशनल रिसर्च टू प्लॅनिंग इन इंडिया (१९६३) एक्सपिरिमेंट्स इन स्टॅटिस्टिकल सँपलिंग (१९६१) वगैरे ग्रंथ, तसेच अनेक वाङ्‌मयीन व तत्त्वज्ञानविषयक लेख व निबंध त्यांनी लिहिले. ते कलकत्ता येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.