महालता : (लॅ. लायना). लहानमोठ्या जंगलांत वृक्षावर चढत जाऊन शेवटी त्यांच्या माथ्यावरही आपला पर्णसंभार सूर्यप्रकाश मिळविण्यास अनुकूल असा पसरविणाऱ्या मोठ्या, जाडजूड, काष्ठमय, पण वृक्षाप्रमाणे स्वतः ताठ आणि सरळ वाढू न शकणाऱ्या, दुर्बळ खोडाच्या वेलींना ‘महालता’ म्हणतात. सर्वसाधारणतः नाजूक व लहान वेलींची (लतांची) काही सामान्य शारीरिक लक्षणे महालतांत आढळतात तथापि यांच्या विशेष लक्षणांमुळे यांना निराळे नाव पडले आहे. या सर्व वेली जमिनीतून आपापल्या मूळांद्वारे पाणी व खनिजे घेतात व इतर झाडांचा (किंवा कोणत्याही सापेक्षतः अधिक बळकट वस्तूंचा ) फक्त आधार घेतात. शरीरात आधार-ऊतकांचा (कठीण आवरणाच्या ऊतकांचा म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांचा) विकास न झाल्याने त्या बाबतीतले परावलंबित्व दुसऱ्या पूर्ण स्वावलंबी वनस्पतीशी सहकार्य करून त्या सहजीवन चालवितात. वनस्पतीतील अनुयोजनेचे (जुळवून घेण्याचे) हे एक उदाहरण आहे. यामुळे वेली परिस्थितीशी समरस होतात. यांचा सर्व पृष्ठभाग खरबरीत किंवा रेषांकित असल्याने त्या आधारावरून सहज घसरून पडत नाहीत तसेच प्रकाशाकडे जलद चढत जाण्यास लांब कांडी व अन्नाची ने-आण करण्यास वाहक ऊतके [⟶ वाहक वृंद] अधिक कार्यक्षम असतात. जवळपासच्या आधाराला चिकटण्यास किंवा बिलगण्यास यांपैकी काहींना विशिष्ट अंगे व उपांगे (मुळे, ताणे, काटे, आकडे इ. ) असतात, तर कित्येक आधाराभोवती आपल्या संवेदी (बाह्य चेतना ग्रहण करून प्रतिसाद देणाऱ्या) खोडाने गुंडाळत वर चढू शकतात. खोडाच्या किंवा प्रतानाच्या (ताण्याच्या) टोकाजवळचा भाग अधिक संवेदी असल्याने त्याचा जवळच्या आधाराशी संपर्क येतो, त्या वेळी प्रत्यक्ष संपर्क न झालेली बाजू अधिक जलद वाढल्याने आधाराभोवती गुंडाळण्याची प्रक्रिया चालू होते, तसेच तेथे खोडाच्या टोकाची गुरुत्वाकर्षणाविरुद्ध आणि प्रकाशाकडे वाढत जाण्याची प्रवृत्ती असल्याने ती वेल वरवर चढते. वेलीचे खोड जसजसे जून होते, तसतसे आत झालेल्या द्वितीयक प्रकाष्ठ वाढीमुळे [⟶ शारीर, वनस्पतींचे] ते कडक दोराप्रमाणे आधारास पकडून ठेवते. आधाराभोवती गुंडाळण्याची दिशा डावीकडे किंवा उजवीकडे असते. डावीकडे (घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे) असल्यास ती वेल ‘ उजवी किंवा दक्षिणावर्ती ’ (उदा., गुळवेल, विलायती वाकुंडी इ.) व याउलट दिशेने वेटोळे घालीत चढणाऱ्या वेलीस ‘ डावी किंवा वामावर्ती ’ (उदा., घेवडा) म्हणतात.
लता : आरंभी म्हटल्याप्रमाणे महालतांची काही सामान्य लक्षणे दर्शविणाऱ्या परंतु नाजूक व ओषधीय [⟶ ओषधि] वेलींना ‘लता’ म्हणतात, त्याची काही प्रमुख लक्षणे पुढे दिली आहेत. ज्यांना आधारावर चढण्यास विशेष प्रकारचे उपांग नसते पण आधाराभोवती फक्त वेढे देत जाणारे खोडच चढण्यास सहाय्यभूत होते, त्यांना ‘वलयिनी’ म्हणतात. (उदा., कामलता, गोकर्ण, घेवडा, चवळी, गारवेल इ.) परंतु प्रताने, आकडे, मुळे इ. साधनांनी आधाराला चिकटून चढत जाणाऱ्या नाजुक वेलींना ‘आरोहिणी’ म्हणतात. प्रतान कोणत्याही इंद्रियाच्या रूपांतराने बनलेला अवयव असतो, हे त्याचा इतर अवयवांशी असलेला संबंध ध्यानात घेता सहज कळून येते त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत : (१) खोड अगर फांदीचे रूपांतर उदा., द्राक्षवेल, कृष्णकमळ (२) पान, दल, देठ, उपपर्ण, पर्णाग्र इत्यादींचे रुपांतर अनुक्रमे उदा., लाख, वाटाणा, मोरवेल, चोपचिनी, कळलावी (३) फुलांचे अक्ष उदा., अँटिगोनॉन, कपाळफोडी (४) काकडी व तत्सम वनस्पतींच्या वेलींच्या प्रतानांबद्दल मतभेद आहेत तथापि ती पानांची रूपांतरे असावीत, असे अनेकजण मानतात.
⇨ मिरी, ⇨ नागवेली, इंडियन आयव्ही [⟶ आयव्ही] इत्यादींच्या खोडावरची वायवी आगंतुक मुळे भिंतीस वा इतर खोडास चिकट स्त्रावामुळे चिकटतात किंवा आधारावरच्या चिरांमध्ये किंवा खाचांत शिरून तेथे चिकटून पकड घेतात. काही अशा विशेष प्रकारच्या मुळांच्या टोकांस चकतीसारखी उपांगे येतात व ती चिकटण्यास सहाय्यभूत होतात. ⇨ अमरवेली या जीवोपजीवी (दुसऱ्या वनस्पतीवर उपजीवीका करणाऱ्या) बारीक वेलीची सूक्ष्म शोषके (मुळे) आश्रय वनस्पतींच्या खोडात शिरून अन्नरस घेतात शिवाय त्यामुळे वेलीला आधार मिळतो.
2. Harder, R. and others, Trans, Bell, P. Coombe, D. Strasburger’s Textbook of Botany,London, 1965.
3. Wilson, C. L. Loomis, W. E. Botany, New York, 1957.
“