महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : प्रादेशिक भाषेतून शैक्षणिक वाङ्‌मयाची निर्मिती करणारे मंडळ. नागपूर येथे १९६९ साली स्थापना. केंद्र सरकारने नेमलेल्या कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार सर्वच शिक्षण प्रादेशिक भाषेतून देता यावे, यासाठी सर्व विषयांची पुस्तके, शैक्षणिक वाङ्‌मय प्रादेशिक भाषेतून निर्माण करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक योजना चौथ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली. या योजनेखाली राज्य सरकारांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करुन प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषेतून विद्यापीठीय अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्याच्या कार्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात या कामासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या सहकार्याने महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाची स्थापना केली आणि ही योजना मंडळामार्फत अंमलात आणली. राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु या मंडळाचे पदसिद्ध सदस्य आहेत. याशिवाय राज्याचे शिक्षणमंत्री हे मंडळाचे पदसिद्घ सदस्य-अध्यक्ष असतात. कुलगुरुंपैकी एक कुलगुरु कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. कार्यकारी अध्यक्षाचा कार्यकाल एक वर्षाचा असतो. याशिवाय केंद्र व राज्य सरकार यांच्या शिक्षण खात्यातील उच्च अधिकारी मंडळाचे सदस्य आहेत.

दैनंदिन सर्व कामे आणि पूर्ण यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी संचालकाकडे आहे. ते मंडळाचे सचिवही असतात. प्रा. वामनराव चोरघडे प्रारंभीची काही वर्षे संचालक होते. प्रशासकीय कामे पाहणे व संचालकांना वेळोवेळी निर्देश देणे यासाठी एक कार्यकारी समिती आहे.

विद्यापीठीय अभ्यासक्रमाची सर्वच विषयांची पुस्तके मराठी भाषेतून निर्माण करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. या कार्यात योग्य तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळावे, या हेतूने प्रत्येक विषयाची स्वतंत्र समिती तयार केली आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील त्या त्या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष त्या विषय समितीचे सदस्य असतात. यामुळे मराठी भाषेतून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा भागविता येतील, अशी योग्य पुस्तके निर्माण करण्याचे कार्य सुलभ झाले आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या अध्यापकांना पुस्तकनिर्मितीच्या कार्यात समाविष्ट करून घेतले आहे.

पुस्तके लिहून घेण्यासाठी योग्य व्यक्तीची लेखक म्हणून शिफारस करणे आणि लिहून झालेली पुस्तके तपासणे, तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे यांसाठी विषय समितीचे मार्गदर्शन घेण्यात येते. पुस्तके तपासून झाल्यावर ती निर्दोष राहावीत, या दृष्टीने परीक्षकाच्या सूचना विचारात घेऊन नंतरच ती प्रकाशनासाठी दिली जातात.

पुस्तक-प्रकाशन, विक्री, पुस्तकांचा साठा या सर्व कामाची जबाबदारी एका स्वतंत्र समितीवर-प्रकाशन समितीवर-सोपविली आहे. राज्यातील प्रकाशन व्यवसायातील काही तज्ञ व्यक्तींना या समितीचे सदस्यत्व दिले आहे.

राज्यातील खाजगी प्रकाशकांना या योजनेतील पुस्तके प्रकाशनासाठी देण्यात येतात. पुस्तक-प्रकाशनाचा खर्च मंडळ करते. पुस्तकाची मालकी मंडळाकडेच असते. फक्त मंडळासाठी खाजगी प्रकाशकांना ही पुस्तके प्रकाशित करणे व त्यांची विक्री करणे एवढ्यापुरते सहभागी करून घेण्यात येते. त्यामुळे असे खाजगी प्रकाशक अप्रत्यक्षपणे मंडळाचे घटक झाले आहेत. त्यांना अशा पुस्तकांवर तीस टक्के अडत देण्यात येते.

विषय समित्या स्थापन झाल्या, पुस्तके लिहावयास दिली परंतु सुरूवातीची काही वर्षे प्रकाशनाच्या कामास जसा आकार यावयास हवा, तसा तो आला नाही. तेव्हा मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांच्या व्यवसायात अग्रगण्य असलेल्या काँटिनेंटल प्रकाशनाचे श्री. अनंतराव कुलकर्णी यांना सदस्य म्हणून स्वीकृत करून मंडळाचे नियंत्रक समजण्यात आले. महाराष्ट्र शासनाने कुलकर्णी यांच्याबरोबर अधिकृत करार करून त्यांना छपाई, प्रकाशन आणि वितरणाचे सर्वाधिकार दिले. त्यांनीही कोणतेही मानधन न घेता व मंडळाच्या ध्येयधोरणास अनुसरून प्रकाशनकार्यास हातभार लावला. या प्रकल्पाच्या यशात त्यांचा आणि वामनराव चोरघडे यांचा वाटा मोठा आहे.

याशिवाय मंडळ स्वतः काही पुस्तके प्रकाशित करते. विक्रीची व्यवस्थाही मंडळाच्या नागपूर केंद्र कार्यालयात केली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांच्याशी सतत संपर्क साधून विक्री प्रतिनिधीमार्फत पुस्तके त्वरित पुरविण्याची व्यवस्था केली आहे. मंडळाच्या आस्थापना आणि भांडारगृहाच्या खर्चाची पूर्ण जबाबदारी आता राज्य सरकारकडे सोपविण्यात आली आहे.

केंद्र सरकार पुस्तक प्रकाशनाच्या खर्चासाठीच अनुदान देत असून प्रत्येक मंडळास एकूण एक कोटी रकमेच्या वर फक्त ३ लक्ष रु. अतिरिक्त अनुदान देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. अशा प्रकारे एक कोटी तीन लक्ष रुपये एवढी रक्कम या योजनेसाठी प्रत्येक राज्यास मिळणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार अनुदान देणार नाही. रकमेचा पूर्ण विनियोग झाल्यावर पुढील खर्चाची तरतूद म्हणून सध्या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याची रक्कम स्वतंत्र निधीत गुंतविण्यात येते. या निधीतून मंडळाच्या पुढील पुस्तक प्रकाशनाचा खर्च भागवावयाचा आहे.

आजवर सु. ३०० पुस्तके मंडळाने प्रकाशित केली आहेत. यांत अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी, वैद्यक या व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके देखील आहेत. त्यांचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित विद्यार्थी व प्राध्यापक यांना होत आहे. यापूर्वी अभियांत्रिकी, कृषी ह्या विषयांची पुस्तके मराठी भाषेतून उपलब्ध नव्हती आणि मराठी पुस्तके नाहीत म्हणून मराठी माध्यम नाही, अशी परिस्थिती होती. आता मंडळाने मराठी पुस्तके निर्माण करून ही अडचण दूर केली आहे. या योजनेसाठी तयार झालेली सर्वच पुस्तके विद्यापीठीय अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असल्याने उच्च शिक्षण मराठी माध्यमातून घेता येईल.

अंधारे, विलास