महापात्र, लक्ष्मीकांत : (१८८८−१९५३). प्रख्यात ओडिया कवी, नाटककार व पत्रकार. जन्म बलसोर जिल्हातील तलपद ह्या गावी एका जमीनदार कुटुंबात. कटक येथील रॅव्हनशा महाविद्यालयातून त्यांनी १९१३ मध्ये पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी उत्कृष्ट कवितालेखन करण्यात आणि नाटकमंडळ्या संघटित करण्यात आपल्या अंगी असलेल्या गुणांची चमक दाखवली. कायद्यातील पदवी घेऊन समाजसुधारणेच्या मार्गाने देशसेवा करण्याचा लक्ष्मीकांतांचा मानस होता. गर्भश्रीमंती, प्रतिष्ठा, देखणे रूप तसेच संगीत, नृत्य, अभिनय, कवित्व इ. कलागुण त्यांच्या अंगी होते तथापि तरूण वयातच त्यांना कुष्ठरोग जडला आणि त्यांना आपले बहुतांश आयुष्य खेड्यात एकाकीपणे व्यतीत करावे लागले. कुष्ठरोगामुळे त्यांची प्रकृती सारखी ढासळत होती तथापि वैफल्याचा व निराशेचा त्यांच्या मनास स्पर्शही झाला नाही. नातेवाईक व मित्रांकडून त्यांनी कधी सहानुभूतीची अपेक्षा केली नाही. आपल्या वाट्यास आलेल्या दुर्दैवी जीवनास ते धीरोदात्तपणे व हसतमुखाने सामोरे गेले.

खेड्यातील आपले एकाकी आयुष्य त्यांनी विविध नाटक मंडळ्यांसाठी संगीतिका, उपरोधिका व विडंबिका लिहिण्यात तसेच गीते व भावगीते रचण्यात व्यतीत केले. त्या काळातील एक प्रभावी गद्यलेखक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी एक कादंबरी, अनेक कथा, ललित निबंध, उपरोधिका, विडंबिका व गीते-भावगीते लिहिली. नित्यानंद महापात्र हे त्यांचे पुत्र. नित्यानंदांच्या मदतीने त्यांनी डगोरा नावाचे एक नियतकालिक काढले. डगोराचे ते संस्थापक व संपादक होते. हलक्याफुलक्या व विनोदी स्वरूपाच्या लेखनाने नटलेले हे नियतकालिक ओरिसात अत्यंत लोकप्रिय होते. लक्ष्मीकांतानी विविध प्रकारांत लेखन करून ओडिया साहित्य समृद्ध केले असले, तरी गीत-भावगीत प्रकारची कविता लिहिण्यात त्यांच्या प्रतिमेचा नितान्तसुंदर आविष्कार दिसून येतो.

गद्य व पद्य अशा दोन्ही प्रकारच्या उपरोधिका तसेच उत्कृष्ट विडंबिका त्यांनी लिहिल्या. त्यांचे ह्या प्रकारचे लेखन त्या काळी रंजक ठरले असले, तरी त्याचे महत्त्व तात्कालिक स्वरूपाचेच होते चिरंतर नव्हते. त्यांची काही राष्ट्रभक्तिपर गीते व भावगीते मात्र चिरंतर स्वरूपाची असून आजही ओरिसातील लोकांच्या जीभेवर ती घोळत आहेत. ओरिसातील कुठल्याही सांस्कृतिक−राजकीय समारंभाच्या सुरूवातीस त्यांनी रचलेले ‘वंदे उत्कल जननी’ हे ओजस्वी गीत आवर्जून म्हटले जाते. लक्ष्मीकांतांच्या समग्र लेखनाचे संकलन अनेक खंडांत होत असून त्यांतील काही खंड प्रसिद्ध झाले आहेत.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)